सुश्रुषा जाधव / मुक्तपीठ टीम
शिमगा म्हटलं की कोकण आणि चाकरमान्यांचं नातं काही वेगळंच असतं. गावी जाऊन शिमगा साजरा करण्यासाठी चाकरमान्यांचा उत्साह ओंसडून वाहत असतो. गेली २ वर्ष कोरोनाचा संकट काळ असल्यामुळे साजरा न करता आलेला शिमगोत्सव चाकरमान्यांनी या वर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला. मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी जमले होते. होळीदरम्यान कोकणातील अनेक गावांमध्ये ग्रामदैवतेचा पालखी सोहळा साजरा केला जातो. प्रत्येक घरात पालखी नाचवली जाते, तिची ओटी भरली जाते. अशीच एक परंपरा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंडी खुर्द काजरघाटी या गावातील. चला तर मग जाणून घेऊया काजरघाटी गावात पालखी सोहळा आठवडाभर कसा साजरा केला जातो…
शिमगोत्सवात कोकणात विविध प्रथा आणि परंपरा पाहायला मिळतात. कोकणात अनेक ठिकाणी ग्रामदैवतेच्या सजलेल्या पालख्या निघतात आणि त्या नाचवल्याही जातात. या सणांना कोकणातील प्रत्येक घरात उत्सवाचं वातावरण असतं. काजरघाटी या गावातही ६०० वर्ष जुना इतिहास असणाऱ्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी, महाकाली, व्याघ्रांबरी देवींचा पालखी सोहळा दरवर्षी नित्यनियमाने साजरा केला जातो. कोरोनामुळे दोन वर्ष हा सोहळा साजरा करता आला नाही, परंतु यावर्षी गावकऱ्यांनी हा सोहळा जल्लोषात साजरा केला. काजरघाटी या गावात १८० घरे आहेत. फुलांच्या हारांनी सजलेली, चंदनाच्या लाकडाची ही पालखी या गावात सकाळपासून रात्रीपर्यंत घराघरात मिरवली जाते. दोन वर्षानंतर या गावात प्रत्येक घरात पुन्हा एखदा पालखी मिरवण्यात आली. पालखी येणार म्हणून घराघरात आनंदाचे वातावरण होते. महिलांनी पालखीची ओटी भरली, देवळातल्या पुजारी काकांनी घराघरात गाऱ्हाणं घातलं.
सकाळपासून पालखी मिरवल्यानंतर शेवटी पालखी वस्तीला थांबते त्या घरात पालखी रात्रभर नाचवली जाते. गावात पालखी नाचवण्याची पद्धत ही खुप निराळी आहे. कधी डोक्यावर कधी खांद्यावर तर कधी कधी थर रचून पालखी गावात नाचवली जाते. गावकरी जल्लोषात पालखी सोहळ्यात सहभागी होतात. पुढे प्रथेनुसार २६ मार्च ते ३० मार्चदरम्यान संध्याकाळपर्यंत पालखी कुवारबाव, साईनगर आणि गणेशनगर या गावात ती गावभेट केली जाणार आहे. त्यानंतर पाडव्याच्या आधी संध्याकाळी ७ वाजल्यानंतर तिचं रूपं उतरवले जाईल आणि शिमगोत्सवाची सांगता केली जाईल. दूवादशीला होळी तोडली जाईल. परंपरेगत चालत आलेली ही प्रथा आणि कोरोना नियम पालन करत हा उत्सव गावात साजरा करण्यात आला.