मुक्तपीठ टीम
कोरोना रुग्णांमध्ये म्यूकोर मायकोसिस पाठोपाठ कँडिडा (व्हाईट फंगस) चा वाढता धोका लक्षात घेऊन त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची नितांत गरज असून त्यासाठी या रोगाच्या उपचारावर आवश्यक असणारी औषधे पूरक प्रमाणात उपलब्ध करावीत, अशी मागणी नगरसेविका सिमा सावळे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना त्याबाबत दिलेल्या निवोदनात सिमा सावळे यांनी ब्लॅक आणि व्हाईट फंगसचे आजार किती गंभीर आहेत आणि त्याला सामोरे जाण्यासाठी महापालिकेने काय करावे याचे अत्यंत मुद्देसूद विवेचन केले आहे.
आपल्या निवेदनात सिमा सावळे म्हणतात, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असतानाच कोरोना बाधितांना म्यूकोर मायकोसिस (ब्लॅक फंगस) या फंगल इन्फेक्शन चा संसर्ग होत असल्याचे पाहायला मिळतं आहे. म्यूकोर मायकोसिसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा रोगाने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी तातडीने उपाययोजना करणे बाबत मी आपणास १० मे रोजी पत्र दिले होते. प्रशासनाने त्याची ताबडतोब दखल घेतली आणि म्यूकोर मायकोसिसच्या रुगणांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वार्डाचे नियोजन केले, याबद्दल सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्तांना धन्यवाद दिले आहेत. म्यूकोर मायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व औषधांची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी देखील केली होती. परंतु वेळेत नियोजन न झाल्याने म्युकोरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक असणारे Liposomal Amphotericin B हे औषध प्रयत्न करून सुद्धा मनपाला उपलब्ध होऊ शकले नाही, अशी खंत सुध्दा सिमा सावळे यांनी व्यक्त केली होती.
निवेदनातपुढे त्या म्हणतात, आता कोरोना रुग्णांमध्ये म्यूकोर मायकोसिस पाठोपाठ कँडिडा (व्हाईट फंगस) चा धोका वाढत असल्याचे वृत्त देशभरातून समोर येऊ लागले आहे. तज्ञांच्या मते, व्हाईट फंगसचा संसर्ग हा ब्लॅक फँगसपेक्षाही धोकादायक आहे. व्हाईट फंगसमुळे केवळ एका अवयवालाच नव्हे तर फुफ्फुसातील आणि मेंदूतील प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम होतो.
कोरोनामुळे फुफ्फुसांचे सर्वात जास्त नुकसान होते. व्हाईट फंगस देखील फुफ्फुसांवर हल्ला करते. कोरोना रूग्णांमध्ये याचा प्रादुर्भाव झाल्यास, जीवाचा धोका वाढू शकतो, असेही मत तज्ञांनी व्यक्त केल्याचे वृत्त राष्ट्रीय स्तरावरील वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. कोरोनाशी लढताना रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रुग्णांना व्हाईट फंगसची बाधा होत आहे. व्हाईट फंगसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा रोगाने बाधित होणाऱ्या रुग्णांचे उपचारासाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे
आहे.
सिमा सावळे यांनी विविध चार मुद्यांचा उहापोह त्यांच्या निवेदनात केला आहे, त्यात व्हाईट फंगसचे प्रमाण वाढत असून ते आता भविष्यात म्यूकोर मायकोसिस सारखेच साथीच्या आजाराप्रमाणेच फैलावू शकतो, अशी भीती आता डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. व्हाईट फंगसने बाधित रुग्णांचा उपचार करताना तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासू शकेल. त्यामुळे या आजारावर उपचार करण्यासाठी मनपाच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक तज्ञ डॉक्टर्स व सर्जन्सची पूरक उपलब्धता करण्याचे नियोजन तातडीने करण्यात यावे.
म्यूकोर मायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा झाला आहे. आता व्हाईट फंगसच्या रुग्णाचा उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण होण्याची शक्यत नाकारता येत नाही. त्यामुळे व्हाईट फंगसच्या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व औषधांची व्यवस्था तातडीने करण्यात यावी. मनपाच्या अंतरविभागीय पत्र व्यवहारात बराच वेळ लागत असल्याने औषधांचे खरेदी करण्यास विलंब होत आहे.
त्यामुळे आधीच तुटवडा असलेले औषधे प्राप्त करणे कठीण होत आहे. तरी विषयाचे गांभीर्य व तातडी लक्षात घेत लवकरात लवकर या आजारासाठी आवश्यक असणारी औषधे तात्काळ उपलब्ध करावी. व्हाईट फंगसचा संसर्ग टाळण्यासाठी तणांच्या मते काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना उपचारासाठी जे रुग्ण ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांचे ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर उपकरणे, विशेषत: नळ्या इ. जीवाणू मुक्त असावेत. ऑक्सिजन सिलिंडर ह्युमिडिफायर्समध्ये स्टरलाईज्ड पाणी वापरावे. ज्यामुळे रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये जाणारा ऑक्सिजन फंगस पासून मुक्त होतो. त्यांची Mucus / Fungus Culture चाचणी तातडीने केली पाहिजे. मनपाच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार कार्यप्रणाली निश्चित करावी. कोरोना व म्यूकोर मायकोसिस मुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. अशातच व्हाईट फंगसचा संसर्ग होण्याच्या भीतीने कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या मध्ये भीती अधिकच वाढत आहे. व्हाईट फंगसचा संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णांनी कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्या? व्हाईट फंगसच्या संसर्गाची पूर्व लक्षणे काय आहेत? त्यावरची उपचार पद्धती काय आहे? व्हाईट फंगसच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतरांना त्याचा धोका होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात येणार आहेत. तरी याबाबत तज्ञांच्या सल्ल्याने काही मार्गदर्शक सूत्रे तयार करून जाहीर करण्यात यावीत. जेणेकरून अशा आजाराबाबत विनाकरण होणारे गैरसमज व त्यातून निर्माण होणाऱ्या गोंधळाला वेळीच आळा घालता येईल.
निवेदनाच्या अखेरिस त्या म्हणतात, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीर, टोसिलीझुमाब इंजेक्शन्स, Liposomal Amphotericin B, वेंटीलेटर्स, बेड, ओक्सिजन बेड्स, ओक्सिजन इत्यादी व्यवस्था करताना अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला आहे. त्यामुळे व्हाईट फंगसच्या संसर्गाचा धोका असलेल्या या घातक आजाराशी मुकाबला करण्यास आपण संपूर्ण व आगाऊ तयारी विनाविलंब करावी, अशी विनंती सिमा सावळे यांनी केली आहे.