मुक्तपीठ टीम
ठाकरे राणे म्हटलं की विस्तवही जात नाही आणि किमान राणेंकडून तरी उद्धार केल्याशिवाय दिवस जात नाही असं नातं. त्यामुळे त्यांनी एकमेकांच्या जवळच्या किंवा एकमेकांशी चांगलं असणाऱ्यांना चांगलं म्हणणं आणि त्यांचं चांगलं करणं अशक्यच मानलं जातं. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मित्राला राज्यमंत्री दर्जाचं पद दिलं आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
नेमकं काय झालं?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यातील वैर संपूर्ण राज्याला माहित आहे.
- मुख्यमंत्र्यानी ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ आणि सहकारात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले विद्याधर अनास्कर यांची राज्याच्या सहकार परिषदेवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
- सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे.
- ते सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आहेत.
- केंद्र सरकारने नवे सहकार मंत्रालय स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर अनास्कर यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे.
केंद्रीय मंत्री राणेंचे अनास्कर जवळचे मित्र
- विद्याधर अनास्कर हे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे जवळचे मित्र आहेत.
- राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अनास्कर यांचा आदराने उल्लेख केला आहे.
- आघाडी सरकार सत्तेवर येताच राणेंचे मित्र असल्या कारणाने अनास्कर यांना राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक पदावरुन पायउतार केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
- मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचं काम पाहून राज्य सहकारी बँकेवर त्यांना कायम ठेवलं.
- आता तर अनास्कर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी केली आहे.
विद्याधर अनास्कर…सहकाराचा चांगला अभ्यास!
- विद्याधर अनास्कर हे उच्चशिक्षित आणि सहकाराचा गाढा अभ्यास असणारे आहेत.
- त्यांनी सहकार क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
- अनास्कर हे सध्या राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक आहेत.
- माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्य सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.
- त्यांच्या कारकीर्दीत राज्य बँकेची चांगली भरभराट झाली.
- राज्यातील सरकार बदलल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारनं त्यांना प्रशासक म्हणून कायम ठेवलं आहे.
- वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकारांना सोबत ठेवून, त्यांच्या अनुभवाचा लाभ घेत समस्यांवर मात करण्याच्या रणनीतीनुसारच मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी त्यांची निवड केली असावी, अशी शक्यता आहे.
सहकार परिषदेचं महत्व काय?
- सहकार परिषद ही सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व बाबींवर राज्य सरकारला सल्ला देते.
- सहकार क्षेत्राचा, घडामोडींचा आढावा घेते.
- राज्यातील सहकारी संस्थांच्या कामात समन्वय साधण्याचे मार्ग सुचविणे.
- सहकारी संस्थांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्ग सुचविणे.
- राज्य सरकार परिषदेला विचारेल, सोपवेल करेल अशा सर्व बाबींवर राज्य सरकारला अभ्यास करून अहवाल देणे.
- राज्यातील सहकारी क्षेत्राच्या विकासाबाबतच्या योजना आणि धोरणे तयार करणे.
- समाजातील मागास, आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या सहकारी चळवळीचा विकास करण्यासाठी असलेल्या विद्यमान योजनांचे मुल्यांकन करणे व नवीन योजना सुचविणे.
- सहकाराद्वारे आर्थिक विकास करण्याच्या विशेष परियोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सल्ला देणे.
- सहकार खात्यामार्फत किंवा खास स्थापन केलेल्या मंडळामार्फत उपरोक्त कोणत्याही प्रयोजनासाठी अभ्यास करण्याचं काम हाती घेणे.
- एकूणच सहकार क्षेत्रासाठीच्या धोरणाची अंमलबजावणी आणि नियंत्रण यात सहकार परिषद ही खूप महत्वाची भूमिका पार पाडते. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी स्थानिक राजकारणावरही होतो.