तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेले भाषण हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणून पाहिले पाहिजे. त्यांनी भाषणाच्यावेळेपुरता का होईना मुख्यमंत्रीपदापासून दूर होत ते भाषण केलं असावं. त्या भाषणाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रत्येक शब्द हा त्यांच्यातील संयमी नेत्यांनं विचारपूर्वक वापरलेला असला तरी शिवसैनिकांना भावणाऱ्या आक्रमक ठाकरी शैलीत उच्चारलेला होता.
दसरा मेळावा
दसरा मेळाव्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आणि त्यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे शिवसेनेसाठी पुढील वाटचालीसाठीचं विझन डॉक्युमेंट असतं. शिवसैनिकांमध्ये एक नवा जोश भरण्याचं काम दसरा मेळाव्यातून करणे अपेक्षित असते. गेल्यावर्षी कोरोना परिस्थितीमुळे अतिशय मर्यादित स्वरुपात पार पडलेला दसरा मेळावा याहीवेळी तसा शिवतीर्थाच्या तुलनेत मर्यादित स्वरुपातच पण गेल्यावर्षापेक्षा मोठ्या प्रमाणावर पार पडला. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी सभागृह क्षमतेच्या नियमात बदल करण्याची दक्षता घेतली.
धोरण
दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं अस्तित्व जाणवलं. त्याचं कारण तिथं सत्तेबरोबर येणाऱ्या जबाबदारीपेक्षा शिवसेनेला एक पक्ष म्हणून टिकवायचं, वाढवायचं आणि आणखी पुढे नेण्याचा विचार दिसला. त्यातूनच हिंदुत्व, प्रादेशिकत्व आणि राष्ट्रीयत्व या तीन मुद्द्यांवर भर दिला होता. तोही शिवसैनिकांना भावणाऱ्या आक्रमकतेनं. आव्हान देत, आव्हान स्वीकारत आणि आव्हानांच्या डोळ्यांना डोळे भिडवत. त्यातूनच त्यांनी भाजपाला थेट सरकार पाडण्याचं आव्हान दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मैं फकिर, झोला लेकर आया, चला जाऊंगा, या विधानावर थेट टीका केली. तसे कर्मदरिद्री विचार नाहीत, असे ठणकावून सांगितले.
पुढच्या महिन्यात आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. फोडण्याचे अनेक प्रयत्न केले, पाडण्याचे प्रयत्न केले, मी तर आज पण सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा… pic.twitter.com/sqjL5MHLog
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 15, 2021
हिंदुत्व
शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन धर्मनिरपेक्ष आणि आजवर कडवट शत्रू असलेल्या पक्षांशी आघाडी केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं. तेव्हापासूनच भाजपाचा भर शिवसेनेनं हिंदुत्वाशी काडीमोड घेऊन धर्मनिरपेक्षतेशी निकाह केला, अशा स्वरुपाचा शिवसेनेच्या कडवट हिंदुत्वाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण करण्यावर राहिला आहे. त्यातून हिंदुत्वाच्या वोटबँकेतील आपला प्रतिस्पर्धी किंवा वाटेकरी संपवण्याची रणनीती असावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात थेट संघाच्या विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलेल्या भाषणाचा दाखला दिला. हिंदुत्व हा समान विचार असून धारा वेगळ्या असतील, असं सांगत त्यांनी संघाशी असलेली वैचारिक साधर्म्य कायमच असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.
तेवढंच नव्हे तर मोहन भागवतांच्या सर्वांचे पूर्वज एकच होते या विधानाचा संदर्भात त्यांनी वेगळा मुद्दा मांडला. वेगळ्या धारेतील भाजपा नेत्यांच्या लखीमपूरसारख्या घटनांमधील माजोर्डेपणाचा उल्लेख करत त्या शेतकऱ्यांचे पूर्वज कोण होते, असा अस्वस्थ करणारा रोखठोक सवाल केला.
धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडीने सत्तेत असल्यामुळे उद्धव ठाकरे हिंदुत्वावर तेवढं आक्रमकतेनं बोलणार नाहीत, असे मानले जात होते. मात्र, त्यांनी पक्षप्रमुखपदाला जागत थेट बाबरी मशिद पाडल्यानंतरची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जबाबदारी घेणारी आक्रमक भूमिका आणि मुंबईला दंगलीत वाचवण्यातील शिवसेनेची आक्रमक भूमिका यांचा उदाहरणांसह उल्लेख केला. त्यांनी कुर्ला येथील दंगलग्रस्त झोपडपट्टीला भाग देऊन अनुभवलेली शिवसैनिकांची दंगलखोरांविरोधातील आक्रमकता मांडली. कसलीही पर्वा न करता. सरळस्पष्ट बोलत. अर्थात त्यांच्या मूळच्या संयमी शैलीत कोणत्याही धर्मांच्याविरोधातील बोलणे बसत नसल्याने त्यांनी ते करताना आक्षर्पाह शब्द वापरले नसले तरी शिवसेना हिंदुत्वासाठी आजही तशीच आक्रमक आहे, हा संदेश देण्यात ते यशस्वी ठरले.
प्रादेशिकत्व
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दुसरा महत्वाचा मुद्दा प्रादेशिकत्वाचा. शिवसेना हा खरं पाहता हिंदुत्ववादी प्रादेशिक पक्ष आहे. सध्या भाजपाकडून जे राजकारण सुरु आहे, त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये जसा वापर सुरु आहे, त्याचा उल्लेख करत त्यांनी छापा काटा राजकारण असा उल्लेख केला. “घाला छापा आणि काढा काटा” या रणनीतीच्याविरोधात उभे ठाकण्याचे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय मंत्री सोनवाल यांचा सर्व बंदरांचा सीएसआर निधी गुजरातला वळवण्याच्या फतव्याचा विषय त्यांनी मांडला. माहिती अधिकारात हा गैरप्रकार उघड झाल्याचे ते म्हणाले. त्यातून देशभरातील अन्य राज्यांवरील अन्यायालाच त्यांनी वाचा फोडली.
देशातील ११ बंदरांचा सीएसआर फंड गुजरातकडे वळवलाय… वाचा आणि थंड बसा pic.twitter.com/VBqcqrox9h
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 15, 2021
महाराष्ट्रात एनसीबीकडून सुरु असलेल्या कारवाईंबद्दल ते थेट बोलले. जणू काही संपूर्ण जगात महाराष्ट्रात गांजा चरसचा व्यापार सुरु आहे असे एक चित्र उभे करायचे. दहा ग्रॅम शोधणारे यांनी लक्षात घ्यावे, महाराष्ट्रात पोलीसांनी दीडशे किलो जप्त केले आहेत, असे ते म्हणाले. तसं करतानाही पुन्हा गुजरातमध्ये २१ हजार कोटीचे ड्रग्स सापडेलल्या मुंद्रा अदानी बंदराचा उल्लेख केला.
कोणी कितीही घाबरवले तरी घाबरायचं नाही. बंगालप्रमाणे करुन दाखवायची तयारी ठेवायची, असे आवाहन करताना त्यांनी इतिहासातील लाल-बाल-पाल या तीन राष्ट्रीय नेत्यांची उदाहरणे देत पंजाब-महाराष्ट्र-बंगाल या तीन राज्यांच्या आक्रमकतेची आठवण करुन दिली.
सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी या प्रादेशिकत्वाखाली मांडला तो संघराज्यांच्या सार्वभौमत्वाचा.
महिला अत्याचार, संघ राज्य यावर चर्चा होणे आवश्यक. बाबासाहेबांनी केंद्र व राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केले. आणीबाणी, परकीय आक्रमण व परदेश धोरण हे तीनच विषय केंद्राला आहेत. यावर विचारवंतांनी, तज्ज्ञांनी उत्तर द्यावे. रोजच्या कारभरात केंद्राची लुडबूड होता कामा नये. सत्तेच्या व्यसनात इतरांची आयुष्य बरबाद करणाऱ्यांनी ते बंद करावे, असेही त्यांनी ठणकावले.
संविधानाने राज्यांना दिलेल्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याच्या केंद्रातील भाजपा सत्तेच्या धोरणाविरोधात त्यांनी थेट एल्गार पुकारला. हा त्यांचा मुद्दा शिवसेनेसाठी राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यांमधील भाजपाविरोधी पक्षांशी, नेत्यांशी जोडणारा ठरू शकेल.
अजूनही मुख्यमंत्री मीच आहे असे वाटते, या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी खरमरीत टीका केली. जर दिलेला शब्द पाळला असता तर शिवसैनिक अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतर तुम्हीच मुख्यमंत्री झाला असता, कदाचित मी राजकारणातूनही बाहेर गेलो असतो, असे विधानही त्यांनी केले.
राष्ट्रीयत्व!
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसाठी “हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व!” असल्याचे मांडले. लखीमपूरसारख्या घटनांमध्ये जे मारले गेले त्या शेतकऱ्यांचा प्रश्नही भाषणात उपस्थित केला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा दाखला देत जर आपले पूर्वज एक होते हे जर मान्य असेल तर विरोधी पक्ष, आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरुन आलेत का? असा रोखठोक प्रश्नही त्यांनी विचारला.
हिंदुत्व आता खरे धोक्यात. म्हणून बंगाल प्रमाणे तुमची तयारी आहे? मराठी अमराठी भेद करु नका. मराठी म्हणून एक व्हा मराठा तितुका मेळवावा प्रमाणे हिंदू तितुका मेळवावा, हिंदुस्थान धर्म वाढवाव, हा नवा संदेश त्यांनी दिला.
सार
सत्तेसोबत आलेल्या जबाबदारीमुळे मूळच्या आक्रमक शिवसेनेला काहीसे मवाळ बनवले. सत्तेमुळे जमलेली थंडपणाची राख महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने काहीशी उडवण्याची संधी मिळाली. आता पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणामुळे शिवसैनिकांना पाहिजे होते ते आक्रमक विचारांचं मार्गदर्शन मिळालं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शिवेसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शैलीचं मिश्रण जाणवते. त्यानुसार त्यांच्या भाषणाकडे पाहिले तर वेगळंही खूप दिसते. एक घाव, दोन तुकडे ते करत नसतात. ते करतात ते विचारपूर्वक. त्यांची आक्रमकता त्यांना, शिवसेनेला आवश्यक असते तेव्हा असते.
दसरा मेळावा भाषणातही याची झलक दिसली. धारा वेगळ्या म्हणत भाजपाला, झोलाछाप दरिद्री राजकारण म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. पण भाजपाला ठोकताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संघाचे आणि सेनेचे विचार सारखे असल्याचे मांडले. त्यातून आघाडी पक्षांपेक्षा वेगळ्या लाइफलाइन जिवंत ठेवण्याची राजकीय चलाखी दिसली. त्यामुळे अपरिहार्यतेच्या भावनेतून आघाडी मित्रांनी गृहित धरु नये ही दक्षता दिसते.
कृतीची जोड मिळेल?
अर्थात उद्धव ठाकरे हे राजकीय नेते आहेत. सर्व काही चांगलं, जनहिताचं बोलतील असे नाही. राजकारण म्हटले की स्वार्थ असतोच. त्यातून काही मांडणे काही टाळणे हे असतेच असते.
शेतकरी हत्याकांडावर आक्रमक झालेले उद्धव ठाकरे राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या दहा हजार कोटींच्या मुद्द्यावर खूप बोलले नाहीत. ती नुकसानभरपाई अपुरी असल्याची टीका आहे. पण त्यांनी तो विषय काही वेळेतच आटोपला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट भाजपा नेत्यांची लायकी काढली. पण तसे करताना त्यांनी सावरकरांना माफीवीर वगैरे म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांविषयी मौनच साधले. लोकांपुढे भाजपाला अडचणीत आणण्यासाठी हा मुद्दा न्यायचा असेल तर सत्तेतील मित्रांच्या वक्तव्यावरही त्यांना भूमिका घ्यावी लागेल, किंवा त्यांना संयम शिकवावा लागेल.
राज्यात ते सध्या सर्वाधिक लोकप्रिय नेते मानले जातात. त्यांची राजकारणविरहित प्रतिमा त्यांना फायद्याची ठरताना दिसते. लोक त्यांच्यात आपला माणूस शोधतात. पण एकीकडे हे सारं चांगले असले तरी आता आपल्या माणसानं आपल्या माणसांसाठी जास्तच करावं अशी लोकांचीही अपेक्षा असते. आता तसे होणे अशक्य नसले करी सोपेही नाही. ते केले नाही तर लोकांचा अपेक्षाभंग ठरलेलाच.
पण एकंदरीतच एकंदरीतच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण हे शिवसेनेसाठी अत्यावश्यक असणारा बुस्टर डोस देणारे ठरु शकते, अर्थात पुढे त्याला तशी कृतीची जोड मिळत गेली तर!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ या मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत.)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite