जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तिच्या मनात आपल्या असण्याबद्दलचे कुतुहल कधीतरी वाढत जाते आणि त्याच्या मनात त्याबद्दलचे विचार निश्चितच घोळत असतात. प्रत्येक व्यक्तिचा पिंड वेगळा आहे. प्रत्येकाच्या जन्माचे उद्दिष्ट वेगळे आहे. तरीही त्यांच्यात एक समानता आहे ती म्हणजे तो प्रवासी आहे. काही काळासाठी या पृथ्वीतलावर आपली विशिष्ट भूमिका वठवणारे ते एक पात्र आहे. त्याच्या येण्यापूर्वीच त्याच्या श्वासांच्या इतकेच सत्य त्याचे जीवन आहे. दिलेल्या श्वासांना कसे खर्च करून तो त्याची भूमिका किती सुंदर जगणार हे त्याचे कर्म ठरवणार आहे. कर्माचे स्वातंत्र्य निश्चित दिलेले आहे. पण हे स्वातंत्र्य जबाबदारीच्या सोबतचं आहे, याचा विसर पडतो आणि आपण इथले राजे आहोत, ही समस्त सृष्टी केवळ आपल्यासाठीच देत आहे आणि देत राहणार आहे हा भ्रम निर्माण करून त्यावर अनेक इमले बांधू लागतो. पण मुळातच हे जीवन अळवाच्या पानावरील पाण्याच्या थेंबांसारखं असतं. पानावर आहे तोपर्यंत सर्व सुंदर…तोवरच जगून घ्यावं. हवेचा वेग जरा वाढला की पानावरचे जल मोती मातीतच मिसळणार. त्यांचं अस्तित्व जसं क्षणभंगूर तसंच माणसाचं अस्तित्व.
पंचमहाभूताचं शरीर म्हटलं की सगळे षड्रीपू चिकटणारच. पण त्यात आपण म्हणजे स्वत्वाची जाणीव असेल तर किती जीव गुंतवायचा? माणसाचं वागणंच तसं विसंगंत… ते थेंब पाण्याचेच आणि त्या अळवाच्या पानावरील जलबिंदूंनाच दूरुन पाहून मोती समजतो, इथंच फसतो. खरंच का कळत नाही; सत्य असत्यातील भेद आणि प्रवाहात वहावत जातो? स्वतःची प्रतिमा स्वतःच घडवतो आणि अहं जागृत करून श्रेष्ठत्वाचं प्रदर्शन मांडतो. जे सोडायला हवं… नव्हे जे सुटणारच आहे त्याला सतत कवेत घेतो आणि शाश्वताचा विसर पडत जातो. जे सत्य आहे, जे नित्य आहे तेच ब्रह्म आहे. जे दिसत नाही, जे शून्य भासते तेच ब्रह्म आहे. बाकी सर्व त्याचीच माया आहे. त्या मायेच्या पायावर आपण डोकं ठेवतो आणि त्याचीच पूजा बांधतो. भ्रमाच्या मायाजालात अडकत जातो आणि ज्यापासून जन्मलो अन्य ज्याच्यातच विलीन व्हावं असा तो एकमेव सत्य परब्रह्म त्याच्यापासून दूर जातो आणि मग त्याच्यात विलीन होण्यासाठी जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो.
कर्मफलाचा सिद्धांत माहित आहे. जे देतोय ते हजार पटीने परत येणार हे माहित आहे. दु:ख दिलं तर दु:खच हजारपटीने परत येणार आणि सुख दिलं तर तेच सुख हजारपटीने परत मिळणार हे सर्व आता माहित आहे. घोकून घोकून सूत्र लक्षात ठेवलंय मात्र त्याचं आचरण करणं जमत नाही. कर्मसूत्रानुसारच माणसाचं भूत सरलेलं आहे आणि भविष्य त्याच्या वर्तमानात आहे हे ही त्याला कळत नाही. जे रुजवतो तेच कर्माच्या शिदोरीत साचत आहे. याचाच विसर पडतो आणि नित्याची कास सोडतो. स्वार्थ सोडत असल्याचं म्हणत राहतो पण हाताच्या मुठी घट्ट आवळतो. येताना याच मुठित गतजन्मातील मातीचे कण होते आणि जातानाही मातीतच जाणार हे सत्य माहित असूनही मोह माया सोडवत नाही आणि कालचक्रातून बाहेर पडत नाही. सर्व समजूनही न समजल्याचा हा बहाणा आणि जे सोडूनच जायचेय ते सर्व माझं माझं करत भ्रम वाढवत राहतो…कित्तेकदा सदाचारी माणसंही विवेक हरवतात, प्रवाहात दुर्जनांच्या संगतीत वाहवत जातात. वादविवाद, वितंड वाढवत जातात आणि समाजात बुद्धिभेद पसरत जातो. विकल्पांच्य जाळ्यात पाय अडकतो, चित्त स्थीर होत नाही.
सज्जन आणि दुर्जन कोणास म्हणावे हाच एक भ्रम निर्माण केला जातो. माणसा माणसातील स्वार्थ वाढत जातो. समाधानाची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलत जाते, प्रत्येकजण अधिकाधिक सुखाच्या मागे पळत राहतो. सुखाच्या मागे धावताना समाधान हा शब्दच पुसट होत जातो. अपेक्षांचा बोजा वाढतो. न मिळाल्याचे दु:ख वाढत जाते.
अपेक्षांच्या पोटी दुःखाचाच जन्म होतो. या नकारात्मक भावनेच्या पाठिवर माणूस स्वार होतो, भावनांच्या स्पंदनात हरवतो, ज्याचं अस्तित्व तात्पुरतं आहे, तेच सत्य मानतो आणि हिच माणसाची खरी शोकांतिका असावी. यातून बाहेर पडण्याचा मार्ग एकच तो म्हणजे सत्याची कास पकडावी आणि जे जे समोर येईल त्याचा समाधानाने स्विकारच करावा. समाधानाने सत् ज्ञान जाणण्याचा प्रयत्न करावा. सकारात्मकतेच्या संगतीने जीवनाचे सार ओळखण्याचा नित्य सराव करावा, म्हणजे अस्थिरतेवर सहज मात करणे शक्य होते. क्षणभंगूरचा पडदा दूर होतो आणि ब्रह्म जाणण्याची तयारी सुरू होते.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षणासोबतच त्यांचा अध्यात्माचा चांगला अभ्यास आहे)