मुक्तपीठ टीम
सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स पोस्ट टाकून एखाद्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे आता सोपे असणार नाही. सोशल मीडियावर पारदर्शकता आणण्यासाठी अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया म्हणजे एएससीआय डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘इन्फ्लुएन्स अॅडव्हर्टायझिंग’ संबंधित काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिशानिर्देशांच्या मसुद्यानुसार, “सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणजे लोकांचे मत प्रभावित करण्यात सक्षम असणाऱ्या लोकांना एखादा ब्रँड किंवा उत्पादनाच्या प्रोत्साहनाशी संबंधित सामग्रीबाबत पुरेशी माहिती जाहीर करावी लागेल”.
नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, आता सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांना एखादी क्रिएटिव्ह पोस्ट, व्हिडीओ किंवा मजकूर सामाजिक करण्यासाठी सर्वप्रथम ती एक जाहिरात आहे की नाही हे सांगावे लागेल. याव्यतिरिक्त, उत्पादन प्लेसमेंट असल्यास, ते स्पष्ट करणे देखील आवश्यक आहे.
सदर नियम यूट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लागू करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या पेड कन्टेट आणि ऑनलाइन जाहिरातीना स्पष्टपणे हायलाइट केले पाहिजेत जेणेकरुन लोक समजू शकतील की हा स्पॉन्सर्ड कन्टेट आहे.
अंतिम मार्गदर्शक तत्त्वे ३१ मार्चपर्यंत जारी करण्यात येतील
८ मार्चपर्यंत सर्व माध्यमधारक आणि डिजिटल प्रभावकांकडून या मार्गदर्शक सूचना जारी करण्यापूर्वी अभिप्राय घेतला जाईल. यानंतर ज्या प्रतिक्रिया आणि माहिती मिळतील त्याआधारे अंतिम मार्गदर्शक सूचना एएससीआयद्वारे ३१ मार्च २०२१ पर्यंत जारी करण्यात येतील. मार्गदर्शकतत्त्वाना अंतिम स्वरुप दिल्यानंतर, १५ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यानंतर प्रकाशित केलेल्या सर्व पोस्टसाठी नव्या सूचना लागू केल्या जातील.
सोशल मीडियावर पोस्ट केल्या जाणाऱ्या व्हिडीओसाठी नवीन मार्गदर्शक सूचना हे स्पष्ट करतात की, व्हिडिओवर लावला जाणारा डिस्क्लोजर लेबल अशा प्रकारे लावा जेणेकरुन युजर्सना ते सहजरित्या दिसेल. १५ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी व्हिडिओसाठी, डिस्क्लोजर लेबल किमान २ सेकंद दिसले पाहिजे. तसेच थेट प्रक्षेपणावेळी डिस्क्लोजर लेबलला वेळोवेळी ठेवले जाणे आवश्यक आहे.
एएससीआयच्या अॅपसंबंधी मार्गदर्शक सूचना
- इंस्टाग्राम: फोटोच्या वर डिस्क्लोजर लेबलला शीर्षकाच्या सुरूवातीस समाविष्ट करा.
- फेसबुक: पोस्टच्या शीर्षकात डिस्क्लोजर लेबल समाविष्ट करा.
- ट्विटर: मेसेजच्या मुख्य भागामध्ये टॅग म्हणून डिस्क्लोजर लेबल समाविष्ट करा.
- युट्यूब आणि अन्य व्हिडीओ प्लॅटफॉर्म: पोस्टच्या शीर्षकात / तपशीलात डिस्क्लोजर लेबल समाविष्ट करा.
- स्नॅपचॅट: मेसेजच्या सुरूवातीस डिस्क्लोजर लेबल टॅग म्हणून समाविष्ट करा.
- ब्लॉग: पोस्टच्या शीर्षकात डिस्क्लोजर लेबल समाविष्ट करा.