मुक्तपीठ टीम
एनआयएनं अटक केल्यामुळे एनकाऊंटर स्पेशलिस्ट अधिकारी सचिन वाझेंचं नाव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमुळे चर्चेत आलेले सचिन वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले ते उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्फोटकांच्या गाडीचा तपास त्यांच्याकडे आल्यापासून. त्यातही पुन्हा जेव्हा त्या गाडीचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह सापडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट वाझेंचे नाव घेऊन आरोप केले. त्यानंतर त्यांची बदली झाली. महाराष्ट्राच्या एटीएसने त्यांची चौकशी केली आणि अखेर त्यांना अटक झाली.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस दलातील सचिन वाझे याांचं नाव चर्चेत आलं होतं.. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेरील स्कॉर्पियो गाडीच्या तपासापासून हिरेन यांचा मृतदेह मिळालेल्या घटनास्थळावर वाझेंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता वाझेंना झालेली अटक ही अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी आहे. मनसुख हिरेनप्रकरणी अद्याप कारवाई झालेली नाही. फक्त एटीएसने चौकशी केली आहे. त्यामुळे आता त्या प्रकरणातही त्यांच्यावर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सचिन वाझे यांच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा:
सचिन वाझे: तपास, वाद आणि आरोप
- सचिन वाझेंचं मूळ गाव कोल्हापूर.
- 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड.
- सध्या ते मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक
- क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये कार्यरत असतानाचे वाद
- त्यानंतर त्यांची विशेष शाखेत बदली
- पोलीस दलात वाझेंची पहिली पोस्टिंग नक्षलग्रस्त गडचिरोलीत.
- १९९२च्या आसपास ठाण्यात बदली.
- वाझे यांची मुंबईत क्राइम ब्रांचमध्ये पोस्टिंग
- एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या सीआययू युनिटमध्ये
- मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांचा हैदोस वाढला होता, दिवसाढवळ्या रक्तरंजीत गुन्हेगारीला उत आला होता. त्यावेळी सरकारने मुंबई पोलीस दलातील निवडक अधिकाऱ्यांना अंडरवर्ल्डचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली. त्यात जे अधिकारी होते त्यात वाझेही एक होते.
- त्यांनी आतापर्यंत ६०पेक्षा जास्त अंडरवर्ल्ड गुंडांचा एन्काउंटर केला आहे.
- मुंबई पोलिसांचा ‘टेक्नो-सॅव्ही’ अधिकारी म्हणून ओळख.
- २००४ मध्ये औरंगाबाद स्फोटके-शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी ख्वाजा यूनूस मृत्यूप्रकरणी निलंबन
- निलंबनानंतर २००७ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा राजीनामा, मात्र सरकारने त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही.
- २००८ मध्ये सचिन वाझे आणि इतरांवर ख्वाजा मृत्यूप्रकरणी 1000 पानांचं आरोपपत्र दाखल.
- २००८ मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश.
- कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रयत्न, मात्र उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर राजकारणात फारसे सक्रिय नव्हते.
- जून २०२० मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंचं निलंबन मागे घेतलं.
- निलंबन मागे घेतल्याने तब्बल १६ वर्षांनी वाझे पुन्हा महाराष्ट्र पोलिस दलाच्या सेवेत रुजू.
- अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केलेल्या मुंबई पोलिसांच्या टीमचं नेतृत्व केले
- अर्णब गोस्वामी यांच्यावर आरोप असलेल्या TRP घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वाझेंकडेच.
- मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं असलेल्या स्कॉर्पियो गाडीच्या तपासाची जबाबदारीही सचिन वाझेंवर सोपवण्यात आली होती.
- मुकेश अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्फोटकांच्या गाडीचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह सापडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट वाझेंचे नाव घेऊन आरोप केला.
- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आक्रमकतेने वाझे यांची बाजू घेतली. अर्णब प्रकऱणातील वाझेंच्या भूमिकेमुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे का? असेही विचारले.
- पण वाढत्या वादामुळे सचिन वाझेंची क्राइम ब्रांचमधून विशेष शाखेत बदली झाली. महाराष्ट्राच्या एटीएसने त्यांची चौकशी केली.
- एनआयएने स्फोटक प्रकरणाची चौकशी हाती घेऊन वाझेंची १३ तास चौकशी केली आणि अखेर त्यांना अटक करण्यात आली.