मुक्तपीठ टीम
व्हिआयपी गाडी क्रमांकाची आवड आरटीओसाठी आर्थिक फायद्याची ठरत आहे. अगदी कोरोना संकट ओसरताच नव्याने वाहन घेणाऱ्या अनेकांनी आरटीओकडे व्हिआयपी नंबरची मागणी सुरु केली आहे. त्यातून आरटीओला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे.
अनेकांना पाहिजे असतो तो विशिष्ट असा गाडी क्रमांक. आपली महागडी गाडी लोकांच्या नजरेत तिच्या आलिशानपणामुळे भरावी, यावरच ते समाधानी नसतात. पण त्या बरोबरच वेगळ्या क्रमांकामुळेही भरावी असा अनेकांचा प्रयत्न असतो. तर काहींचा काही क्रमांक हे त्यांच्यासाठी खूप शुभ फलदायी असल्याचा समज असतो. त्यामुळेच व्हिआयपी गाडी क्रमांकाची आवड वाढतच चालली आहे. आणि आता कोरोना संकटानंतर आरटीओसाठी आर्थिक फायद्याची ठरत आहे.
गेल्या वर्षी २०२० मध्ये नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने म्हणजेच आरटीओने विशिष्ट क्रमांकाच्या नोंदणी आणि विक्रीतून २.४ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळविले. या विशिष्ट क्रमांकांना सामान्यांच्या भाषेत व्हिआयपी क्रमांक म्हणतात. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत व्हिआयपी क्रमांकांची विक्री जास्त झाली नाही. ऑक्टोबरमध्ये मात्र मागणी वाढू लागली.
“ऑक्टोबरमध्ये नवीन वाहनांची नोंदणी वाढली. त्याचबरोबर आपल्या आवडीच्या क्रमांकाची मागणीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली,” असे नाशिकचे डेप्युटी आरटीओ विनय अहिरे यांनी सांगितले.
एप्रिल २०२० मध्ये केवळ चार निवडक क्रमांकाच्या विक्रीची नोंदणी झाली. आरटीओने ८४,००० रुपये उत्पन्न मिळविले. मे महिन्यात ही संख्या २४ झाली आणि त्यांतून आरटीओचे उत्पन्न १.९ लाखांवर पोहचले. जूनमध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू होताच वाहनांची विक्री वाढली आणि निवडक क्रमांकाच्या वाहनांची मागणीही वाढली. जूनमध्ये आरटीओने १६.१२ लाख, जुलैमध्ये ११.९ लाख रुपये, ऑगस्टमध्ये १५.२ लाख रुपये आणि सप्टेंबरमध्ये २९.७ लाख रुपये कमावले. तसेच ऑक्टोबरमध्ये ५३ लाखांपेक्षा जास्त कमाई झाली, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ६१ लाख आणि डिसेंबरमध्ये ५१.५ लाख रुपये झाली.
व्हिआयपी नंबरचे रेट कार्ड
• प्रत्येक वेळी वाहन नोंदणीसाठी वाहनांचे नवीन क्रमांक येतात, तेव्हा आरटीओ त्यासंबंधी जाहीर करते निवडक क्रमांकाची किंमत ३,००० ते ३ लाख रुपयांपर्यंत आहे.
• ०००१, ९९९९ यासारख्या क्रमांकांना खूप जास्त मागणी आणि स्वाभाविकच किंमतही आहे.
• काहीवेळा एकाच क्रमांकासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त वाहन मालकांकडून मागणी असते. अशावेळी लिलाव प्रक्रियेद्वारे बोली लावली जाते.
• जो जास्त बोली लावतो, त्या व्यक्तीला तो व्हिआयपी क्रमांक मिळतो.
पाहा व्हिडीओ: