मुक्तपीठ टीम
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीची विद्यार्थीनी प्रत्यक्षा माझेने रुग्णांना आणि ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी पडणारा शोध लावला आहे. तिने रूग्णालयात दाखल रूग्णांसाठी उपयुक्त ठरू शकणारे एक फिरते शौचालय तयार केले आहे. सिव्हिल इंजिनीअर असलेल्या वडिलांच्या सहकार्याने तिने हे बनवले आहे. हे शौचालय वापरल्यामुळे रूग्णांना उठून शौचालयाला जाण्याचा त्रास वाचेल. दीड महिन्यांपूर्वी तिचे काका राजेश माझे कोरोनाने बाधित झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले. ते आठवडाभर ऑक्सिजनवर होते. तिच्या काकांना रुग्णालयात शौचालयात जाण्याची मोठी समस्या होती. ते ऑक्सिजनशिवाय बेड सोडू शकत नव्हते. रुग्णालयात वॉर्ड्समध्ये वॉशरूम एका कोपऱ्यात असतात. मर्यादित साफसफाई करणारे कर्मचारी आणि कोरोना रूग्णांची मोठी संख्या यामुळेही खूप अडचण होताना दिसली. तिच्या काकांबरोबरच इतर रुग्णही या समस्येमधून जात होते. घरातील सर्वांना त्यांच्या समस्येबद्दल काळजी वाटायची. त्याचवेळी तिचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याने विलगीकरणात होते.
या समस्येमुळे, तिला फिरते शौचालय बनविण्याची भन्नाट कल्पना आली, जे तिने स्वत: डिझाइन केले आणि तिचे वडील सिव्हिल इंजिनीअर ब्रिजेश माझे यांच्या मदतीने तयार केले. वडिल सीपीएमध्ये कार्यरत आहेत. प्रत्यक्षाच्या म्हणण्यानुसार, हे फिरते शौचालय बनविण्यासाठी २५००० रूपये खर्च आला. गोदरेजचे व्हाइस चेअरमन बोमी गांधी यांनी ट्विट करून प्रत्यक्षाच्या या नवनिर्मितीचे कौतुक केले आहे. प्रत्यक्षा हे शौचालय काकांवर उपचार झालेल्या रुग्णालयाला दान करणार आहे. त्यामुळे ते आणखी गरजूंना वापरता येईल.
रुग्णांसाठी सोयीचे आधुनिक फिरते शौचालय
• हे शौचालय व्हील चेअर इतकी जागा घेते.
• यात वेस्टर्न कमोड सीट आहे.
• यात एक ८० लीटरची ओव्हरहेड टाकी आणि १०० लीटरची बॉटम टाकी आहे.
• हे फायबर शीट्सने झाकलेल्या लॉक व्हील्सवर बांधले गेले आहे.
• एकदा टाकीमध्ये पाणी भरले की ते ५ ते ६ रुग्णांना वापरता येते.
• वापरानंतर वरच्या टाकीमध्ये पाणी भरून, खालच्या टाकीची साफसफाई करून पुन्हा वापरात आणता येते.
पाहा व्हिडीओ: