जगदिश ओहोळ
आज कोरोना महामारीत सरकारकडून त्यावर केले जाणारे उपाय, या महामारीचा मुकाबला करण्यासाठी केले जाणारे नियोजन हे सर्व आपण पाहत आहोत. त्यातल्या मर्यादा, चुका आणि हतबलता ही आपल्याला जाणवत आहे. पण मागे वळून पाहताना लक्षात येईल कि, सण १८९० च्या दरम्यान असाच एक भयंकर साथीचा रोग आला होता. तेव्हा तर आजच्या सारख्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. माणसाने एवढी तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात प्रगतीही केलेली नव्हती आणि तुलनेने पाहिलं तर प्लेगमध्ये लोकांचा मृत्युदर अधिक होता. कोरोनापेक्षा प्लेग अधिक घातक व भयंकर होता.
त्या प्लेगशी आपल्या देशातील प्रशासन व व्यवस्था आपापल्या पद्धतीने लढत होती पण महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थांनच्या अवघ्या २३-२४ वय वर्ष असणाऱ्या लोकराजाने ज्या पद्धतीने प्लेगशी लढा दिला, उपाययोजना केल्या, जनजागृती केली, आणि जनतेचे प्राण वाचवले ते सर्व पाहिलं तर लक्षात येतं हा राजा काळाच्या पुढे आणि विज्ञानाच्या बरोबर चालणार दूरदृष्टीचा राजा होता, होय ते राजे म्हणजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज!
वाढत्या प्लेगच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी आपल्या जनतेला आधी जागृत केलं. त्या रोगाशी लढायचं म्हटल्यावर लोकांची संकल्पना स्पष्ट असावी, त्यांच्या मनात अंधश्रद्धा नसावी याची जाण यातून दिसून येते. छत्रपती शाहू महाराजांनी प्लेग विषयक माहिती देणारी, घ्यावयाची जबाबदारी याविषयीची पत्रकं तज्ज्ञांच्या सल्ल्याने छापून घेतली आणि कोल्हापूर संस्थानाच्या गावागावात वाटली. अडाणी जनतेला ते कळावं म्हणून गावागावात चौकाचौकात त्या पत्रकांचं वाचन करून घेतलं व जनतेला जागृत केलं. ‘प्लेग हा देवीचा प्रकोप’ ही अंधश्रद्धा दूर सारून ‘प्लेग हा एक आजार आहे’ त्याची आपण खबरदारी घ्यावी हे लोकांमध्ये रुजवलं व लोकांना त्या लढ्यासाठी सज्ज केलं.
दुसरं पाऊल उचललं, कोल्हापूर संस्थानात येणाऱ्या सीमा सील केल्या. चोर मार्गांनी बाहेरून येणारा माणूस प्लेग घेऊन येईल व तुम्हाला ही त्याची लागण होईल, ही जाणीव त्यांनी जनतेला करून दिली.
आज आपण या कोरोनाच्या काळात पाहतोय की ‘क्वारंटाईन सेंटर’ कशी आहेत.? का उभारायची.? पण शाहू महाराजांनी 1899 साली गावांच्या बाहेर झोपड्या उभारून ‘क्वारंटाईन सेंटर’ सुरू केली. त्यांनी फक्त एखादा माणूस वगैरे नाही तर प्लेग पासून वाचण्यासाठी गावच्यागावे शेतात, जंगलात सुरक्षित अंतरावर झोपड्या करून काही काळासाठी वसवली व जनतेला Safe Distance ठेवायला आणि आजार टाळायला शिकवले.
फक्त असे जनतेच्या माध्यमातून उपाय करून राजे थांबले नाहीत, स्वतःची जबाबदारी काय असावी.? याची राजा म्हणून त्यांना निश्चितच जाणीव होती, हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. तोपर्यंत प्लेग वर भारतात कोणतंच औषध अथवा लस आलेली नव्हती, व शाहू महाराज मात्र लस किंवा काही औषध मिळावं म्हणून धडपडत होते.
त्यातूनच त्यांना समजले की, पंजाबचे राजे रणजितसिंह यांनी जर्मनीहून प्लेग वरील काही ‘होमिओपॅथी’ची औषध आणली आहेत आणि ती प्लेगवर प्रभावी ठरत आहेत. पण राजा रणजितसिंह यांनी ती औषधं फक्त स्वतः पुरती मर्यादित ठेवली होती, त्याच्या जनतेसाठी ही नव्हती. तोपर्यंत भारतात कोठेच ‘होमिओपॅथी’ चा दवाखाना ही नव्हता व औषध ही वापरली जायची नाहीत.
मग राजर्षी शाहू महाराजांनी ती होमिओपॅथीक औषधे मिळवण्यासाठी अगदी जर्मनीपर्यंत पुरता पाठपुरावा केला आणि ती औषधे मिळवलीच पण पंजाब च्या राजसारखी फक्त स्वतः पुरती नव्हे तर जनतेसाठी ही ती औषधे उपलब्ध करून दिली आणि त्यांनी जनतेच्या उपचारासाठी भारतातील ‘होमिओपॅथी’ चा पहिला सार्वजनिक दवाखाना कोल्हापुरात सुरू केला. या गोष्टीतून आपल्याला कळतं की राजर्षी शाहू महाराज हे ‘लोकराजा’ कसे होते. खरे जनतेचे राजे होते लोकराजा शाहू महाराज!
शाहू महाराजांच्या या प्रयत्नांनी जनतेला त्या महासंकटात एक आधार मिळाला, कोल्हापूर संस्थानाचा प्लेग काळातील मृत्यूदर इतर ठिकाणाहून कमी होता, अशा नोंदी आहेत. हे सर्व कशाचे परिणाम आहेत तर, राज्यकर्ते शाहू महाराज यांनी या संकटात योग्य नियोजन करून लढाई हाती घेतली व जनतेला जिंकण्याचा म्हणजेच जगण्याचा विश्वास दिला, आणि उपाययोजना करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
आज जगात कोरोना महामारीत महाराष्ट्राच्या या लोकराजचं हे कार्य अधिक स्पष्ट दिसतं व दिशादर्शक वाटतं आजच्या राज्यकर्त्यांसाठी.
अशा महान राजाला आज स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
(लेखक महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते आहेत.)