रॉबिनसन डेव्हिड/ सांगली
म्हशींसाठी स्विमिंग टँक! आश्चर्य वाटलं ना? पण सांगली जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी माणिकराव आणि उर्मिला गायकवाड यांनी अद्ययावत मुक्तगोठा उभारलाय. सांगली जिल्ह्यातील चिंचाळेत चक्क म्हशींसाठी गोठ्यामध्ये स्विमिंग टँक तयार करण्यात आला आहे. चिंचाळेचे प्रगतशील शेतकरी माणिकराव गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सौ. उर्मिला माणिकराव गायकवाड यांनी मुरा म्हशीचा अद्ययावत सोयी-सुविधायुक्त ‘मुक्त गोठा’ उभारला आहे. त्यांचा मुक्त गोठा प्रयोग यशस्वी झाला आहे.
एकाच जागेत बंदिस्त राहणे कोणालाच आवडत नाही. त्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. ते ओळखूनच गायकवाड दाम्पत्याने म्हशींसाठी स्विमिंग टँक तयार केला आहे.
सांगलीतील चिंचाळे गावातील सौ. उर्मिला आणि माणिक गायकवाड याना शेतीची आवड होती. त्यांनी उंच टेकडीवर १५ एकर माळरान जमीन विकत घेऊन ती विकसित केली आहे. तेथे दोन एक एकरात मुरा म्हशीचा मुक्त गोठा उभारला आहे. इतर क्षेत्रात जनावरांसाठी विविध चारा, ऊस, साग याची लागवड केली आहे. पाच वर्षांपूर्वी चार मुरा म्हशीपासून सुरू केलेल्या मुक्त गोठ्यात आज बावीस मुरा म्हशी आहेत. कोणालाच एकाच जागी बंदिस्त राहू वाटत नाही. त्याचा परिणाम शरीरावर होतो. याला जनावरंही अपवाद नाहीत. याचा विचार करून माणिकराव यांनी मुरा म्हशीसाठी मुक्त गोठा उभारला. दोन एकर क्षेत्राला चारही बाजूने बंदिस्त कंपाऊंड केले. आत ऊन, पाऊसपासून संरक्षणासाठी निवारा उभारला. तेथे जनावरांना बसल्यानंतर जखमा होऊ नयेत यासाठी बसण्यासाठी खाली मॅट, चारा आणि पाण्याचे स्वतंत्र हौद, धुण्यासाठी शॉवर, पंखे बसवलेत. बाहेर शेतीच्या खराब झालेल्या अवजारातून जुगाड अवजारांची निर्मिती केली आहे. ज्वारी, बाजरी, मका आणि गहू स्वस्त झालेल्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी करून जनावरासाठी लागणारे खाद्य तयार केले जाते. त्यामुळे खर्चात बचत होते. कडबाकुटीच्या सहाय्याने चारा बारीक केला जातो.
म्हशींसाठी गोठ्यामध्ये स्विमिंग टँक
गोठयात पाण्याचा स्विमिंग टँक बांधला आहे. यात सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत म्हशी मनसोक्त पोहण्याचा आस्वाद घेतात. दर आठवड्याला त्यांचे पाणी बदलून शेतीला खत म्हणून वापरले जाते. प्रत्येक म्हशीला स्वतःचा कोडनंबर आहे. दर आठवड्याला ट्रॅक्टरने शेण गोळा केले जाते. देखरेखीसाठी सीसीटीव्ही बसवला आहे. एका जागेला जनावरे बांधल्यामुळे एवढेच नाही, तर स्विमिंग टँकमधील पाणी आठ दिवसांनी बदलले जाते. मुक्त जनावरांच्या गोठ्यामुळे दूध उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. दूध आणि खतापासून देखभाल खर्च भागतो. मुरा म्हशीची रेडी सांभाळून मोठी करून लाखांच्या दरम्यान विकली जातात.
अद्ययावत सोयी सुविधायुक्त मुक्त गोठा आणि म्हशींसाठीचा स्विमिंग टँक हा पंचक्रोशीतील आकर्षण ठरत आहे.