हेरंब कुलकर्णी
बजेटमध्ये १५००० आदर्श शाळा सुरू करणे ७५० एकलव्य आदर्श शाळा आदिवासी भागात सुरू करणे याची घोषणा करण्यात आली आहे. यातून शिक्षण व्यवस्था सुधारत नसते.अशी शिक्षणाची बेटं उभी करण्यापेक्षा शिक्षणातल्या मूलभूत प्रश्नांना भिडण्यासाठी आर्थिक तरतुदीची आवश्यकता होती. दुर्दैवाने राजीव गांधी यांनी नवोदय शाळा सुरू केल्या. मनमोहन सिंग सरकारने ६५००आदर्श शाळा सुरू करण्याचे स्वप्न बघितले महाराष्ट्रात केंद्र शाळा ही अशीच कल्पना होती व आता प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा सुरू करणे सुरू आहे या संकल्पनाच मुळातून तपासून बघितल्या पाहिजेत.
अशा आदर्श शाळा सुरू केल्याने ते आदर्श किंवा उपक्रम आजूबाजूच्या शाळांमध्ये अजिबात झिरपत नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे उलट शिक्षणात अजून स्तर निर्माण होतात. हाच अनुभव नवोदय शाळा कल्पनेचा आहे. त्यातून फक्त शिक्षणाची बेटे तयार होतात व सरकारी अधिकारी केवळ अशा शाळांकडे विशेष लक्ष देतात व त्याच शाळांचे कौतुक करून सरकार शिक्षण व्यवस्थेचे अपयश झाकण्यासाठी त्यांचा उपयोग करते. तेव्हा अशा प्रकारे शिक्षणाची बेटं उभी करण्याच्या कल्पनेला विरोध करायला हवा..
नवोदय शाळांमधून ग्रामीण प्रतिभा शोधली जाईल असे सांगितले गेले होते. आज खरच किती दुर्गम किंवा अत्यंत गरीब कुटुंबातील मुले नवोदय साठी निवडले जातात ? याचा हिशोब काढायला हवा. ग्रामीण भागातील शिक्षक, कर्मचारी व संसाधने असलेल्या कुटुंबातील मुलांचे प्रमाण तेथे वाढले आहे त्यामुळे मूळ हेतूच फसला आहे.. केंद्र शाळा कल्पना तर तर बाद ठरली आहे. एकलव्य शाळा अशाच विशेष शाळा आहेत.या शाळांवर लक्ष देण्यापेक्षा आश्रम शाळां सुधारण्यावर सरकारने जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे परंतु संपूर्ण शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते प्रशिक्षणावर लक्ष द्यावे लागते व त्याहीपेक्षा उत्तरदायित्व नक्की करणे व पर्यवेक्षीय यंत्रणेवर लक्ष देऊन दीर्घ कालीन शिक्षण सुधारण्याचे आव्हान स्वीकारावे लागते हे करण्यासाठीचे गांभीर्य कोणत्याही सरकारांमध्ये नसल्याने प्रत्येक सरकार शिक्षणाची अशी बेट उभी करते व त्याचा गाजावाजा करून शिक्षणातील अपयश झाकण्याचा प्रयत्न करते हेच या आदर्श शाळांमधून पुन्हा घडणार आहे.
पोस्ट खात्याने स्पीड पोस्ट सुरू केले तर अभ्यास असे सांगतो की साधे पोस्ट पोहोचवणे इकडे दुर्लक्ष होते आहे माहितीच्या अधिकाराचे अर्ज आल्यावर एखाद्या कार्यालयात साधा अर्ज केला की त्याची दखल घेतली जात नाही..शिवशाही एसटी आल्या आणि साध्या एसटी बस अजून केविलवाण्या झाल्या तेव्हा तसेच आदर्श शाळा बाबत तसेच होणार आहे.
देशाला १०० शांतिनिकेतन हवेत, सैनिकी शाळा नकोत पण समाजाचे सैनिकीकरण करण्याच्या विचारधारेला सैनिकी शाळेचेच आकर्षण असते…
(शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि कार्यकर्ते असणारे हेरंब कुलकर्णी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या समस्या थेट जाणून घेतात, अनुभवतात आणि सोप्या शब्दांमध्ये मांडतात. त्याबरोबरच त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व काव्यक्षेत्रातही प्रसिद्ध आहे.)