सुमेधा उपाध्ये
उपासना हा शब्द अध्यात्मात अग्रस्थानी आहे. उपासनेचा अर्थ म्हणजे जे अप्राप्य वाटतंय ते प्राप्य करून घेण्याचा मार्ग. असतापासून सत् निर्माण झाले अशी मान्यता आहे. म्हणजेच अव्यक्तापासून न दिसणाऱ्या परमात्म्यापासून दिसणारे हे व्यक्त जग दिसणारं सर्व निर्माण झालं आहे. व्यक्तातून अव्यक्ताकडे जाण्याचा मार्ग ज्याच्या सहाय्याने प्रशस्त होत जातो ; त्याच्यासाठी जो प्रयत्न केला जातो त्या प्रयत्नांनाच उपासना असं म्हटलं जातं. पूजा जप होम यांचा यात प्रामुख्यानं समावेश होतो. अशी मान्यता आहे की पूजे पेक्षा जपाचे महत्व अधिक आहे आणि जपा पेक्षाही होम श्रेष्ठ आहे. तसंच मंत्र यंत्र आणि विग्रह म्हणजेच मूर्ती अशी देवतांची स्वरूप मानली जातात. यातही मंत्राला सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. विविध देवदेवतांना हिंदू धर्मात पूज्य मानलं आहे.
काही धर्मांनी एक देवता आणि एक उपासना पद्धतीचा स्वीकार केला आहे. त्यांचे नियम धर्माच्या स्थापनेपासून जसं घालून दिलं तसंच आजही त्यांचं आचरण केलं जातं. मात्र, हिंदू धर्मात एकच एक देवता न मानता त्या परमात्म्याकडे जाण्याचे विविध मार्ग दिलेले आहेत. व्यक्तिने त्यांच्या आवडीनुसार देवाची निवड करावी त्यांच्या उपासनेचा मार्गही त्यांनीच निवडावा जो त्यांना सुलभ वाटेल असं सांगितलंय. याचं एक कारण म्हणजे कोणत्याही मार्गाने गेलात तरी हाईवेलाच पोहचणार हा विश्वास दिलेला आहे. एकच देव एकच धर्मग्रंथ नाही हे हिंदू धर्माचे भूषणच आहे. कोणत्याही स्वरूपाची उपासना केली तरीही ती एकच परमतत्व जे सत्य आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी पोहचणार आहे. सर्व रुपे ही त्या एकाच परमात्म्याची आहेत. ही श्रद्धा हा विश्वास दिलाय. म्हणूनच त्वं ब्रह्म त्वं विष्णु: त्वं रूद्र: त्वं इंद्र: त्वं अग्नि: त्वं वायु: …असं अथर्वशीर्षात आहेच. तसंच अन्यत्रही हाच विश्वास दिलेला आहे. आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्. सर्व देव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति|| आकाशातून पडलेलं पाणी जसं शेवटी सागरालाच जाऊन मिळतं तसंच कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा ब्रह्मालाच पोहचतो. ही अद्वैताची शिकवण आहे.
उपासनेत सर्वात महत्वाचं ठरतं ते म्हणजे आपण ज्या देवाच्या स्वरूपाची निवड केलीय तिथं पूर्ण श्रद्धा ठेवणं. विविध गुणांनी संपन्न असलेल्या विविध देवतांचं स्वरूप आहे. आपल्याला जे गुण हवेत त्या गुणाच्या देवतेची उपासना ही श्रद्धेने केली तर निश्चित ते गुण कालांतराने आपल्यात प्रवाहित होऊ शकतात, असं म्हटलं जातं. या उपासनेच्या मार्गावर चालणाऱ्यांसाठी कलियुगात आणखी एक सोपेपणा आहे. तो म्हणजे नामस्मरण. आपली नित्य कर्म करीत असताना नामस्मरण करावं म्हणजेच त्या देवाच्या नावाचा जप करीत रहावं. जेव्हा आपण कोणाचं नाव घेतो तेव्हा अर्थातच ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दिसू लागते. तसंच ज्या देवाचं नाव आपण जपासाठी निवडतो त्या देवतेची मूर्ती जी माणसांनीच घडवलीय ती समोर दृश्यमान होते यामुळे नावा सोबत एकाग्रतेनं स्मरण होत राहतं. याचा परिणाम असा होतो की हीच एकाग्रता आपल्या कामात निर्माण होते आणि त्याचं श्रेय निश्चित त्या देवास अर्पण केल्यानं अहंकार नष्ट होत जातो.
या सर्व सकारात्मक गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्वावर निश्चित परीणाम दिसू लागतो आणि यशाचा मार्ग सापडतो. उपासनेचा मार्ग मनला शांती तर देतोच पण समाधानाचे संस्कारही करत जातो यामुळे संसारातील अनेक प्रसंगात विवेकबुद्धिने निर्णय घेतले जातात. विवेकसंपन्न निर्णयाने निश्चितच कार्यपथ प्रशस्त होतो. उत्तम संस्कारांच्यामुळे नातेसंबंध सुधारतात. सर्वांच्या आत्मसन्मानाचा विचार न कळत होतो. या चराचरावर त्या एकमेव परमात्म्याची सत्ता असल्यानं तोच सर्व सांभाळत आहे. अशा प्रगल्भतेने व्यक्तिचे जीवन पूर्ण भरून जाते. अनामिक तृप्तता असते. उपासनेचा मार्ग जो स्वीकारतो आणि श्रद्धेतून व्यावहारिक जगात आपले निश्चित कर्म करीत राहतो, अशी व्यक्ती निश्चितच सर्वप्रिय होते. संपूर्ण जीवनावर उपासनेच्या संस्कारामुळे एक दिव्य प्रकाश पडत राहतो त्यातून व्यक्तिचे जीवन उजळून निघते. म्हणून उपासनेचा जो योग्य वाटेल, सहज साध्य वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून त्या परमात्म्याच्या प्राप्तिचे ध्येय निश्चित गाठता येते.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)