सुमेधा उपाध्ये
सद्यस्थितीत समाजात भयाचे वातावरण आहे. सगळ्यांनाच आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. मनुष्याचा मुळ स्वभावच सुखाचा शोध घेत राहणं आणि सुखाच्या प्राप्तिच्या विचारात राहण्याचा आहे. सगळ्यांना सुखच हवं. दु:ख मागणारी एकच होती ती म्हणजे कुंती. तिला ठावूक होतं- जो पर्यंत दु:ख आहे तोपर्यंत श्रीकृष्ण सोबत आहे. बाकी आपण सर्व कलियुगातील माणसं सुखाचा ध्यास घेऊन जगणारे आहोत. तरीही सुखाचा रस कमी आणि दु:खाची चिपाडेच वाट्याला अधिक येतात. त्यातून अनेकजण निराश होतात. अशा नैराश्याने ग्रासलेल्यांसाठी आपल्या संतपरंपरेने भक्तिमार्गाची ओळख करून दिलीय. भक्तिमार्गावर चाललो तर अखंड सहज सुखाची प्राप्ती होईल असं त्यांनी सांगून ठेवलंय, तरीही हा मार्ग सोपा नाहीच. भक्तिमार्गावर चालण्यासाठी आधी मनाची चांगली मशागत करावी लागते. अहंभाव सोडावा लागतो. सोSहंम् भावाची कास धरावी लागेल.
भक्तीची वाट सद्सद् विवेक बुद्धिनेच चालावी लागते. तरीही समाजात अगदीच दुष्काळ नाही, भक्तीची अगदी क्षीण किरणं अधून मधून दिसत असतात. आता यासाठी ते कदाचीत फार साधना करीत असतील किंवा अखंड नामस्मरणात असतील असं नाही. पण आपल्या सत् विचारांनी, सत् कर्मांनी त्यांच्यात आशेचे किरण दिसत असतात. समाजातील दीनजनांची सेवा करणं हे सुद्धा त्या परमात्म्याच्या पसंतीस उतरणारे कार्य आहे. स्वत:चं हित दूर सारून मी समाजाचा एक भाग आहे त्यामुळे समाजसेवेचे व्रत एखादा स्वीकारतो. त्यावरून निष्ठेने चालत राहतो. त्यामुळे अनेक सत्कार्य घडतात. समाजसुखा समोर स्वत:च्या सुखाचा त्याग करणारे आहेत म्हणजे इथंही स्व चा त्याग केल्याने अहंम् नाही. मात्र, जागृतता हवीच. मी समाजाची सेवा करतो हा अहंकार नसावा. हा अहंम् जागा होऊ नये यासाठी सावध असावं लागतंच. अशीच अवस्था परमात्म्याच्या भक्तीची आहे. मी त्या सृष्टीकर्त्यांची भक्ती करतो असा अहंम भाव जागृत होऊन उपयोग नाही. भक्तीमार्गातील अशी धोक्याची वळणं कायम सावधान होऊन पुढे चालायची असतात. अनेकांना अखंड नामस्मरणाने स्वत:च सिद्ध झाल्याचा भाव उत्पन्न होतो आणि इथंच घसरण्याचा धोका अधिक असतो. हा भक्तीचा मार्ग सुकर कसा होईल यासाठी संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात फारच सुंदर समावलाय. पण आपली ओळख भक्ती मार्ग या शब्दाशी असते.
हेही वाचा: #अध्यात्म आपले जीवन आपणच घडवतो
प्रत्यक्ष त्यावरून कसं चालायचं हे माहीत नसतं. त्यामुळे जसं भौतिक जगात वावरताना आपण प्रत्येक कर्माचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. केलेली सर्व कामं म्हणजेच कर्म मी केली हा अहंम् भाव सतत जागता ठेवतो. तेच या भक्तिमार्गाने चालताना होऊ शकते. माणूस सवयीचा गुलाम असतो. त्यामुळे भक्तीमार्गाने चालताना म्हणजेच साधना करताना मी जागृत होऊन कसं चालेल? मी साधना करतो किंवा मी इतकी माळ ओढतो असं म्हणणे म्हणजे कर्तेपणा स्वत:कडे घेणे आले. इथंच पहिली चूक होते. साक्षात भगवान कृष्ण म्हणतात- मज अर्पिती हातवटी| अवघड वाटेल जगजेठी | ज्यासी आवडी माझी मोठी | त्याची दृष्टी मदर्पण||65|| कृष्णी निश्चळ ज्याचें मन| त्याचे कर्म तितुके कृष्णार्पण| त्यासी न अर्पितांही जाण | सहजें मदर्पण होतसे||66||
दहाव्या अध्यायात श्रीकृष्णांनी स्वत:असं सांगितलेलं आहे. कर्म मला अर्पण करणं आधी अवघड वाटेल पण ज्याला माझी आवड लागली असेल त्याची दृष्टी मला अर्पण असते. ज्याचं मन माझ्या ठायी निश्चल झालं आहे त्याची सर्व कर्म मलाच अर्पण होत असतात. याची त्या साधकालाही कधी कधी जाणीव नसते. कारण तो माझ्यात सामावलेला असतो. त्याचं मन भगवंताच्या आवडीने रंगून गेलेलं असतं. असा साधक भगवंतापासून विभक्त होत नाही. भक्त प्रल्हादानेही अशाच भक्तिने भगवंताला आपल्यात सामावून घेतले त्यामुळेच प्रत्येक वेळी त्याच्या रक्षणासाठी भगवंतांना यावेच लागले. अशी असंख्य उदाहरणं आहेत- अशा भक्तीने भगवंताला वारंवार अवतार घ्यावे लागलेत आणि अनेकदा या पृथ्वीतलावर यावे लागले आहे. असा साधक जो भक्तीमार्ग आखतो तो मार्ग अनेकांच्या सुखासाठी तयार होत जातो. भक्तीचा मार्ग अहंम् दूर ठेवणाऱ्यांसाठी मग प्रशस्त होत जातो.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)
Nice