सुमेधा उपाध्ये
आपल्या समाजातील वास्तव्यात विविध तऱ्हेचे संस्कार आपल्यावर होत असतात. पण आपण ठरवलं की मी चांगल्या भब्दांनाच ऐकेन. चांगल्या शब्दांच्या प्रेरणेतून आपले भविष्य घडवेन यासाठी तसंच स्फूर्तीदायक श्रवण करेन, तर असा संकल्प केला की अर्धे काम पूर्ण होते आणि विश्वासाने त्या दिशेनं टाकलेलं एक एक पाऊल प्रगतिची दालनं उघडत जातं. याचा अर्थ चांगल्या प्रेरक शक्तीसाठी तसंच प्रभावी ऐकणं उच्चारणं आवश्यक असतं. यासाठी एका कथेचा आधार घेऊया.
एकदा देवांना युध्दासाठी असूरांनी आव्हान दिलं तेव्हा देवांचा राजा महापराक्रमी असूनही त्याला आपल्यासह सर्व देवांचा पराभव होणार अशी भीती वाटत होती. तो युद्धापूर्वीच शस्त्र टाकून बसला. त्याला काहीही सूचत नव्हतं. देवतांची संख्या कमी आणि असूरांची सेना प्रचंड होती. अखेर त्याने शिवाकडे धाव घेतली. त्यावेळी भगवंतांनी त्याला ऊँ कडे जाण्यास सांगितलं. त्यानुसार त्याने ऊँ कडे जाऊन आपल्याला सहाय्य करा आपली शक्ती समस्त देवतांना द्या अशी विनंती करण्याचं ठरवलं. शोधत शोधत ऊँ समोर ते आले तर काय आश्चर्य अत्यंत तेजस्वी आणि असीम शांत मुद्रा पाहून इंद्रदेव प्रभावीत झाले. इंद्रदेवाने आपला प्रस्ताव समोर ठेवला. इंद्रदेवाच्या प्रस्तावावर विचार करण्याचे ऊँ ने मान्य केलं पण एक अट घातली. इंद्रदेवामध्ये ऊँ च्या केवळ दर्शनानं प्रचंड शक्ती संचरीत झाल्याचं जाणवलं. त्यांनी उँ ची अट मान्य करण्याचं ठरवलं. ऊँने सांगितले कि – “न मामनीरयित्वा ब्राह्मणा ब्रह्म वदेयुर्यदि वदेयुरब्रह्म तत् स्यादिति||“ याचा अर्थ असा की – माझं म्हणजेच ऊँ च्या प्रथम उच्चाराशिवाय ब्राह्णांनी वेदांचं पठण करू नये. माझ्या नावाचा उच्चार सर्वात प्रथम करावा. ऊँ च्या उच्चाराशिवाय एखाद्या ब्राह्मणाने वेदपठण केलं तर देवतांनी त्याचा स्वीकार करू नये.
देवतांकडे सर्वकाही होते फक्त ते आपलं सामर्थ्य हरवून बसलेले होते. त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता त्यांना शाब्दिक उत्साहवर्धक शब्दांच्या शक्तीची गरज होती. त्यांच्या साठी शाब्दिक शक्तिचा संचार करण्याची गरज होती. हीच स्थिती ओळखून ऊँ ने याच संधीचं रूपांतर आपल्या प्रचार प्रसारासाठी केलं. असूरांना हरवण्यासाठी शक्तिची प्रचंड आवश्यकता होती म्हणून देवतांनी ऊँ ची अट मान्य केली. नंतर ऊँ ने देवतांचं नेतृत्व केलं. सर्व सेनेच्या पुढे ऊँ उभे राहून देवतांना म्हणाले- माझ्या नावाचा उच्चार करीत सर्व शक्तिने असूरांशी युद्ध करा विजय निश्चित आहे. सर्व देवतांनी ऊँ ऊँ ऊँ… म्हणत असूरांशी युद्ध केलं आणि संख्येने कमी असलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या देवतांमध्ये ऊँ च्या नेतृत्वाने शक्तिसंचार झाला. देवतांनी ऊँ शब्दाच्या सहाय्याने बलाढ्य असूरांचा पराभव करून त्यांना पळवून लावलं. तेव्हापासूनच ऊँ शब्दाची जागा प्रथम स्थानी निश्चित झाली आणि देवदेवतांच्या मंत्रांच्या आधी ऊँ शब्दाचं उच्चारण केल्यानं त्या मंत्रांचा प्रभावही वाढत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
आयुष्यातील अनेक कठिणातील कठिण प्रसंगी सुद्धा ऊँ चा जप केल्यानं मनाला उभारी येते. अद्भूत शक्तिप्राप्त होते आणि मनावरील मळभ दूर होऊन परिस्थितीशी झुंजण्याची शक्ती प्राप्त होते. अनेक संकटात ऊँ चा आधार जीवनदायी ठरला आहे. युगानयुगे या ऊँ चा गौरव करण्यात आलाय ते त्याच्यातल्या शक्तिमुळेच. त्यामुळे ऊँ ची आत्मविश्वास जागवण्याची आणि निराशेवर मात करण्याची शक्ती कित्तेकांनी वाखाणली आहे. ऊँ ब्रह्मबीज आहे. ऊँच्या सूक्ष्म ध्वनी लहरी आसमंतात कम्पनं करत पसरतात. त्यातून चारही दिशेला आत्मविश्वास आणि शक्तिचा संचार होतो.
म्हणूनच अलिकडे विश्वावर पसरलेल्या करोनाच्या संकटातही दिवसभरात कधीही कितीही वेळा ऊँ चा जप करा असं सांगितलं जातंय. वाईटावर विजय प्राप्त करायचा असेल तर अ उ म् या तीन मुळाक्षरांपासून बनलेल्या ऊँ या शब्दाचा सजगपणे उच्चार करीत राहणं आवश्यक आहे. आपल्याकडील पुराण कथांमधून आणि आजीच्या बटव्यातून खूप काही शिकण्यासारखं आहेच. पण अलिकडच्या काळात त्याकडं आपलं दुर्लक्ष झालंय. आपल्या मूळ संस्कृतिकडे पुन्हा वळण्याची हिच वेळ आहे. जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करून जे पिढ्यानपिढ्या चालत आलंय ते आपणही पुढील पीढिला वारसा रूपाने देण्याची गरज आहे. जे जे चांगलं उच्चाराल ते ते तेवढ्याच चांगल्या पद्धतिने आपल्याकडे परत येत असतं. नैराश्यावर अंधारावर विजय मिळवायचाय. नकारात्मकता सोडून या सुंदर सृष्टीचं चक्र असंच अविरत सुरू ठेवयचं आहे. सद्यस्थितीत करोनाने आपल्याला क्षणभर थांबून पुन्हा मागे वळून पाहण्यास भाग पाडलं आहे. त्यामुळे या चांगल्या शब्दांची जादू आपणही अनुभवण्यास काय हरकत आहे?
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)