तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कल्पनेतून साकारलेल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या शंभर सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. या सदनिका ज्या भागात आहेत त्या मध्य मुंबईतील परळ भागातील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत २१ जून रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देत स्थानिक रहिवाशांच्या विरोधाकडे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत आव्हाडांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आव्हाडांनी या निर्णयाला स्थगिती मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. तर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी हा निर्णय माणुसकीला फाट्यावर मारणारा असल्याची ट्विका ट्वीटद्वारे केली. या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय वास्तव आहे, त्याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न:
म्हाडाच्या शंभर सदनिका टाटा रुग्णालयाला कशासाठी?
• टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये कर्करोगावर उपचारासाठी रुग्ण येत असतात.
• या रुग्णांवर उपचार पूर्ण झाले तरच ती रोगमुक्त होऊ शकतात.
• रुग्णाला पूर्णपणे रोगमुक्त होण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो.
• या दोन ते तीन महिन्यांसाठी रुग्णासह रुग्णाच्या नातेवाईकांनाही मुंबईत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी या शंभर सदनिका कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्यात आल्या.
• सदनिकांच्या चाव्या १६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आल्या.
जितेंद्र आव्हाडांची खंत
• आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता.
• यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही.
• बाहेरगावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
• या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे.
• याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपासून लपवून ठेवले नव्हते.
• ते आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत.
• त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेत नाही. म्हाडाच्या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द करतानाही आपण मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती.
• मात्र, याबाबत काही गैरसमज झाले असावेत.
• आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू.
भातखळकर म्हणतात…माणुसकी खड्ड्यात!
• गृहनिर्माणमंत्री जितेंद्रआव्हाड यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या निवाऱ्यासाठी जवळच्या सुखकर्ता-विघ्नहर्ता सोसायटीत काही घरे देण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत जाहीर केला होता.
• परंतु सहीच्या एका फटकाऱ्यासह मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द केला. माणुसकी खड्ड्यात.
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार आहेत.
• आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले.
• परंतु कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला.
• राजकारणाने नीच पातळी गाठली आहे.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्रआव्हाड यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या निवाऱ्यासाठी जवळच्या सुखकर्ता-विघ्नहर्ता सोसायटीत काही घरे देण्याचा निर्णय @PawarSpeaks यांच्या उपस्थितीत जाहीर केला होता.परंतु सहीच्या एका फटकाऱ्यासह मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द केला.माणुसकी खड्ड्यात. pic.twitter.com/FpCyblybwQ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 22, 2021
आमदार अजय चौधरींचे पत्र काय सांगते?
• गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सदनिका दिल्या तो भाग मध्य मुंबईतील शिवडी मतदारसंघात आहे.
• शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी स्थानिक रहिवाशांचे आक्षेप मांडणारे पत्र २१ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले.
• या पत्रानुसार, सुखकर्ता को.ऑप. हौ.सोसायटी व विषहर्ता को.ऑप.हौ.सोसायटी या पुर्नरचित इमारतींमध्ये ७५० मराठी कुटूंब राहात आहेत . सदर इमारती विकासनियंत्रण नियमावली ३३ ( ९ ) अंतर्गत पुर्नविकसित करण्यात आल्या असल्याने सदर ठिकाणी म्हाडा प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या.
• सदर सदनिका म्हाडा मार्फत तयार करण्यात आलेल्या बहुतसुचिमधील रहिवाशी व संक्रमण शिबीरातील रहिवाशी यांना कायमस्वरूपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते.
• परंतु सदनिका त्यांना वितरित न करता कॅन्सरग्रस्त रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता टाटा रूग्णालयाला देण्याबाबत निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला.
• सदर निर्णयामुळे उपरोक्त इमारतींमधील ७५० कुटूंबामध्ये चिंतेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
• भोईवाडा येथील म्हाडा गृहसंकुलामधील तयार असलेली संपूर्ण इमारत कॅन्सरग्रस्त रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता देण्यात यावी अशी मागणी सुखकर्ता व विघ्नहर्ता मधील रहिवाशांनी केली आहे.
• कोरोना विषाणू प्रार्दुभाव कर्कग्रस्त रूग्णांमध्ये मोठया प्रमाणात होत असल्याने सदर सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, असाही एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
• गृहनिर्माण विभागाच्या निणर्यामुळे उपरोक्त को.ऑप.हौ. सोसायटयांसह सदर परिसरातील कामगार स्व सदन , त्रिवेणी सदन , मेहता मेंशन , सिंधुदूर्ग इमारत , घरमशी मेंशन या इमारती मधील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .
• गृहनिर्माण विभागाने घेतलेल्या टाटा रूग्णालयातील कर्करोग रूग्णांकरिता व त्यांच्या नातेवाईकांकरिता १०० रहिवाशी गाळे देण्याबाबतच्या निर्णयास तात्काळ स्थगिती दयावी व भोईवाडा येथील म्हाडा गृहसंकुलामध्ये टाटा रूग्णालयातील रूग्णांकरिता सदनिका वितरित करण्यात याव्यात.
मुक्तपीठ विश्लेषण
• गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची खंत चुकीची नाही, त्यामागे त्यांची एक वेगळा भावनात्मक बाजूही आहे.
• भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी नेहमीच्या शैलीत टीका करताना जे म्हटले तसे माणुसकी खड्ड्यात, नीच राजकारण वगैरेही प्रथमदर्शनी वाटते.
• विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाचे नेते म्हणून त्यांनी अशी टीका करणे स्वाभाविकच.
• पण या संपूर्ण प्रकरणातील एक महत्वाचा घटक म्हणजे ज्या परिसरात या इमारती आहेत, तो परळचा परिसर, तेथे राहणारे स्थानिक नागरिक.
• गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सदर निर्णय जाहीर करताना स्थानिक जनतेचे प्रतिनिधित्व करणारे स्थानिक आमदार अजय चौधरी यांना विश्वासात घेतले असते तर स्थानिक समस्या कळली असती.
• स्थानिक रहिवाशांमधील संसर्गाची भीती ही कर्करोगाबद्दल असू शकत नाही, ती कोरोनाबद्दलची आहे, अर्थात ती दूर करता येऊ शकत नाही, असे नाही. पण कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात मुंबईतील भाजपासह अनेक पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या निवासी भागात कोरोना सेंटर नको म्हणून केलेली निदर्शने आठवली तर अशा मुद्द्यांवरील आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याविषयीच्या स्थानिक सामान्य रहिवाशांच्या भावनाही नेत्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत.
• सर्वात महत्वाचा एक मुद्दा, परळचा हा भाग एक प्रकारे मुंबईतील आरोग्य जिल्हा आहे, बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणतात तसा हेल्थ डिस्ट्रिक्ट. या परिसरात केईएम, टाटा, ग्लोबल, वाडिया ही माणसांसाठीची तर बैल घोडा हे प्राण्यांसाठीचे रुग्णालय आहे.
• या परिसरातील नागरिक रुग्णसेवेच्या मानसिकतेची मराठी माणसं आहेत.
• कोणत्याही रुग्णाला कोणतीही मदत लागली, रक्त अथवा अन्य तरीही ते सदैव तत्पर असतात. मी स्वत: काही गरजूंसाठी तसा अनुभव घेतला आहे.
• त्यामुळे एखाद्या प्रकरणात ते आक्षेप नोंदवत असतील तर त्यांच्या भावना समजून घेण्यात गैर नाही.
• तसेच आमदार अजय चौधरी सध्या दिलेली घरे ही प्रतिक्षा यादीत असलेल्यांचा हक्क डावलून दिली जात असल्याचे लक्षात आणून देत आहेत. तो मुद्दा मुहत्वाचा आहे. तसे होऊ नये.
• आमदार अजय चौधरी या विभागातील रहिवाशांच्या भावनांचा सन्मान करत तेथे नको असे म्हणताना म्हाडाच्या परिसरातील दुसऱ्या प्रकल्पाचा पर्याय सुचवत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
• त्यामुळे उगाच राजकारणाचाच विचार करणे योग्य नाही, जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर यांनी त्या स्थानिक रहिवाशांची भेट घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केली असती तर ते म्हणतात तशी माणुसकी खड्ड्यात जाण्यापासून वाचली असती.
राजकारण?
• होय, राजकारण आहेच. या निर्णयामागे राजकारण नाही, असे म्हणताच येणार नाही.
• भाजपाचे आमदार अतुल भातखळकर म्हणतात तसा मुख्यमंत्र्यांनी आता मीच बॉस आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, हे नाकारता येणार नाही.
• शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ९ जूनच्या पत्रानंतर दुसरे आमदार अजय चौधरी यांच्या २१ जूनच्या पत्र चर्चेत आले, हा निव्वळ योगायोग नसावाच.
• दोन्ही पत्र मुख्यमंत्री कार्यालयातच दिलेली आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
• मुख्यमंत्र्यांना जर भातखळकर म्हणतात तसा तेच बॉस असल्याचा मॅसेज द्यायचा नसता तर त्यांनी आव्हाडांना बोलवून चौधरींनी सुचवलेला पर्याय स्वीकारायला लावला असता, निर्णयात बदल केला असता, निर्णय स्थगित केला नसता.
• एक लक्षात घेतले पाहिजे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे अनलॉक आधीच जाहीर करणे खूप वादात सापडले, पण राष्ट्रवादीचे अनेक मंत्री सातत्याने तसे करत असतात.
• गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या तक्रारींची दखल घेत शिवसेनेची सत्ता दाखवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे कारण तेही असू शकते.
• आता आमदारांच्या संख्येनुसारच महामंडळांचे वाटप हा त्यांचा आग्रहही त्यातूनच असावा. मंत्रीपदांच्या वाटपातील शिवसेनेला मिळालेला कमी वाटा शिवसेनेतही नाराजीचा विषय आहे. त्यामुळे आता त्यांना धोका पत्करायचा नसावा.
• हे सर्व असलं तरी सरकार आघाडीचे आहे हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी विसरता कामा नये. सर्वांनी एकमेकांशी कायम संवाद ठेऊनच प्रत्येक निर्णय घ्यावा लागेल.
• नाहीतर भाजपाची बदललेली भूमिका आघाडीसाठी जास्त धोक्याची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्याच्या नेहमीच्या घोषणांमुळे प्रतिमा घसरण्याचा धोका ओळखत, “सरकार पडू द्या, पर्याय देऊ”, ही भूमिका घेतली आहे. ती जास्त धोक्याची आहे.
• संयमाची शक्ती जास्त असते, आततायीपणा धोक्याचा, हे भाजपाने ओळखलेले दिसते, आघाडी विसरत असेल तर त्यापेक्षा मोठा धोका नाही!
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite)