तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
“जी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा विचार आत्मसात करते, तो विचार आत्मसात करून भूमिका करते, ती व्यक्ती जर तर या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, करायचं असेल तर करून दाखवायचं नाही तर त्या वाटेला जायचं नाही!”
२० फेब्रुवारी २०१९ रोजी नांदेड येथे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमातील हे भाषण डॉ. अमोल कोल्हे यांचे आहे. त्यावेळी त्या विचारपीठावर पुरुषोत्तम खेडेकर, रेखाताई खेडेकर, मनोज आखरे उपस्थित होते.
आता त्याच डॉ. अमोल कोल्हे यांची गुरुवारची फेसबूक पोस्ट:
मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका –
२०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डॉक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!”
कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा!
याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!
एकच व्यक्ती. दोन पडद्यावरच्या भूमिका आणि दोन मांडलेल्या भूमिका. केमिकल लोचा?
ते असो. जे अमोल कोल्हे विचारवंताचा आव आणत इतिहासाचा अभिमान असावा पण अभिनिवेश नसावा असं म्हणत आले, तेच अमोल कोल्हे कायम छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेच्या अभिनिवेशातच विचारमंचांवरून नाट्यमय भाषणं ठोकत राहिले.
नथूरामच्या भूमिकेचे उघड होताच केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांचा जो वैचारिक गोंधळ किंवा मुन्नाभाईच्या भाषेत सांगायचं तर डोक्यात जो केमिकल लोचा झाला आहे तो स्पष्ट दिसत आहे. सावरासावर करताना खरंतर त्यांनी लोकनाट्याची परंपरा जपणारे तमाशा कलाकार आणि अध्यात्माची वारकरी यांचाही अपमान केला, असा नवा आक्षेप पुढे आला तर चुकीचं म्हणता येणार नाही. त्यावर आता नको.
अभिनेते म्हणून नाही, पण नेते म्हणून अपेक्षा!
कारण अभिनेते म्हणून कोणी कोणती भूमिका करावी, याला आक्षेप असण्याचे कारण नाही. नक्कीच नाही. पण तो अभिनेता जेव्हा नेता असतो, पुन्हा लाखो मतदारांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असतो तेव्हा मात्र त्याच्याकडून वैचारिक भूमिकेची अपेक्षा असतेच असते, नव्हे असलीच पाहिजे. तिथेच डॉ. अमोल कोल्हेंचा रंग खरवडला जातो. त्यांनी २०१७मध्ये मी ज्या राजकीय भूमिकेत होतो, त्याच्याशी सुसंगत असल्याने गांधीजींच्या हत्येचं समर्थन करणारीआशय असणाऱ्या नथुरामची भूमिका केली, आज मला ती चूक वाटते, असे म्हटलं असतं तर चाललंही असतं. पण त्यांनी तसे म्हटलेले नाही.
एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना सांगायचं ती भूमिका मी जगतो आणि दुसरीकडे नथुरामची भूमिका केल्याचे समर्थन करताना मात्र नाही ते विचार मला मान्य नव्हते. मग काय तुम्ही फक्त भूमिकेत न शिरताच भूमिका केली?
अमोल कोल्हेंची नथुरामची एक भूमिका आणि राष्ट्रवादीच्या अनेक भूमिका!
डॉ. अमोल कोल्हेंचेही ठिक आहे. ते अभिनेते आहेत. भूमिका बदलत राहतील. अभिनिवेशही तसाच आणतील. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं काय? त्यांचे रंग आणि भूमिका किती आणि कोणत्या असणार?
या वादाला खरी उकळी फुटली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टनंतर:
जितेंद्र आव्हाडांचा कडवट विरोध
- डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही.
- विनय आपटे, शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार.
डॉ. राजेश टोपेंकडून समर्थन
राष्ट्रवादीचे नेते असणाऱ्या कॅबिनेट मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे कौतुकही झाले. वैचारिक भूमिका स्पष्ट मांडल्याबद्दल.
पण त्यानंतर कॅबिनेटमधील त्यांचे स्वपक्षीय सहकारी आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांची भूमिका वाचनात आली:
- ‘Why I killed Gandhi’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय असं कळतंय.
- अमोल कोल्हे यांनी मला ती क्लिपही दाखवली, ज्यात त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली आहे.
- अमोल कोल्हे यांची ओळख ही एक अत्यंत चांगला, लोकप्रिय, गुणी अभिनेता म्हणून आहे.
- आपल्या सर्वांनाच अभिमान वाटावा असा गुणी कलाकार आपल्या महाराष्ट्रात आहे.
- त्यांची संभाजी नावाची मालिका सुरु होती. त्यावेळी सर्वजण ती मालिका पाहत. एक अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे.
- त्यांनी नथुराम गोडसेचा रोल जरी केला असला तरी तो एक अभिनेता म्हणून त्याकडे पाहिलं जावं, अशी विनंती मला महाराष्ट्रातील जनतेला करायची आहे. निश्चितप्रकारे आपण त्यांच्या कलेचं कौतुक केलं पाहिजे.
- आपल्या नेत्याकडे अभिनेता म्हणून पाहा असं डॉक्टरांनी सुचवल्यामुळे तशी अडचणच आहे. आता निवडणुकीची भाषणंही डायलॉगच मानावी लागतील. असतातही म्हणा.
बाबासाहेब पाटलांकडून भूमिकेच्या समर्थनार्थ संविधानाची आठवण!
याच्याही पुढे जाणारी संविधानाचा दाखला देत मांडलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून मांडली गेली. पक्षाच्या चित्रपट आघाडीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ती मांडली:
- राष्ट्रवादी हा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे.
- या संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकाला आहेत आणि कर्तव्यही प्रत्येकासाठीच आहेत.
- त्यानुसार अमोल कोल्हे कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारत असतील तर त्याला आमचा विरोध नाही.
- अमोल कोल्हे यांची कलेशी बांधिलकी आहे. त्यानुसार ते ही भूमिका साकारत आहेत.
- परंतु त्यांची वैचारिक बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाच्या वैचारिक भूमिकेशीच आहे, याबाबत आमच्या मनात कोणताही संशय नाही.
- शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात.
- अमोल कोल्हे कलाकार म्हणून कलेशी असलेल्या बांधिलकीतून ही भूमिका साकारताहेत, हा त्यातील मुलभूत फरक आहे.
- त्यामुळे त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारण्याला आमचा विरोध नाही.
आता राष्ट्रवादी ठरवणार कोण प्रचारक, कोण सुधारक?
आता हे जे बाबासाहेब पाटील बोललेत. ते म्हणाले, ” शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात. अमोल कोल्हे कलाकार म्हणून कलेशी असलेल्या बांधिलकीतून ही भूमिका साकारताहेत, हा त्यातील मुलभूत फरक आहे. त्यामुळे त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारण्याला आमचा विरोध नाही.”
हे सारं वाचून खरंतर कोणत्याही ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा जास्त करमणूक होऊ शकेल. पण काल एका चर्चेत सहभागी झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसवर मनापासून प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते, नेते यांची वैचारिक, मानसिक तडफडही पाहिली. वाईट वाटलं. सामान्य माणसं. स्वत:च्या कमाईतून स्वत:चं घर चालवणारी. त्यातूनच वैचारिकतेतून एखाद्या पक्षाला आपलं मानणारी. मग ती राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, भाजपा असेल किंवा शिवसेना, मनसे, वंचित, एमआयएम, डावे – उजवे पक्ष कोणतेही असले तरी जेव्हा नेते किंवा पक्ष भलतीच भूमिका घेतात तेव्हा या सामान्य कार्यकर्त्यांची तडफड सारखीच असते. माझी बांधिलकी या सामान्य कार्यकर्त्यांशी असल्याने त्यांच्या भूमिकेतून लिहिणे, बोलणे आवश्यक मानतो.
शरद पवारांकडून समर्थन!
- शरद पवारांचे समर्थन
- शरद पवारांनी अमोल कोल्हेंचं समर्थन केले आहे.
- गांधी सिनेमा जगात गाजला.
- त्यामुळे जगात गांधींना महत्त्व आलं.
- त्या सिनेमात कुणीतरी गोडसेची भूमिका केली.
- ती भूमिका करणारा आर्टिस्ट होता.
- नथुराम गोडसे नव्हता.
- कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे.
- शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला.
- शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका घेत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल
- तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही.
- तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो.
- किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही.
- तो कलाकार असतो.
- सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही.
- रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असं सांगतानाच अमोल कोल्हेंनी भूमिका साकारली असेल तर ती कलावंत म्हणून केली आहे.
- त्याकडे कलाकार म्हणूनच पाहिलं पाहिजे.
औरंगजेब, अफझलखानाच्या भूमिकांमध्ये शिवाजी महाराजविरोधाचं समर्थन असतं?
राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा!
व्वा रे व्वा! म्हणजे हे तर असे झाले आमच्या कोल्हेंनी केले तर ते अमृत आणि त्यांच्या पोंक्षेंनी केलं तर ते विष! किती दुटप्पीपणा! मुळात माझ्यासारख्या उदारमतवाद्याचा कोणी कोणती भूमिका साकारावी याला विरोध नसतोच. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे १०० टक्के सर्वांनाच असलं पाहिजे. ते निवडक लोकांना, निवडक उद्देशाने नसावेच नसावे. पण जर अभिव्यक्तीस्वातंत्र्यांचा बुरखा पांघरून कुणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चारित्र्याची हत्या करण्याचा बुद्धीदरिद्री कपट करत असेल तर ते विचारस्वातंत्र्य नसून वैचारिक स्वैराचार ठरतो. तेथे विरोध करावाच लागतो. तसंच फक्त एखादा अभिनेता असणारी व्यक्ती नथुरामची तीही गांधीहत्येचं समर्थन करणारी भूमिका करेल तर त्याला माझा आक्षेप नसणारच. पण जर कुणी एका वैचारिक भूमिकेतून राजकारणात प्रचार करून लोकांच्या मतांच्याबळावर लोकप्रतिनिधी झाला असेल तर त्याला त्या वैचारिकतेचा घात करणारी भूमिका करताना किंवा आधी केलेल्या त्या भूमिकेचं समर्थन करताना काही तरी जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे.
न पटणारं बरंच काही!
अमोल कोल्हे म्हणतात तसा तो चित्रपट २०१७चा हे मान्य करू. त्याचं पोस्ट प्रोडक्शनचीही डबिंग वगैरे कामे रखडलेली नव्हती, तो उगाच डब्यात पडून होता, असेही म्हणू. डॉ. अमोल कोल्हे यांचा करिअरमधील परमोच्च यशाचा काळ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेच्या यशाचा काळही त्या निर्माता महोद्यांना धंदेवाईक मोहात टाकणारा वाटला नाही, त्यांनी तो पूर्ण असूनही तेव्हाही प्रकाशित केला नाही, आता OTTवरच प्रकाशित करत आहेत, हेही मान्य करू. पण तो आताच का प्रकाशित होत आहे? हे ठरलं कधी? मधल्या काळात . कोल्हे हे मानसिक द्वंद्वात सापडल्यासारखे वाटत होते. मग ते विपश्यनेला वगैरे गेले, तेव्हाच काही घडत नव्हतं ना? उगाच आपली शंका. मान्यता द्या, नाहीतर मी चाललो. असं कऱणारे ते नाहीत, हे ठाऊक आहे, तरीही शंका.
तरीही प्रश्न उरतो, मग आताच्याच ३० जानेवारीला हा चित्रपट का?
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खरोखरच गंभीरतेने विचार करावा, असंच सारं आहे. निवडणुकीत मिळणार यश वाढतच जावं. राष्ट्रवादीनं खूप मोठं व्हावं. पण यश हाच जर निकष लावत जे करतात ते सर्व योग्य मानायचं असेल तर मग देशभरासाठीचा निकष वापरत भाजपाच्या यशामुळे भाजपाच्या प्रत्येक कृत्याचं समर्थनच करावं लागेल!
- यश हा निकष असूच शकत नाही, तसे असते तर यश आणि फक्त यशच मिळवणारी इतिहासात त्या काळी मोगलाई मोडून पडली नसती. मोगलांच्या अनैतिकतेच्या वाळवीने तिला गिळलं नसतं. लाजिरवाणा अंत घडवला नसता. सावध झालं पाहिजे ते इथं. परदेशी लेनगिरी जशी नको तशीच देशी लेनगिरी कुणालाही इंटरेस्टिंग वाटू नये.
पोंक्षेचे विष, कोल्हेंचे अमृत कसे?
शरद पोंक्षेंनी भूमिका करणे प्रचार आणि कोल्हेंनी करणे व्यावसायिक आचार असं असू शकत नाही. आता सोशल मीडियाही राजकीय दांडगे नियंत्रित करत आहेत. तरीही गनिमी काव्याने का होईना सत्य लोकांसमोर जातं. आणि सत्याची शक्ती ही कोणत्याही सत्तेपेक्षा कधीही मोठी असते. त्यामुळेच अगदी नथुरामचा उदोउदो करणाऱ्यांच्या मागच्या काही पिढ्यांमध्ये नथुराम हे नाव कुणी ठेवलेले नसणार, पण ज्यांची हत्या केली त्या महात्म्याचं मोहन हे नाव मात्र आजही ठेवण्यात गैर वाटत नाही. यातूनच काय ते ओळखलं जावं.
तुर्तास इथंच थांबतो. विचार करण्यासाठी सर्व समर्थ आहेत!
तुळशीदास भोईटे हे ‘मुक्तपीठ’ या मुक्तमाध्यमाचे संपादक आहेत.
संपर्क – ट्वीटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961 ई-मेल tulsidasv@gmail.com