सुमेधा उपाध्ये
प्रत्येक जीवाची निर्मिती त्या त्या समुह गटाच्या वैशिष्ट्यांच्या आधारे सारखीच घडवण्याचे कसब त्या सृष्टीकर्त्याने साधलेले आहे. यानुसार प्रत्येक मानवास एक सारखेच घडवलेय. मात्र, प्रत्येकाच्या जन्मानंतरच्या जडणघडणीनुसार आयुष्य वळण घेत जाते. ही जी वळणं आहेत त्यावर प्रत्येकाचे प्रारब्ध संचित त्याचा प्रभाव पाडत असते. कारण हे प्रारब्ध आपल्याच कर्मगतीचे फळ असते. पाप – पुण्य म्हणजे नक्की काय हे दिसत नसलं तरीही त्यामुळे संचित कर्म त्याची फळं वेळ प्रसंगी देत असतात. आपण कुणाचे भले केले असेल तर त्यांनी मनापासून दिलेल्या आशीर्वादाने पुण्य संचय होते . पण जर कुणास खूप दुखावले असेल किंबहुना त्याच्या आत्म्यास ठेच पोचली असेल तर नक्कीच ते पापसंचय वाढवते. मग जेव्हा आपल्याला सुख संपत्ती समाधान मिळत असतं तेव्हा नक्कीच आपली पुण्याई फळास आलेली असते.
याउलट जेव्हा दु: ख, संकट, कटकटींचा सामना करावा लागतो. धनाची चिंता वाढते तेव्हा निश्चित आपल्याच पाप कर्मांनी संधी साधलेली असते. मग यातून मार्ग कोणता काढायचा? तर हे आपल्याच हाती असतं. आपल्या एकेका कृतीचा नीट विचार करावा. मग लक्षात येतं की पुण्याईची बँक खर्च होते तेव्हा ती भरत राहणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्यासारखंच इतरांनाही महत्व आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा आपल्या हाती सत्ता येते, लक्ष्मी येते तेव्हा आपल्यापेक्षा जे दुर्बल आहेत, गरजू आहेत, मुक प्राणी-पक्षी आहेत; त्यांच्यासाठी काही ना काही कार्य करावं. दत्त महाराजांची शिकवण आहेच- ‘भूखे को रोटी और प्यासे को जल देना’.
हेही वाचा: #अध्यात्म वर्तमानाचा आनंद हा सुखाचा ठेवा
अन्नदानाचं महत्व आहेच. तसंच सत्ता हाती आली की जास्तच सावधान व्हावं. इथं सत्ता याचा अर्थ अधिकार असा घेऊया. समजा एखादा उच्चपदस्थ अधिकारी आहे – तर त्यांनी त्याच्या सहाय्याने लोकांची कामं करावीत. गरजूंना नोकरी द्यावी. असं केलं तर पुण्य गाठीशी येतं. जर हाती अधिकार आहेत म्हणून लोकांची कामं केली नाहीत. दहा वेळा कार्यालयात फेऱ्या मारायला लावल्या तर ती व्यक्ती त्रासेल. वेळ व जाण्यायेण्याचा खर्च परवड नाही, म्हणून संताप व्यक्त करेल. अशी दुखी व्यक्ती आशीर्वाद कशी देईल? हा अधिकाराचा गैर वापर आहे . तसंच साध उदाहरण घेऊ- समजा एखादा कंडक्टर आहे. त्याने वाजवलेल्या बेल नुसार गाडी धावेल आणि थांबेल. एखादी व्यक्ती ती गाडी पकडायला धावत असेल ते पाहून मुद्दामहून कंडक्टरनं गाडी सोडली तर हा अधिकाराचा दुरुपयोग आहे. उलटपक्षी धावणाऱ्यासाठी दोन मि. गाडी थांबवली तर धापा टाकत तो चढेल आणि थँक्यू म्हणेल. म्हणजेच मनापासून आशीर्वादच देईल यामुळे पुण्यच वाढेल. हीच स्थिती सर्व क्षेत्रासाठी लागू आहे. अगदी सत्ताधारी असोत नगरसेवक असोत, आमदार खासदार असोत सर्वांसाठीच. त्यामुळे देवाने आपल्याला दिलेली संधी ओळखून तिचा उपयोग कसा करायचा हे आपणच ठरवायचं असतं. पुण्य की पाप संचय, ठरवता आलं तर जीवन सार्थक होईल. म्हणजेच सद्गुरू वामनराव पैं म्हणतात तसं- तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
या सत्कर्मांमध्ये ज्ञानदानही आलेच. जे जे आपणासी ठावे ते ते सकळांसी सांगावे. शहाणे करून सोडावे अवघे जन. आपण ज्ञानदान करून कुणास मार्ग दाखवला, त्यातून त्याचे भले झाले तर आपले पुण्य वाढणारच. पण असं करताना आधी स्वत: ज्ञानी असावं लागतं. अन्यथा भूलथापा देणं, धुपारे -अंगारे देऊन उगाच लोकांना नादी लावणारे गल्लोगल्ली खूप आहेत. ते फक्त स्वत: चा स्वार्थ साधतात. पण लोकांना लुबाडणे हे ही पापच आहे. अस सद्गुरू वामनराव पैं नी म्हटलंय. त्यामुळे आपल्याजवळ जे जे उत्तम आहे ते समाजासाठी उपयोगी पडावं म्हणून खर्च करणं पुण्याई आहे. पुण्य कमावण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे नाम आणि परमात्म्याचे स्मरण ठेवणं. आपण जे जे करतोय ते आपल्यातील परमात्मा पहात आहे. किंबहुना तोच हे सर्व घडवत आहे, याचं सतत स्मरण असेल तर कायम सर्वांचं भलंच साधलं जाईल.
हेही वाचा: #अध्यात्म धार्मिक कथा कथन – श्रवण यातून मानव कल्याण
राजाच्या घरी लक्ष्मी रूप बदलून जाते. कारण तिला वाटतं तिथं गेलो तर राजा सर्वच प्रजेचेच कल्याण करेल. मात्र वृद्धेचे रुप घेतलेल्या लक्ष्मीला राजाची उन्मत्त राणी ओळखत नाही आणि तिला हाकलून देते. या अपमानाने लक्ष्मी तिथून त्वरीत निघून जाते…अशी गुरुवारच्या लक्ष्मीव्रतेची कहाणी आहे. इथं भाग्य आलं द्वारी पण राणी उन्मत्त झाली. हातची पुण्याई गेली आणि राज्यही गेलं. त्यांमुळे आपल्या हाती आलेली सत्ता अधिकार याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे विवेकाने ठरवायचे. नामस्मरणाने त्या परम दयाळु परमात्म्याचे आभार मानले पाहिजेत.
यातून हे स्पष्टच आहे की, चराचरावर अधिराज्य असलेला तो एकमेव सत्ताधीश आहे आणि आपण त्याची लेकरं आहोत. त्याच्या इच्छेनुसार कार्य करावे आणि सर्व प्राण्यात प्रगल्भ असणाऱ्या मानवाने आपलं जीवन कसं घडवायचं ही दिशा ठरवली पाहिजे. आपल्या सुख दु: खांचा हिशेब मांडणारा तो परमात्मा आहे त्याचे स्मरण सतत करून त्याच्या इच्छेने मार्ग आखला तर जीवन सफल होईल. आपलं भाग्य आपल्या हाती आहे मात्र, ते ओळखून लोककल्याण करावं, हिच परमात्म सेवा आहे.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
Nice
खूप खूप छान संदेश दीला आहेस फक्त वाचन नाही तर जिवनात आत्मसात पण केले पाहिजे,
असे लेख नेहमी देत रा हावे ही विनंती.
खूप छान लिहल आहे आणि वास्तव जीवनात ह्याची प्रचिती नेहमी येत राहते…..
Chhan ch .. sadhya sopya shabdat …