मुक्तपीठ टीम
सांगली महापालिकेनं शिक्षण क्षेत्रासाठी एक चांगलं पाऊल उचललं आहे. लोकसहभागातून प्रवेशद्वार, सुरक्षा भिंत, खेळाचे मैदान, पुरेशी स्वच्छतागृहे, बगिचा यासह २ मजली आदर्श शाळा तयार केल्या जाणार आहेत. पहिली मॉडेल स्कूल म्हणून मिरज शहरातील शाळा क्र. १९ ची निवड करण्यात आली आहे. महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस, प्रमोद चौगुले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही चांगली बातमी दिली.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका लोकसहभागातून मॉडेल स्कूल अभियान राबवित आहेत. या अभियानातील पहिली मॉडेल स्कूल म्हणून मिरज शहरातील शाळा क्र. १९ ची निवड करण्यात आल्याची माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस, प्रमोद चौगुले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिकेच्या एकूण ५० शाळा आहेत. या शाळांचा परिसर सुद्धा मोठा आणि प्रशस्त आहे. त्यामुळे मागील काही महिन्यापासून महापालिका शाळांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. शाळांच्या दर्जा बरोबर गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष दिले आहे. विदयार्थ्यांना शाळेमध्ये लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा या करण्यात आल्या आहेत. यामध्ये शौचालयापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत अनेक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या शाळा या खासगी शाळेच्या तुलनेत स्पर्धेसाठी सज्ज झाल्या आहेत. महापालिकेच्या सर्वच शाळा या मॉडेल केल्या जाणार आहेत. यातील मिरजेतील शाळा क्रमांक १९ मॉडेल स्कुल बनवण्यात येत आहे. या शाळेला लोकसहभागातून प्रवेशद्वार, सुरक्षा भिंत, खेळाचे मैदान, पुरेशी स्वच्छतागृहे, बगिचा यासह
२ मजली आदर्श शाळा तयार करण्यात येणार आहे.
शाळेला संगणकांसह डिजिटल क्लासरूम, सायन्स लॅब , ग्रंथालय व वाचनालय, स्पोर्ट्स रूम म्युजिक आर्ट रूम याचबरोबर स्कुल बसची व्यवस्था केली जाणार आहे. याचबरोबर बालवाडीसाठी स्वतंत्र वर्ग, खेळणी, सोलर सिस्टीम,सीसीटीव्ही कॅमेरे, शुद्ध पिण्याचे पाणी, हँडवाश स्टेशन, कपोस्टिंग युनिट, प्लास्टिक कलेक्शन युनिट, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ही सर्व कामे लोकसहभागातून केली जाणार असून शाळा नंबर १९ ला मॉडेल स्कुल।बनवण्यासाठी १ कोटींचा खर्च आहे. यातील २५ लाख रुपये महापालिका अधिकारी आणि कर्मचारी आपल्या एका दिवसाच्या पगारातून देणार आहेत. त्याचपद्धतीने लोक वर्गणी , सीएसआर फंड यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था यांना विनंती करणार असून ही रक्कम आभाळमाया फाऊंडेशनकडे जमा होणार व आभाळमाया फाऊंडेशन विकासकाम करणार आल्याचेही आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले.
मनपा शाळांना देणगी देणाऱ्यांना आयकरात सवलतीसाठी आभाळमाया फाऊंडेशनकडून संबंधितांना ८० G प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच दानशूर व्यक्ति, संस्था यांनी केलेल्या मदतीचा आभार फलक शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात येईल. या उपक्रमासाठी मनपा अधिकारी व कर्मचारी स्वतः एकत्रित सुमारे २५ लक्ष रु. ची मदत करणार आहेत तसेच मनपा क्षेत्रातील डॉक्टर आर्किटेक्ट, उद्योजक , विकासक, अभियंते, उद्योगपती, विविध दानशूर व्यक्ती, संस्था, विविध संस्था चालक यांनी या उपक्रमात सक्रिय सहभागाची तयारी दर्शविली आहे. पहिली शाळा मॉडेल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने अजून अन्य शाळा विकसित केल्या जाणार आहेत.
यासाठी नागरिक, संस्था आपल्या आवडत्या व्यक्तींची स्मृति/आठवण म्हणून ते इच्छुक असलेल्या शाळेचा कोणताही भाग विकसित करू शकतील. प्रवेशद्वार, शाळा खोली, संगणक, एलईडीसंच, सायन्स लॅब, स्पोर्ट्स रूम , आर्ट सेंटर, सीसीटीव्ही यंत्रणा, वॉटर प्युरीफायर फर्निचर इ. विकसित करून दिल्यास या बदल्यात त्यांच्या आवडत्या व्यक्तीचे नाव त्या ठिकाणी प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात येईल. भविष्यातल्या पिढ्या घडविण्यासाठी जनतेचे पुढे येऊन महापालिका शाळांना मॉडेल बनवण्यासाठी सढळ हाताने मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस, प्रमोद चौगुले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्थायी सभापती निरंजन आवटी,विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेवक उत्तम साखळकर, नगरसचिव चंद्रकांत आडके आदी उपस्थित होते.