मुक्तपीठ टीम
देशात पहिल्यांदाच एका महिलेला फाशी होणार आहे. दोषी महिलेला मथुरा येथील महिला तुरुंगातील फाशी घरात लटकवले जाईल. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी तुरुंगात तयारी सुरू करण्यात आली आहे. शबनम नावाच्या महिला आरोपीला फाशी दिली जाऊ शकते. मात्र, फाशी कधी होईल, याची तारीख अद्याप पक्की केली नाही.
आधी बेशुद्ध केले, नंतर कुऱ्हाडीचे वार केले
मिळालेल्या माहितीनुसार, अमरोहाच्या बाबनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने १५ एप्रिल २००८ ला आपला प्रियकर सलीमसोबत मिळून वडील शौकत अली, आई हाशमी, भाऊ अनीस अहमद, त्याची पत्नी अंजुम, पुतणी राबिया आणि भाऊ राशिद आणि अनीसच्या १० महीन्यांच्या मुलाची हत्या केली होती. तिने आधी सर्वांना औषध देऊन बेशुद्ध केले, नंतर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. तपासात समोर आले की, शबनम गरोदर होती, पण कुटुंब तिचे सलीमसोबत लग्न लावून देण्यास तयार नव्हते. म्हणून तिने सर्वांना मारण्याचा डाव आखला.
१५ जुलै २०१० ला ट्रायल कोर्टाने दोघांना दोषी करार देत फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंत हायकोर्ट, सुप्रीम कोर्टानेही फाशीला कामय ठेवले होते. शबनमने मुलाचा हवाला देत माफीची मागणी केली होती. २०१५ सप्टेंबर उत्तरप्रदेशाचे गवर्नर राम नाईक यांनीदेखील शबनमची दया याचिका फेटाळून लावली होती.
तुरुंगातच शबनमने तिच्या मुलाला जन्म दिला
तुरूंगात असताना शबनमने १४ डिसेंबर २००८ रोजी मुलाला जन्म दिला. तिचा मुलगा तुरूंगात तिच्याबरोबर राहिला. १५ जुलै २०१५ रोजी तिचा मुलगा तुरूंगातून बाहेर आला, त्यानंतर शबनमने मुलाला उस्मान सैफी आणि त्याच्आ पत्नीच्या ताब्यात दिले. उस्मान हा बुलंदशहरमधील पत्रकार व शबनमचा महाविद्यालयीन मित्र आहे.
उस्मानला मुलगा देण्यापूर्वी शबनमने दोन अटी घातल्या होत्या. तिच्या मुलाला कधीही त्यांच्या गावी नेऊ नये, कारण तेथे त्याचा जीव धोक्यात आहे आणि दुसरी अट अशी होती की मुलाचे नाव बदलले जावे.
१८७० मध्ये मथुरा तुरुंगात फाशी घर तयार झाले होते
महिलांना फाशी देण्यासाठी मथुरा तुरुंगात १८७० मध्ये फाशी घर बनवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर या फाशी घरात कोणत्याच कैद्याला फाशी देण्यात आली नाही. अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत पडलेल्या या फाशी घराची डागडुजी करण्यासाठी अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी उच्चाअधिकाऱ्यांना पत्र लिहीले आहे. परंतु, त्यांनी शबनमला फाशी देण्याच्या प्रश्नावर भाष्य केले नाही.