मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पर्याय देण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत. पंतप्रधान मोदींविरोधात पर्याय देण्यासाठी विरोधी पक्षातून अनेकांचे नाव समोर येत आहेत. मात्र एकमत असं कुठेच दिसून येत नाही आहे. विरोधकांची एकजुट ही किती काळ टिकेल याचा ही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सामनाच्या अग्रलेखातून आज विरोधकांच्या एकजुटीचं महत्व मांडलं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसह मविआ एकत्र लढली तर लोकसभेला ३५ जागा! नाहीतर शंभर आचारी, रस्सा भिकारी!, असे स्पष्ट शब्दात मांडण्यात आले आहे.
प्रत्येक जण वेगवेगळ्या तोंडाने का बोलतोय?
- भारतीय जनता पक्षाच्या यशाचे श्रेय विरोधकांचे जे विखुरलेपण आहे, त्या बेकीस द्यायला हवे.
- विरोधक एकीची वगैरे भाषा बोलतात, पण ते योग्य वेळी जणू ठरवून एकमेकांचा हात सोडतात.
- आताही २०२४ ला सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवावे यावर बैठका, चर्चा, भेटीगाठी यांना बहर आला आहे.
- मात्र प्रश्न इतकाच आहे की, प्रत्येक जण वेगवेगळ्या तोंडाने का बोलतोय? एकमुखाने का बोलत नाही?
- शरद पवार हे देशाच्या राजकारणातले सध्याचे पुराणपुरुष आहेत.
- त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन दिल्लीत पार पडले.
- पवारांनी त्यांच्या भाषणात देशातील सर्व भाजप विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
- भाजपला केंद्रातून सत्ताभ्रष्ट करण्यासाठी बिगरभाजप पक्षांनी एकत्र यावे असे श्री. पवार यांनी स्पष्टच सांगितले.
चंद्रेशेखर राव यांनी त्यांच्या राज्यातले भाजपचे आव्हान थोपवून धरले तरी पुरे…
- विरोधकांना गप्प करण्यासाठी मोदी सरकार ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करीत आहे व या संकटांशी एकत्रित सामना करावा लागेल असे पवार यांनी सांगितले ते खरेच आहे.
- पवार हे दिल्लीत असे षड्डू ठोकत असतानाच तिकडे हैदराबादेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट झाली.
- त्या भेटीनंतर के. चंद्रशेखर राव यांनी “भाजपमुक्त भारत असा संकल्प आपण सोडलेला आहे व त्यासाठी केंद्रात भाजपविरोधी आघाडी स्थापन करू.
- त्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना करू,” असा फटाका पडला.
- राव हे अलीकडे पाटण्यात जाऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटले होते.
- त्याआधी ते मुंबईत येऊन आम्हाला भेटले हो.
- त्यावेळी त्यांनी 2024 च्या लढ्याची योजना आमच्या समोर ठेवली होती.
- अर्थात चंद्रशेखर राव यांची भूमिका स्पष्ट आहे व त्यांनीही भाजपच्या ईडी-सीबीआयच्या दुरुपयोगाविरोधात आवाज उठवला आहे, पण विरोधकांना एकत्र आणण्यासाठी ते स्वतःचा नवा राष्ट्रीय पक्ष का स्थापन करीत आहेत?
- त्या पक्षाच्या छत्राखाली ते कोणाला घेणार आहेत?
- राव यांचा तेलंगणा राष्ट्रीय समिती हा एक प्रादेशिक पक्ष आहे व बाजूच्या आंध्रातही त्यांच्या पक्षाचा तेवढा जोर नाही.
- त्यामुळे राव यांनी त्यांच्या राज्यातले भाजपचे आव्हान थोपवून धरले तरी पुरे.
एकीची भाषा शेवटपर्यंत टिकेल काय?
- याचवेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दिल्लीस पोहोचले व त्यांनी काही विरोधी पक्षांच्या गाठीभेटी घेतल्या.
- त्यात श्री. पवार, लालू यादव, राहुल गांधी आहेत.
- 2024 साली विरोधकांनी एकत्र यावे असे नितीश कुमारांनाही वाटते.
- नितीशबाबूही एक आघाडी स्थापन करण्याच्या विचारात आहेत.
- त्या आघाडीत नक्की कोण येणार? ममता बॅनर्जी या एकांडय़ा शिलेदार आहेत.
- त्या बंगालपुरतेच बघतात.
- बंगालात काँग्रेस पिंवा डाव्यांना त्या विरोधी आघाडीत स्थान देणार आहेत काय, हा प्रश्न आहे.
- सध्या तरी ममता बॅनर्जी यांची भाषा सर्व विरोधकांनी एकत्र यावे अशी आहे.
- नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन वगैरे आम्ही एकत्रच असल्याचे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले, पण ही एकीची भाषा शेवटपर्यंत टिकेल काय?
महाविकास आघाडी एकत्र लढली तर लोकसभेच्या 35 जागा जिंकेल!!
- दिल्ली व पंजाबात केजरीवाल यांचा ‘आप’ भाजपविरोधी आहे, पण त्यांचा घोडा नेहमीच वेगळ्या दिशेने जातो.
- उत्तरेत मायावतींचे राजकारण हे भाजपला मदत होईल असेच घडते.
- अखिलेश यादव त्यांच्या बाहुबली काकांशी जुळवून घेत नाहीत.
- काही राज्यांत कॉंग्रेस पक्ष नक्कीच आपली ताकद राखून आहे आणि राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा बरी चालली आहे.
- महाराष्ट्रात शिवसेनेसह महाविकास आघाडी एकत्र लढली तर लोकसभेच्या 35 जागा जिंकेल असे राज्याचे वातावरण आहे.
- जम्मू-कश्मीरात गुलाम नबी आझाद व महाराष्ट्रात शिंदे गट भाजपच्या फायद्यास येणार नाही, याबाबत कुणाच्या मनात शंका नाही.
- मात्र विरोधक 2024 चे लक्ष्य ठेवतात व वेगवेगळ्या तोंडाने भाजपवर तोफा उडवतात, हा खरा प्रश्न आहे.
- देश भाजपमुक्त होईल की नाही हे आता सांगता येत नाही, पण विरोधी पक्ष एकीने राहिले नाहीत तर त्यांना सत्तेपर्यंत पोहोचणे अवघड होईल, हे कसे नाकारता येईल?
- भाजपच्या विरोधात एकत्र यावे, असे प्रत्येक विरोधी पक्षास वाटते, पण एकत्र यावे कसे? या प्रश्नाचे उत्तर विरोधकांना शोधावे लागणार आहे.
- मुळात दिल्लीत सर्व भाजप विरोधकांनी एकत्र यावे व एकमुखाने बोलावे एवढीच अपेक्षा आहे.
‘शंभर आचारी रस्सा ‘भिकारी’ असे घडू नये…
- मियाँ ओवेसी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला आहे.
- देशात 2024 साली ‘खिचड़ी’ सरकार किंवा बहुपक्षीय सरकार यावे.
- म्हणजे दबलेल्या, उपेक्षित लोकांना न्याय मिळेल.
- खिचडी सरकारचा पंतप्रधान हा सगळ्यांचे ऐकतो.
- त्यामुळे अनेकांना न्याय मिळतो.
- पाशवी बहुमताचा पंतप्रधान फक्त पॉवरफुल’ लोकांची कामे करतो, असे मियाँ ओवेसी म्हणतात.
- वाजपेयींचे एनडीए सरकार हे त्या अर्थानि खिचडी सरकारच होते व त्यात एकेकाळी ममतांपासून नितीश कुमारांपर्यंत सगळेच होते व वाजपेयींचे सरकार उत्तम चालले, पण मियाँ ओवेसी हे मोदी आणि भाजपचे छुपे हस्तक आहेत व भाजपच्या सोयीचे राजकारण करतात.
उत्तर प्रदेश, बिहार व आता गुजरातमध्ये ओवेसी तेच राजकारण करीत आहेत. - त्यामुळे भाजपचाच फायदा होत आला आहे व त्यामुळे विरोधकांच्या एकीची खिचडी नीट शिजत नाही.
- मुळात देशभरातील सर्व भाजप पीडितांनी एकमुखाने एका छत्राखाली यायला हवे.
- त्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याची गरज नाही.
- प्रत्येकाने आपले राज्य सांभाळले तरी पुरे.
- आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? वगैरे नंतर पाहता येईल.
- आधी ‘ईडी-पीडा’ टळावी यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल.
- ‘शंभर आचारी रस्सा ‘भिकारी’ असे घडू नये.
- विरोधकांच्या ऐक्याची खिचडी न पकणे, विरोधकांची दहा तोंडे हेच भाजपचे बलस्थान आहे.
बाकी सर्व झूठ आहे!