तुळशीदास भोईटे/ सरळस्पष्ट
आजचा दिवस मोठा आहे. आज गुरु नानक जयंती. याला गुरु पर्व किंवा प्रकाश पर्व असेही म्हणतात. या चांगल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चांगला निर्णय घेतला. त्यांनी शेतकऱ्यांचा विरोध असलेले तीन कृषी कायदे मागे घेतले. तसेच शेतकऱ्यांना कायदे समजवून सांगण्यात कमी पडल्याबद्दल देशाची माफीही मागितली.
वाटलेलं नवं प्रकाशपर्व…
कुठेतरी वाटले की देशाच्या राजकारणात, कारभारात एक नवं प्रकाशपर्व सुरु झाले. पण तो समज गैरसमजच ठरला. कारण काही वेळातच आजपासून नवी सुरुवात करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपामधील नेत्यांनाच आजचा दिवस काळा दिवस असल्याचा साक्षात्कार झाला. तसेच ज्यांनी शेतकऱ्यांचा विजय संबोधत आनंदोत्सवास सुरुवात केली त्या मोदी विरोधक राजकीय नेत्यांच्या पक्षांची एसटी संपाविषयीची भूमिका त्यांची कष्टकरीवादी भूमिका ही मर्यादित स्वरुपाचीच असल्याचे दिसून आले.
कंगनासाठी शेतकरी जिहादी!
देशातील सन्मानाच्या पद्मश्री पुरस्काराच्या लाभार्थी अभिनेत्री कंगणा राणावत यांना सध्या प्रत्येक विषयावर बोलावेच लागते. त्यानुसार त्यांनी शेती कायदे मागे घेणे म्हणजे रस्त्यावरच्या जिहादींचा विजय असल्याचे म्हटले. ते ऐकलं आणि त्यांनी लावलेल्या २०१४ सालच्या स्वातंत्र्याच्या इतिहास संशोधनामागील भूमिका लक्षात आली. ज्या स्वातंत्र्यात शेतकरी आंदोलक जिहादी ठरतात, ते स्वातंत्र्य वेगळंच असणार. ते त्यांनाच लखलाभ असो.
दरेकर-खोतांसाठी काळा दिवस!
गेले काही दिवस महाराष्ट्रातील भाजपा नेते कडवट डाव्यांपेक्षाही जास्त हिरीरीने एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढल्यासारखं दाखवत आहेत. खरंतर एसटी आंदोलन त्याआधीचं. पण सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी नेतृत्व घेतलं आणि माध्यमांनी त्यांनाच नेते ठरवले. तरीही बरे वाटले. कारण एसटी कर्मचाऱ्यांचे मान्यताप्राप्त नेते कचखाऊ निघाल्यानं त्यांना नेतृत्वाची गरज होतीच. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे सत्ताधीश. ते मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून. त्यामुळे त्यांचा तेवढा तरी कष्टकऱ्यांशी संबंध आहेच.
जय किसान म्हणताना जीभ का अडखळते?
पडळकर सारख्यांचा तोंडाळपणा सोडला तरी या भाजपा नेत्यांमुळे कुणीतरी कष्टकऱ्यांसाठी लढतंय, हे बरं वाटणारंच. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आणि त्यांना आजचा दिवस काळा दिवस असल्याचा साक्षात्कार झाला. म्हणजे आपण केवळ आघाडीची सत्ता असल्याने इथे एसटी कर्मचारी या कष्टकऱ्यांचा कैवार घेतल्यासारखं दाखवतो, जिथं भाजपा केंद्रीय सत्तेचा विचार असतो तिथं शेतकऱ्यांसारख्या कष्टकऱ्यांच्या हिताची पर्वा नसल्याचेच त्यांनी उघड केले. म्हणजे जय कामगार म्हणायचे पण जय किसान म्हणताना राजकीय स्वार्थातून जिभ अडखळवायची!
जय कामगार का नाही?
आता कष्टकऱ्यांच्या समर्थनार्थ राजकीय सोयीनुसार भूमिका फक्त भाजपावाले घेतात, असे नाही. आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे नेत्यांनी आज आनंदोत्सव साजरा केला. शेतकऱ्यांची तीन कायदे मागे घेण्याची मागणी मान्य झाली त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली त्याचा आनंद त्यांना जास्त असणार. कारण त्यांच्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती कराराने कसण्याच्या विरोधात आहेत, असे वाटत नाही. तरीही त्यांनी साजरा केलेला आनंदोत्सव शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याने कष्टकऱ्यांच्या बाजूने असणाऱ्या प्रत्येकाला सुखावणाराच!
सत्ताधाऱ्यांना विरोधकांचीच फूस का वाटते?
पण एकीकडे शेतकऱ्यांसारख्या कष्टकऱ्यांच्याबाजूने जे आहेत त्यांची एसटीत खपणाऱ्या कष्टकऱ्यांविषयीची काय भूमिका आहे? त्यांना एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा तसाच खुपतो जसा भाजपावाल्यांना शेतकऱ्यांचे आंदोलन खुपत होते. भाजपा आरोप करत होती, करत असते की शेतकरी आंदोलकांना भाजपाविरोधकांची फूस आहे. ते शेतकऱ्यांना चिथावणी देतात. महाराष्ट्रातील एसटी संपाबद्दल आघाडीचे नेते वेगळे काय बोलतात? इथे फक्त भाजपाचे नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देतात, असा आरोप केला जातो. विलिनीकरण जर शक्य नव्हतं, तर मग तुमच्या जाहीरनाम्यात आश्वासन का दिले? ज्यांनी ते तेथे लिहिले ते जुमलेबाज भाजपावाले नसणार, तुमचेच असणार. मग त्यांनाच विचारा, कसं शक्य आहे ते!
…नाही तर हुतात्मा चौकात अभिवादनाचा अधिकार नाही!
मुळात शेतकरी असो वा कामगार, दोघांपैकी कुणीही शंभर टक्के त्यांचे खरेखुरे समर्थक नाहीत. सत्ताधारी हे सत्ताधारीच. जर दोघांनीही शेतकरी किंवा कामगारांना त्यांचे विरोधक चिथावणी देतात, असे वाटते तर दोघेही आपापल्या विरोधकांना संधीच का देतात? जर तुम्ही कष्टकरी समर्थनाची लिमिटेड भूमिका अनलिमिटेड केली तर शेतकरी असो किंवा कामगार दोघांनाही न्याय मिळेल. पण कुणीही मनापासून कष्टकरी समर्थक नसावेच. नाहीतर केंद्रात एक आणि राज्यात एक अशी भूमिका असूच कशी शकते? आता तरी कृपया एका भूमिकेत या. तुमचं जय किसान आणि त्यांचं जय कामगार एकत्र येऊ द्या. किमान महाराष्ट्रात तरी तसं होऊ द्या. नाही तर यापुढे हुतात्मा चौकातील जय किसान, जय कामगार शिल्पाला अभिवादनाचा अधिकार तुम्हाला नसेल!
मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली सामान्यांची ताकद!
जाता जाता: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया खूप चांगली आहे. ते म्हणालेत, “कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे” सामान्य माणसांची ही ताकद आघाडीच्या नेत्यांनी विसरू नये!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite