मुक्तपीठ टीम
काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेत्यांमध्ये आता महाराष्ट्रातून एक नाव समाविष्ट झालं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदेंनी काँग्रेसच्या बदलत्या संस्कृतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, “पूर्वी काँग्रेस पक्षात विचारमंथन होत असे, त्यासाठी खास शिबिरं होत असत, आता तसं होत नाही. आत्मपरीक्षणासाठी चिंतन शिबिरांची गरज असते. त्यामुळे पक्षाच्या चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा होत असत. आता कोणी काही विचारतच नाही. वैचारिक परंपरा राहिली नाही. त्यामुळे आपण सध्या कुठे आहोत असा प्रश्न पडतो. पूर्वी पक्षात शब्दालाही पक्षात किंमत होती, आता आहे की नाही, माहिती नाही!”
केवळ राज्यातच नाही तर राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात महत्वाच भूमिका पार पाडणारे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची व्यक्त केलेली खदखद ही काँग्रेसच्या जी २३ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असंतुष्ट नेत्यांशी समानता साधणारी आहे. त्यांनी जाहीरपणे माडंलेली नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे.
सुशिलकुमारांची खदखद
- पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचा अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न झाला.
- त्या सोहळ्यात सुशिलकुमारांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.
- काँग्रेसमधून भाजपात गेलेले हर्षवर्धन पाटील तेथे उपस्थित होते.
- रत्नाकर महाजन हेही ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राज्यसभेवर घेतले जावे यासाठी मी शब्द टाकेन, पण पक्षात माझ्या शब्दालाही किती किंमत आहे की नाही हेही मला माहीत नाही.
- सध्या भाजापामध्ये असलेले काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहत शिंदे म्हणाले, “शंकरराव बाजीराव पाटील यांच्या काळात पक्षात वैचारिक शिबिरे होत असत. तशा शिबिरांची गरज आणि शब्दाला काय किंमत हे त्यांना माहिती होते.
- पक्षात विचारमंथन व्हायचे. आज ते होत नाही याचे दु:ख होते.
- आज पक्षात आम्ही कुठे आहोत, हे पाहणेही कठीण झाले आहे.
काँग्रेसच्या आधीच्याच असंतोषात भर
- गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि वीरप्पा मोईली यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
- त्यांच्या समुहाला जी-२३ म्हणून संबोधले गेले.
- इतकेच नव्हे तर त्यांनी पक्षात व्यापक फेरबदलासाठी थेट मागणीही केली आहे.
- त्यांच्या त्या प्रयत्नांकडे पक्षातील बंडखोरी म्हणून पाहिले गेले. त्यामुळे सुशिलकुमारांच्या बोलण्याची दिल्लीतील हायकमांड किती दखल घेते, यावर ते म्हणतात तशी त्यांच्या शब्दाला नसलेली किंमत खरंच नाही का तेही कळणार आहे.