सुभाष तळेकर / निसर्ग
दाट झाडी आणी ओलसर असलेले भाग या काजव्यांचा वहिवाटेच्या जागा आहेत. काजव्यांच्या काही जाती रात्री कार्यरत असतात तर काही अपवादात्मक, दिवसाही दिसतात. आज करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना किटाणू नको असतात, पण हे किटाणू काजवे जैविक कचऱ्याच्या विघटनाचे मोठे कार्य पार पाडतात, परागीभवनाच्या क्रियेत ते महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक कृमी-कीटकांचा यथेच्छ समाचार घेऊन, झाडांना त्रासदायक कीटकांचा प्रादुर्भाव होऊ देत नाही. काजव्यांच्या बहुतांशी जातींमध्ये मादी ही पंख विरहित असते व अळी स्वरूपात असते. काजव्यांमध्ये रसायनांची प्रक्रिया होऊन प्रकाश निर्मीती होते. हा प्रकाश मुख्यतः मादीला आकर्षित करण्यासाठी निर्माण केला जातो.
उन्हाळा संपून पावसाळ्याच्या सुरुवातीला हवा कुंद,दमट होते अशा वेळी दाट झाडी असलेल्या प्रदेशात एक वेगळं वातावरण तयार होतं. अंधार असलेले, पाऊस नसलेले, वारा नसलेले, ढग नसलेले तरी दमट, ओलसर संध्याकाळचे वातावरण हे काजव्यांच्या प्रजननासाठी पोषक असते. हा कालावधी दहा ते पंधरा दिवसांचा असतो. असे आर्द्र वातावरण भिमाशंकर जंगलांच्या विशिष्ट भागात तयार होते. अशा वैशिष्ट्यपूर्ण रंगमंचावर काजवे आपले प्रणयाराधन सुरू करतात. सुरुवातीला एखाद-दुसरा लुकलुकणारा काजवा दिसतो व थोड्याच वेळात तिथे देखणी मैफील जमते. विविध प्रजातींमध्ये जैविक प्रकाशाचे प्रमाण, रंग वेगवेगळे असतात. त्यानुसार विविध काजव्यांचे पट्टे फुलत जातात. मधेच सगळा मंच उजळून निघतो आणि स्वर्गीय सौंदर्याचा प्रत्यय येतो. विशिष्ट जातीचे नर काजवे एकमेकांशी रासायनिक गंध वापरून संपर्क साधतात. त्यांच्या रासायनिक संवादातून ते एक एक प्रकाशबिंदू निर्माण करत, मोठा देखावा निर्माण करतात. या देखाव्याच्या मूळ प्रेक्षक, जमिनीवर बसलेल्या मादी काजवे असतात, ज्यांना उडता येत नाही. या देखाव्याला दाद म्हणून त्याही मधून मधून क्षीण प्रकाश संकेत देत असतात. नर काजव्यांकडून येणाऱ्या प्रकाशातून त्यांना काजव्याच्या प्रजनन क्षमतेची माहिती मिळत असते. मोठा प्रकाश पडणारा, जास्त वेगाने लुकलूक करणारा काजवा ‘काजविणीं’ना जास्त प्रभावित करतो. हे सर्व करण्यासाठी नर काजव्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करावी लागते तसेच भक्षकांना बळी पडण्याचा जास्त धोका संभवतो. एकदा संकेतांची देवाण घेवाण झाली की, नर काजवे खाली उतरून मादींशी मिलन करतात. आपला वंश पुढे नेण्यासाठी काजव्यांना निसर्गतःच जीवाची बाजी लावावी लागते. पुढे काही दिवसात पाणथळ जागी अंडी घातली जातात व काजव्यांचा पुढील जीवनक्रम सुरू होतो.
भिमाशंकराच्या अभयारण्यात विषेशता खेड तालुक्याच्या पश्चिम पट्याच्या शेवटच्या गावा मधुन आता काजव्यांची चमचम सुरू झाली आहे. भिमाशंकरच्या दाट झाडीत, ओलसर जागी मान्सून पाऊस सुरू होण्यापुर्वी काजव्यांची चमचम सुरू झाली आहे.
भिमाशंकर अभायरण्यातील दाटझाडी व ओलसर परिसरात त्यांची संख्या अधिक आहे. सुरुवातीला कमी दिसणारे हे काजवे आठ दिवसातच लाखोंच्या संखेने इकडून तिकडे उडत रहातात. झाडावर समुहाने उडणाऱ्या या काजव्यांच्या मोठया थव्याला आदिवासी लोक ‘ जाळी धरली ‘ असे म्हणतात . हे दृष्य विलीभनीय असते . उंबर, करंज, निरगुडी, सायर हिरडीच्या झाडांवर अधिक प्रमाणात दिसतात. दरम्यान मान्सूनचा जोराचा पाऊस सुरू झाल्यावर काजवे कमी होत जातात . जोराचा पाऊस आला नाही तर जूनच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत काजव्यांची चमचम राहील असा अंदाज आहे.
मग तुम्हाला काजव्यांची चमचम पहायची असेल तर गडद-वांद्रा, परसुल-घोटवडी, पाभे-भोंबाळे, भोरगीरी-कारकुडी या गावांच्या परिसरात वहानाने रात्री चक्कर मारावी तुम्हाला अनेक ठिकाणी या चमचमणाऱ्या काजव्यांचे दर्शन होईल.
(सुभाष तळेकर हे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.)
संपर्क 9867221310