मुक्तपीठ टीम
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझेंचा सहभाग स्पष्ट होत असतानाच एटीसने मनसुख हिरेन प्रकरणात दोघांना अटक केल्याने महत्वाची माहिती समोर येत आहे. न्यायालयाने या दोघांना ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. सुरुवातीच्या तपासातील माहितीच्या आधारे एटीएसला सचिन वाझे या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे.
एटीएसचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, मनसुख हिरेन हत्याप्रकरणात मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोरे यांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी सीआययूचे निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये सामील होते.
आणखी काही लोकांना अटक करण्यात येणार
मनसुखची पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरून एटीएसने खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, मनसुखची हत्या झाली तेव्हा सचिन वाझे तेथे नव्हते, असेही तपासात उघड झाले आहे. या हत्येमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग असल्याचा पुरावा एटीएसलाही सापडला आहे, त्यातील काही पोलिस असू शकतात. त्यामुळे लवकरच या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते.
पुरावा लपवण्यासाठी मनसुख यांचा काटा काढला
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटांनी भरलेल्या स्कॉर्पिओला अंबानीच्या घराबाहेर पार्क करण्याचा कट सचिन वाजे यांनी रचला होता. मनसुख हा या कटातील मुख्य साक्षीदार होता. या संपूर्ण कटात मनसुख यांनीही वाझे यांना मदत केली. जेव्हा या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला तेव्हा त्याने हे रहस्य उघडण्याच्या भीतीने आणखी एक कारस्थान रचले. त्याने मनसुखला ठार मारण्याची योजना आखली. निलंबित पोलीस विनायक शिंदे यांच्यामार्फत ४ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता मनसुख यांना बोलाविण्यात आले.
हात आणि तोंड बांधून जिवंत खाडीत टाकले
५ मार्च रोजी मनसुखचा मृतदेह मुंब्राच्या रेती बंदर येथे असलेल्या खाडीत सापडला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसुखला तोंड आणि हात बांधून खाडीत जिवंत टाकण्यात आले.
वाझेंनी मनसुखलाही या कटात सामील केले होते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाझेंनी मनसुखला त्यांच्या कटात सामील केले होते. याचा पुरावा एटीएस आणि एनआयएला सापडला आहे, परंतु एटीएस सचिन वाझेंची चौकशी करेपर्यंत याची पुष्टी करता येत नाही. सध्या एटीएसला दोघांमधील संपर्काचा डिजिटल पुरावा मिळाला आहे. मनसुख यांचे वकील आणि त्यांच्या कुटुंबिय यांची माहितीही या प्रकरणातील महत्त्वाची असल्याचे सिद्ध झाले आहे.
चोरीची खोटी तक्रार
मनसुखने १८ फेब्रुवारी रोजी विक्रोळी पोलीस ठाण्यात आपली स्कॉर्पिओ चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. स्कॉर्पिओ अजिबात चोरीला गेली नसल्याचे एनआयएच्या फॉरेन्सिक तपासणीत समोर आले आहे. वाझें यांच्या कटात मनसुख व्यतिरिक्त सीआययूच्या इतर दोन लोकांचा हात असल्याचा संशय आहे. वाझेंच्या विनंतीवरूनच मनसुख यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि ठाणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले असल्याचेही उघड झाले आहे.
जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने खूनाचा संशय
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाझेंनी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्याची जबाबदारी मनसुख यांना दिली होती. त्यांनी मनसुख यांना सांगितले की ते या यासंदर्भात चौकशी करीत असून सहजतेने त्यांची सुटका करतील. मनसुख यांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. असा विश्वास आहे की यानंतर, त्याला असे वाटले की मनसुख तोंड उघडेल म्हणून मनसुखला ठार मारण्याचा कट रचला गेला.