सुमेधा उपाध्ये
अनेकदा आपल्या संसारी माणसांचे असे होते की आपल्याला सतत एक एक समस्या सतावत असते. आपण संसार करतो तो एका दृष्टीने परमार्थाचे कार्य करीत आहोत हा भाव त्यात नसतोच. तेवढा विचार दररोजच्या गरजा भागवताना मनात येत नाही. कधी छोट्या तर कधी मोठ्या समस्या अचानक डोके वर काढतात आणि संसारी माणसे भांबावून जातात. मग त्यांना तारणहार एकमेव परमात्मा आठवतो आणि नंतर मंदिरासमोरची रांग वाढतच जाते. आपण सतत देवासमोर एक एक समस्यांचे गाऱ्हाणे गात राहतो आणि सतत फक्त सुखाची अपेक्षा करतो. त्यामुळे मधूनच येऊन गेलेल्या सुखाचाही आपल्याला विसर पडतो. सुखाच्या काळात आपण परमात्म्याची आठवण कीती काढतो? त्याचे उत्तर प्रत्येकाचे प्रामाणिक मन किमान मनातच देईल. नोकरीत बढती मिळाली… व्यवसायात यश मिळाले… परीक्षेत यश मिळाले की आपण अभिनंदनाचा वर्षाव झेलण्यात मग्न होतो. तेव्हा मंदिरात जाणे म्हणजे रांगेत उभे राहून खूप वेळ जाणार ही चिंता वाटते आणि उद्या उद्या करत जातच नाही. पुन्हा चक्र फिरते आणि पुन्हा त्याच रांगेत आपण उभे राहतो. अशा संसाराच्या चक्रात अडकलेल्यांना देवा समोर उभे राहून नेमके काय मागावे हेच समजलेले नाही.
सुखाचे दिवस काय अन दु:खाचे दिवस काय हे येणार जाणार. मुळात काळच कुणासाठी थांबत नाही तर ते दिवस तरी कसे स्थीर राहणार. त्यामुळे आपल्याच कर्मांच्या राशीने जमलेले प्रारब्धाचे गाठोडे आहे. त्याचे माप वेळोवेळी पदरात पडणार हे समजून घेतले पाहिजे. राम, सीता, कृष्ण, द्रौपदी, शंकर पार्वती अशा कुणालाही आपले प्रारब्ध बदलता आले नाही. त्यांनीही दैवी शक्ती असूनही वेळोवेळी मनुष्य जन्म घेतला आणि प्रारब्ध संचित भोगूनच संपवले. कोणताही महापराक्रमी राजा असला तरीही त्याच्या वाट्यासही त्याचे प्रारब्ध आलेच. पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचा एक मोठा भक्त होता. त्यांची पत्नी आजारी पडली पण हे स्वामींना सांगण्याचे धाडस होत नव्हते. चार दिवस झाले आता उद्या सकाळी निघावे लागणार. याच विचारत झोपी गेले. सकाळी उठून तयार होऊन स्वामींना भेटण्यास गेले नमस्कार केला. तेव्हा स्वामींनी सांगितले सोSहंम् भजन करीत रहावे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार कधी प्रचंड सुख तर कधी शारीरिक त्रास हा सहन करावा लागतोच. जसे सुख आऩंदाने उपभोगतो तसेच दु:खही कर्माचा प्रसाद म्हणून स्वीकारावा. स्वामी एवढेच बोलून गप्प झाले. त्यांना त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि त्यांची पत्नीही पंधरादिवसात हे जग सोडून गेली. एवढे मोठे स्वामी पण त्यांनीही कधीच कोणाच्या प्रारब्धात ढवळाढवळ केली नाही. त्यामुळे आपल्या वाट्याचे सुख दु:ख आपण संसारी लोकांनी शांत चिंताने परमात्म्याच्या सतत नामस्मरणाने भोगूनच संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
खरं तर कधी कधी मला वाटते की आपल्याला परमात्मा समोर काय मागावे हेच कळत नाही. संकटकाळात न डगमगता न खचता श्रद्धापूर्वक परमात्माचे स्मरण करत रहावे. दु:ख सहन करताना कमालीचे धैर्य लागते, एक शक्ती लागते. ती या नामातून प्राप्त होत जाते. धैर्यशक्ती मागावी ती अखंड नामातून मिळेल यावर विश्वास ठेवावा. विवेक बाळगावा आपल्याला लगेच कळले नाही तरीही परमात्मा ती साधकास निश्चित देत असतो. या धैर्यशक्तीच्या आधारेच संकटाचा काळ सरतो. त्याची प्रचिती भक्तास येतेच. त्यामुळे परमात्म्याजवळ दु:खच नको संकटे नको म्हणण्यापेक्षा ती तर येतीलच पण तो काळ सरत असताना लागणारी धैर्य व शक्ती मिळावी, हे मागणे असेल तर सततच्या नामस्मरणाने ते प्राप्त होतेच. दयाळू परमात्मा सर्वांवर कृपा करीत असतोच. आपली श्रद्धा दृढ ठेवावी लागते. –
नित्य करावा ऐसा नेम |
पडो न द्यावा संसारभ्रम||
धरावा स्वरूपाचा काम |
साधन पंथ ||
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
Khup chan
As usual Khup sunder lekh ..
Very deep
Your use of words in right place is beautiful….
That’s the beauty of your writings…
Will look forward your articles