अपेक्षा सकपाळ/मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा उद्रेक वाढत असतानाच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रोज अनेकांना प्राण गमवावे लागल्याच्या बातम्याही हादरवून जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकारच्या प्रयत्नांनी रेल्वे, हवाईमार्गे जरी ऑक्सिजन आणला तरी तो रुग्णांपर्यंत पोहचवणे सोप नाही. कारण देशात ऑक्सिजन सिलिंडरचाही तुटवडा आहे. त्यामुळेच टाटा कंसल्टिंग इंजिनीअर्सच्या तज्ज्ञांनी सहज सोपा असा एक जुगाड सुचवला आहे. त्यांनी सुचवलेल्या पर्यायांनुसार, आपल्या घरातील एलपीजी सिलिंडर, फायर एक्स्टिंग्युंशर, मोठे सीएनजी सिलिंडर यांचाही ऑक्सिजन रुग्णांना देण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यासाठी फक्त काही नोजल व्हॉल्व्हमध्ये बदल आणि स्वच्छ करण्याची काळजी घ्यावी लागेल.
मुक्तपीठशी बोलताना टाटा कंन्सल्टंसी इंजिनीअर्सच्या संशोधनात सहभागी सदस्यांनी महत्वाची माहिती दिली. खऱ्या अर्थानं आऊट ऑफ बॉक्स विचार करत, पण साधे सोपे पर्याय त्यांनी सुचवल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन अत्यावश्यक
- कोरोना रुग्णांचे मृत्यू टाळण्यासाठी श्वासोच्छवासाच्या समस्येपासून त्यांना वाचवणे आवश्यक असते.
- त्यासाठी त्यांना बाहेरून जास्त दाबाने ऑक्सिजन पुरवावा लागतो.
- त्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सिलिंडर्स आवश्यक असतात. परंतु देशात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.
टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्सचा वैज्ञानिक जुगाड:
- टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सच्या टीमने मेडिकल ऑक्सिजन पुरवठा आणि ऑक्सिजन जनरेशनच्या पर्यायी पद्धतीसाठी तीन पर्याय सुचवले आहेत. इमरजेंसी ऑप्शन्स म्हणून मेडिकल ऑक्सिजनच्या वापरासाठी हे तीन पर्याय आहेत.
- सीओ २ अग्निशामक यंत्र म्हणजेच घर, दुकान, कारखान्यातील फायर एक्स्टिंग्युशरचा ऑक्सिजन सिलिंडर म्हणून वापर. त्यात किमान १२ तास राहिल एवढा ऑक्सिजन ठेवता येईल. त्यासाठी आधी आवश्यक स्वच्छता आणि नोजल व्हॉल्व्ह बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- घरातील एलपीजी सिलिंडर्सही ऑक्सिजन सिलिंडर म्हणून वापरता येतील. त्यासाठी आधी आवश्यक स्वच्छता आणि नोजल व्हॉल्व्ह बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- सीएनजीसाठी वापरले जाणारे मोठे सिलिंडरही ऑक्सिजन सिलिंडर म्हणून वापरता येतील. त्यासाठीही आधी आवश्यक स्वच्छता आणि नोजल व्हॉल्व्ह बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- टाटा कन्सल्टंसी इंजिनीअर्सच्या टीमने या तीन प्रकारचे गॅस साठवणाऱ्या सिलिंडर्सची दबाव क्षमता, मटेरिअलची क्षमता तपासली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरमध्ये गॅस स्वरुपात आणि इतर दोन सिलिंडरमध्ये द्रव स्वरुपात ऑक्सिजन योग्य दबावाखाली भरता येईल.
- किमान १२ ते ५० तास असे त्यांच्या क्षमतेनुसार ते रुग्णांसाठी वापरता येतील.
काय काळजी घ्यावी?
- घरातील गॅस सिलिंडरमध्ये एलपीजी असतो, फायर एक्स्टिंग्युशरमध्ये कार्बन डाय ऑक्साइड असतो तसेच सीएनजी सिलिंडरमध्ये सीएनजी असतो. ते मानवी शरीरासाठी योग्य नाहीत. त्यामुळे ऑक्सिजनसाठी वापर करण्यापूर्वी त्यांच्यासाठी वापरत असलेल्या सिलिंडरची स्वच्छता करून त्यांच्यात आधीच्या वायूचे कोणतेही अवशेष राहणार नाहीत, अशी काळजी घ्यावी लागेल.
- तसेच या तीन साधनांचे व्हॉल्व्ह नोजल वगैरे ऑक्सिजन पुरवण्याच्या आवश्यकतेनुसार बदलावे लागतील.
- दुसऱ्या गॅस सिलिंडरचा ऑक्सिजनसाठी वापर हा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.