मुक्तपीठ टीम
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. तसेच हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. जालना जिल्हा हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. या जिल्ह्यात वृक्ष संवर्धनाविषयी जागृकता पाहायला मिळाली आहे. जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील श्री.रेणुका देवी संस्थान सोमठाणा हे प्रसिद्ध मंदिर आहे. सध्या सोमठाणा गडावरील श्री. रेणुका देवी व महादेव मंदिराच्या परिसरात भिक्कन सुखदेव पडूळ हे शासकीय सेवेतील अवलियाने विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली, विविध प्रकारच्या १० ते १२ लाख बियांची पेरणी केली.
भिक्कन सुखदेव पडूळ हे राज्य उत्पादन शुल्क जालना कार्यालयातील दुय्यम निरीक्षक आहेत. त्यांना शेतीत काम करायला आवडते. यामुळेच त्यांनी पुढाकार घेत लोकांपर्यंत वृक्ष लागवडीविषयी जनजागृतीचे काम केले आहे. भिक्कन पडूळ यांचं दुधनवडी गाव इथून जवळच आहे. ते या गडावर गेले असताना तिथले उजाड माळरान पाहून इथे विविध प्रकारच्या झाडांची लागवड करता येईल हे त्यांच्या लक्षात आले.आपल्या मित्रमंडळींना त्यांनी हा विचार बोलून दाखवला आणि सुरू झाली रणनीती ती रेणुकामातेचा गड हिरवागार करण्याची.
वृक्ष लागवडीची जय्यत तयारी!
- लिंबोळी,सागर गोटे,चिंच, वाल, बाभूळ, सीताफळ, जांभूळ, आंबे, आपटा, सेमल, हिरडा, बेहडा, रामकाट, करंज, आवळा, शिवन, बोर अशा आयुर्वेदिक औषधांच्या व फळ झाडाच्या जवळपास १० ते १२ लाख बिया जमावण्यात आल्या.
- आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी जेसीबी मशीनच्या साह्याने आधी डोंगरावर चर खोदून घेण्यात आले.
- पावसाचे पाणी अडवले जावे म्हणून व्यवस्थित नाली करून मग त्यामध्ये बीयाची लागवड करण्यात आली.
- पावसाळ्यात ही झाडे जगतील पण पुढे काय, तर येत्या काही दिवसात स्वखर्चाने पाईप लाईन आणून ड्रिप बसवून पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे सगळे नियोजन करूनच पावसाळ्याच्या तोंडावर रेणुका मातेच्या गडावर या बिया ११ जून आणि १४ जून या दोन दिवसांत पेरण्यात आल्या.
. त्यानंतर तयार केलेल्या चरांमध्ये, पुन्हा माती पसरवण्यात आली.ठराविक अंतरावर फळ झाडांची रोपे लावून खड्डे भरून घेतली.
भिक्कन पडूळ यांनी रेणुका मातेचा गड हिरवाईने बहरण्याचं स्वप्न पाहिले ते सामाजिक जाणिवेतून.या निसर्गाचं आपणही काही देणं लागतो या भावनेतून १० ते १२ लाख झाडांच्या निर्मितीच हे कार्य नक्कीच इतरांसाठी आदर्श ठरावे असेच आहे. आपल्याला या भागात नंदनवन फुलवायच आहे,भविष्यात इथे दाट नंदनवन होईल, त्यामुळे निसर्गाचा समतोल होण्यात थोडीफार का होईना मदत होईल.परिसरात चांगला पाऊस पडेल आणि त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा भिक्कन पडूळ व्यक्त करतात.
सोमठाणा गडावरील रेणुकादेवी व महादेव मंदिर संस्थान आणि धार्मिक आणि पर्यटन विकास योजनेअंतर्गत गडावर अनेक विकास कामे झाली आहेत. सोमठाणा गडाच्या बाजूने समृद्धी महामार्ग झाला असून येथील तलावही प्रसिध्द आहे. पर्यटनासाठी जालनेकर तिथे हमखास जातात. नवरात्रात इथे रेणुका मातेची मोठी यात्रा ही भरते.