टीम मुक्तपीठ
आज ६ जानेवारी. बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणचा वर्धापनदिन, हाच मराठी पत्रकारितेत पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कोणाचंही राजकीय जोखड न घेता, वैचारिक मर्यादेत न अडकता मराठीत खरीखुरी स्वतंत्र पत्रकारिता करण्यासाठी आमच्या टीमनं निवडला तो हाच दिवस!
गेल्या २ वर्षात समाजातील विविध घटकांमधून आलेल्या वृषाली कोतवाल, अपेक्षा सकपाळ, रोहिणी ठोंबरे, गौरव भंडारे आणि माझ्यासारख्या नवतरुण पत्रकारांना घडवत मुक्तपीठच्या माध्यमातून संस्थापक ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांनी मराठी पत्रकारितेत वेगळा प्रयत्न केला. मुक्तपीठ किंवा अन्य कोणतंही असं माध्यम १००% स्वत:च्या पायावर आर्थिक सक्षम होत नाही. त्यामुळे अनेकांना आर्थिक रसदीसाठी राजकीय जोखड स्वीकारावे लागते. मुक्तपीठ टीमनं ते ठरवून टाळलं. पत्रकारितेशी संबंधित सेवा पुरवत आम्ही उत्पन्न मिळवलं आणि टीमचे पगार वेळेवर देत छोटा का होईना स्वतंत्र आणि स्वाभिमानी प्रयत्न केला. अर्थात मुक्त पत्रकारितेचं हे काम सोपं नाही. सर्व आव्हानं पेलता येतात, दबाव झुगारता येतो, पण आर्थिक सोंग आणता येत नाही. त्यामुळे भविष्यात काही कटू निर्णयही घ्यावे लागू शकतात. पण एक नक्की, आमची टीम पदभ्रष्ट होणार नाही!
भोईटेसर सध्या एका न्यूज चॅनलच्या उभारणीच्या नव्या आव्हानाला पेलत आहेत. ते सोबत नसले तरी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आम्ही गेले ६ महिने आणि त्यांच्यासोबत २ वर्ष वाटचाल केली. मुक्तपीठच्या आजच्या २ ऱ्या वर्धापन दिनी मी जास्त काही मांडणार नाही. भोईटे सरांनी पहिल्या वर्धापन दिनी मांडलेली भूमिका त्यांच्याच शब्दात तशीच मांडते…
कणा आणि बाणा असलेल्या पत्रकारिता!
आपल्या मुक्तपीठचा आज वर्धापन दिन. आजचा दिवस पत्रकार दिनाचा. त्याच दिवशी मुक्तपीठच्या वेबसाइटचा शुभारंभ झाला. तेव्हापासून आजवर मुक्तपीठची टीम आपल्या ठरवलेल्या मार्गावर पुढे जात राहिली. हा मार्ग आहे, कोणतंही वैचारिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा. मुक्तपीठचं हा प्रवास आहे ‘कणा आणि बाणा’ असणाऱ्या पत्रकारितेचा.
गल्ली ते दिल्ली सत्ताधाऱ्यांना आवडेल तसं वागायची एक नवी पत्रकारिता सध्या सोकावली आहे. दिल्लीचे अंधभक्तही नको आणि गल्लीतील अंधभाटही बनणं नको. असा एक वेगळा मार्ग मुक्तपीठनं निवडला आहे. त्यामुळे ताठ कणा आणि स्वाभिमानी बाणा टिकवत वाटचाल सुरु आहे.
विचार कोणतेही असो. कोणतेही त्याज्य किंवा पूज्य मानून डावलायचे किंवा गोंजारायचे नाहीत. जे चांगलं ते चांगलं, जे वाईट ते वाईट, एवढी सरळस्पष्ट भूमिका असलेली पत्रकारिता ती मुक्त माध्यम पत्रकारिता. तीच मुक्तपीठची पत्रकारिता.
मुक्तपीठ या मार्गावर पुढे जाताना सोबत आर्थिक बळ नसल्याने अडचणी कमी नाहीत. त्यात पुन्हा जे सामान्य महागाईनं पोळलेले, परिस्थितीने गांजलेले त्यांच्याकडे मदत मागायची नाही, हाही निर्धार. त्यामुळे इतर काही माध्यम सेवा पुरवून मुक्तपीठचं काम चालतं. चालत आहे. आणि चालत राहिलंही. त्यामुळे वाढीला मर्यादा आहेत. माध्यमानं असं टिकून राहणं हे अवघडच असतं. पण अशक्य नसतं, हे मुक्तपीठ टीमनं दाखवून दिलं आहे. माझ्यासाठी तेच लक्ष्य आहे. माध्यम असंही असंत. माध्यम असंही चालवता येतं.
गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्राला एक वर्ष झालं तेव्हा सांगितलं तसं समविचारी व्यावसायिक सोबत घेऊन मुक्तपीठचं जे खरं स्वरुप अभिप्रेत आहे तसं मोठं करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, उगाच खोटी स्वप्नं दाखवून कुणाला फसवायचं नसल्यानं योग्य व्यक्ती, योग्य संस्था सोबत येण्यास वेळ लागेल. खात्री आहे, वर्षभरात मुक्तपीठची वाटचाल काहींना तशा व्यावसायिक सोबतीसाठी प्रेरीत करू शकेल. तसं झालं तर मुक्तपीठची टीम मोठ्या आकाशात एका मुक्त माध्यमाची झेप घेईल. अर्थात आत्मा तोच असेल!
मुक्तपीठची भूमिका मांडताना स्पष्ट केलं तसं आजही तेच सांगेन. मुक्तपीठ सर्व बातम्या देवू शकणार नाही. आताही तेवढं बळ नाही. पण शक्य तोवर सर्वांना आपल्या वाटतील अशा सर्वांच्या बातम्या देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करत राहू.
मुक्तपीठचं ध्येयवाक्य…तुमच्या साथीनंच सार्थ होऊ शकतं…साथ असू द्या…मुक्तपीठ : चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार!
निर्भीड पत्रकारिता म्हणजे मुक्तपीठ,