मुक्तपीठ टीम
गिर्यारोहणासाठी महाराष्ट्रातील कोणता गड सर्वात अवघड आहे हा विषय निघाला की सर्वच ट्रेकर्सच्या मनात एकच नाव येते मोरोशीचा भैरवगड. मात्र हा अवघड किल्ला सांगलीच्या प्रांजल सचिन बावसकर या अवघ्या ९ वर्षाच्या चिमुरडीने सर केला आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे निवृत्त वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता डॉ उदय जगदाळे यांची नात तर प्रसिद्ध दंततज्ञ डॉ कल्याणी जगदाळे बावसकर आणि सह्याद्री व्हेंचर्सचे सचिन बावसकर यांची ती कन्या आहे.
माळशेज घाटाच्या पलीकडे मुख्य डोंगररांगेपासून बाहेर आलेल्या डोंगरावर मोरोशीचा भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात मोरोशी गावाच्या पायथ्याशी हा सुळका वजा गड मोठ्या दिमाखात उभा आहे. या गडाची रचना पाहता टेहळणीसाठी याचा उपयोग होत असावा. चढाईसाठी अतिशय बिकट आणि अवघड असणाऱ्या मोरोशीच्या भैरवगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ४९९७ फूट इतकी आहे. मनाचा थरकाप उडवणारा मोरोशीचा भैरवगड हा कायमच साहसी गिर्यारोहकांसाठी आकर्षण ठरलेला आहे. या गडावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्र माहिती असणे आवश्यक आहे.
सांगलीमधील सह्याद्री व्हेंचर्स या ट्रेकिंग ग्रुपने नुकताच मोरोशीचा भैरवगड ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला, यामध्ये २० ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. याच ग्रुपमध्ये होती एक नऊ वर्षाची चिमूरडी प्रांजल बावचकर.
भैरवगडासाठी मोरोशी गावातून जवळपास दोन तास घनदाट जंगल आणि डोंगर चढाई करून गडाच्या पायथ्याशी जावे लागते. तिथून पुढे सुरू होते खरी कसोटी भैरव गडाचा सुळका (बालेकिल्ला) कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरून भैरवगडाची चढाई करण्यासाठी दोर,हरनेस आणि कॅरॅबल वापरल्याशिवाय पर्यायच नाही. अनेक ठिकाणी जेमतेम एखादाच पाय बसेल इतकेच अंतर, काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सगळ्या वाटा. मोरोशीचा भैरवगड चढताना गिर्यारोहकाच्या मनाचा भक्कमपणा आणि शरीराची ताकद या दोन्हीचा कस लागतो. हा काळा निर्भीड कातळ उतरताना साधारणपणे ३०० फुटांचे रॅपलिंग करावे लागते. असा हा अवघड थरारक पण गिर्यारोहकांना मोहात टाकणारा मोरोशीचा भैरवगड सर केला सांगलीतील अवघ्या नऊ वर्षाच्या प्रांजल बावचकर या चिमुरडीने.. सह्याद्री व्हेंचर्स या ट्रेकिंग ग्रूपतर्फे प्रांजल वयाच्या पाचव्या वर्षापासून गिर्यारोहण करते. आजपर्यंत तिने २५हून अधिक गड-किल्ले आणि जंगलभ्रमंती ट्रेकिंग केलेले आहेत. मोरोशीचा भैरवगड सारखा थरारक गड सुद्धा प्रांजल ने हरनेस, कॅरबल व रॅपलिंगचा सपोर्ट घेवून लीलया पूर्ण केला. यामध्ये तिला तिचे वडील व सह्याद्री व्हेंचर्सचे संस्थापक श्री. सचिन बावचकर यांचे मार्गदर्शन मिळाले.