मुक्तपीठ टीम
मुंबईसह जगभरात रोजच छोटे मोठे कार्यक्रम होतात. त्यात आलेल्यांसाठी जेवणाचीही सोय केली जाते. आलेल्यांना अन्न कमी पडू नये म्हणून जास्तच बनवले जाते. अनेकदा ते इतके जास्त उरते की फेकून देण्याची वेळ येते. त्याचवेळी एक मोठा वर्ग पुरेशा अन्नापासून वंचित भुकेला झोपतो. ही दरी भरून काढण्याची कल्पना मुंबईतील सुभाष तळेकरांच्या डोक्यात आली. आपण अन्न वाया घालवितो पण तेच अन्न कोणाचं तरी पोट भरु शकतं, एकदम साधा पण मोठा विचार सुभाष तळेकर यांनी २९ डिंसेबर २०१५ला गंगाराम तळेकर यांचे पहील्या पुण्यतिथी निमित्त मांडला. त्यातून आकारास आली रोटी बँक.
जगाची एकूण लोकसंख्या ७०० कोटी आहे. त्यापैकी ११ टक्के लोक म्हणजेच ७९ कोटी ५० लाख लोक पुरेशा अन्नापासून वंचित भुकेले असतात. अमेरिका, इंडोनेशिया आणि ब्राझिल या जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या देशांच्या एकूण लोकसंख्येएवढे लोक जगात उपाशी असतात. यापैकी भारतात उपाशी राहणाऱ्यांची संख्या तब्बल १९ कोटी ५० लाख एवढी आहे. म्हणजेच २० लाख लोक आणखी मिळवून अख्खा पकिस्तान देश उपाशी राहील एवढी ही प्रचंड संख्या आहे. भारतात दररोज ३ हजार मुले कुपोषणाने मरतात.
मुंबईत या पेक्षा वेगळी स्थिती नाही. एका बाजुला नवकोट नारायणांच्या मोठ मोठ्या पार्ट्या,विवाह सोहळे होत होते या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात अतिरीक्त जेवण बनवले जाते. पार्टी संपली की मग हे अतिरीक्त जेवण कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले जात असे. हे चित्र एका बाजूला असते तर दुसऱ्या बाजूला याच मुंबईत उपाशी पोटी फुटपाथवर झोपणार्यांची संख्या लक्षणयरीत्या मोठी आहे. काही ठिकाणी तर गरीब अनाथ मुले कचऱ्याच्या डब्यातून फेकलेले अन्न वेचून खात असतात.
या परिस्थितीला बदलण्यासाठी सुभाष तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणी रोटी बॅंकेची स्थापना केली. त्यांनी मुंबईकरांना आवाहन केले की आपल्या येथे असे अतिरिक्त अन्न शिल्लक रहात असेल तर ते अन्न फेकू नका. आम्हाला तुम्ही फोन करा. फोन केल्या नंतर आमची माणसं आपल्याकडे सायकलवरून येतील व आपले अतिरिक्त जेवण त्या परिसरातील भुकेल्यांना वाटतील. या आवाहनाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. शिल्लक राहिलेले अन्न घेऊन जा असे सांगणारे २० ते २५ फोन दररोज येतात. शनिवार व रविवारी तर हा आकडा ४० ते ५० च्या घरात जातो. अशा प्रकारे दररोज सरासरी ३०० लोकांना अन्न वाटले जाते. शनिवार रविवार असेल तर सरासरी ६०० लोकांना अन्न वाटले जाते. भुकेल्यांची भूक भागविण्याचं स्तुत्य काम सुभाष तळेकर व त्यांचे डबेवाले सहकारी करत आहेत. या रोटीबॅकेच्या माध्यमातून सहा वर्षात २ कोटी रूपयाचे अन्न वाया जाण्यापासून वाचवले गेले आहे.
- आपल्या घरी एखादा लग्न समारंभ वा कार्यक्रम असला की खूप अन्न उरतं. या अन्नाचं करायचं काय असा प्रश्न आपल्याला पडत
- असेलच. आता असा प्रश्न पडला तर थेट रोटी बँकेला 9867221310 या क्रमांकावर फोन करा.
- कोरोना संकटा काळातही रोटी बँकेने रस्त्यावरील अनेकांची भूक भागवली आहे.
- सध्याच्या परिस्थितीमुळे रोटीबॅकेच्या कामावरही परिणाम झाला आहे. सध्या दक्षिण मुंबईतच विशिष्ठ वेळेतच रोटीबँकेचे काम केले जाते. लवकरच ते पुन्हा आणखी जास्त भुकेल्यांच्या मुखी अन्नाचे घास पोहचवत वाया जाण्यापासूनही वाचवेल.