मुक्तपीठ टीम
मोदी सरकारच्या कारकीर्दीला सात वर्ष पूर्ण होणार आहेत. दुसऱ्या कार्यकाळातलं दुसरे वर्ष ३० मे रोजी पूर्ण होणार असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक पदं ही रिक्तच आहेत. त्यामुळे अनेक मंत्री हे अतिरिक्त भाराखाली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारवर होणारी टीका लक्षात घेता कार्यक्षमता वाढवण्यासाठी रिकाम्या जागा भरण्याबरोबरच सध्याच्या मंत्रिमंडळातही काही फेरबदल होण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारसाठी सातवं वर्ष संकटाचं!
• मोदी सरकारला दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही वर्ष कोरोना संकटाशी लढावं लागत आहे.
• त्याचवेळी काही प्रमुख राज्यांच्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या निवडणुकाही झाल्या.
• त्यामुळे पंतप्रधानांसह अनेक प्रमुख मंत्र्यांना प्रचारासाठीही वेळ द्यावा लागला.
• त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक हातालण्यात मोदी सरकारला जमत नसल्याची चौफेर टीका झाली.
• प्रथमच जागतिक माध्यमांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.
• त्यातही उत्तरप्रदेशातील गंगा नदीतील मृतदेहांमुळे भाजपाची पक्ष आणि सरकार दोन्ही पातळ्यांवर प्रतिमा संकटात आली.
• त्यामुळे नुकतीच भाजपा आणि संघाची संयुक्त चिंतन बैठकही झाली.
मोदी मंत्रिमंडळातील रिक्त जागा आणि त्यामुळे सध्याच्या मंत्र्यांवर वाढलेला कामाचा अतिरिक्त कार्यभार यामुळे सरकारच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता रिकाम्या जागा भरण्यासाठी राज्य पातळीवरील काही मोठ्या नेत्यांना केंद्रीय पातळीवर जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
मोदी मंत्रिमंडळातील संख्याबळ
• मंत्रिमंडळात १२ कॅबिनेट मंत्री आहेत.
• स्वतंत्र जबाबदारी असलेले नऊ राज्यमंत्री आहेत;
• राज्यमंत्र्यांची एकूण संख्या २३ आहे.
अतिरक्त भार असलेले मंत्री
• केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्रालयाचीही जबाबदारी आहे. त्यातच सप्टेंबरमध्ये सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रेल्वे राज्यमंत्रीपदही रिक्त आहे.
• लोकजनशक्ति पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनानंतर ऑक्टोबर महिन्यात ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही पियूष गोयल यांनाच देण्यात आला आहे.
• पासवान यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात एकही गैर-भाजपा कॅबिनेट मंत्री नाही. रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले हे राज्यमंत्री आहेत.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे नोव्हेंबर २०१९ पासून अवजड उद्योगांची अतिरिक्त जबाबदारी आहे. या पदाची जबाबदारी यापूर्वी शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडे होती.
• कृषी, ग्रामविकास आणि पंचायती राज या तीन मंत्रालयांची जबाबदारी सांभाळणाऱ्या नरेंद्र सिंह तोमर यांना अन्न प्रक्रिया मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्या खात्याच्या केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर तोमर यांच्यावरचा भार वाढला आहे.
• केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांना श्रीपाद नाईक यांचा आयुष मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. जानेवारीत श्रीपाद नाईक यांचा अपघात झालेला होता. नाईक असून बरे झालेले नाही.
लोकसभेचे उपसभापतीपदही भरले जाण्याची शक्यता
• गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेले लोकसभेचे उपसभापतीपदही भरले जाण्याची शक्यता आहे.
• २५ मे २०१९ रोजी एआयएडीएमकेचे के. एम. थम्बीदुराई यांनी हे पद सोडले होते.
• परंपरेनुसार ते विरोधी पक्षाला दिले जाते, पण ते काँग्रेसला द्यायचे नसल्यामुळे बिजू जनता दलाकडे विचारणा करण्यात आली होती.
• बिजू जनता दलाने स्वारस्य दाखवले नसल्याने ते पद रिकामेच राहिले आहे.