मुक्तपीठ टीम
भाषा हे अभिव्यक्ती आणि परस्पर संवाद यांचे प्राथमिक साधन असल्यामुळे आपण बोलत असलेली भाषा आपल्या जीवनाचे एक मोठे अंग असते. आपली मातृभाषा कोणती असावी, हे आपल्या हातात नाही; परंतु सात्त्विक भाषा शिकणे आपल्या हातात आहे. शैक्षणिक संस्था आपल्या अभ्यासक्रमांसाठी भाषा निवडतांना भाषेची सात्त्विकता हा प्रधान निकष ठेवू शकतात, तसेच संशोधनासाठी निवडलेल्या ८ राष्ट्रीय आणि ११ विदेशी भाषांपैकी ‘संस्कृत’ व तिच्या नंतर ‘मराठी’ भाषा सर्वाधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित करतात, असा संशोधनाद्वारे काढण्यात आलेला निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी मांडला. ते श्रीलंकेतील ‘द नाइंथ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल सायन्सेस, २०२२’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत बोलत होते. त्यांनी ‘जगातील सर्वात लोकप्रिय भाषा आणि त्यांच्या लिपी यांमागील अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन’, हा शोधनिबंध ऑनलाइन सादर केला. या परिषदेचे आयोजन श्रीलंका येथील ‘दी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’ यांनी केले होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले या शोधनिबंधाचे लेखक असून श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.
श्री. शॉन क्लार्क पुढे म्हणाले की, आपण आणि ‘ज्यांच्याशी आपण संवाद साधत असतो ते’ यांवरही आपल्या भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतो. व्यापक स्तरावर एखाद्या समाजातील प्रमुख भाषेचा तेथील संस्कृतीवर परिणाम होत असतो. भाषा ‘त्यांतील स्पंदने आणि त्यांचा व्यक्तींवर होणारा परिणाम’ यांत कशा भिन्न असतात, हे स्पष्ट करण्यासाठी श्री. क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऊर्जा अन् प्रभावळ मापक यंत्रे, तसेच सूक्ष्म परिक्षण यांच्या माध्यमातून केलेल्या काही प्रारंभिक चाचण्यांची माहिती दिली. पहिल्या चाचणीत ‘सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला अस्ताला जातो’, हे एकच वाक्य ८ राष्ट्रीय आणि ११ विदेशी भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले. प्रत्येक भाषेतील वाक्याची वेगळी प्रिंट काढण्यात आली. त्यानंतर प्रत्येक प्रिंटमधील सूक्ष्म ऊर्जेचा अभ्यास युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरच्या माध्यमातून करण्यात आला. देवनागरी लिपी असलेल्या भाषांमध्ये अन्य भाषांच्या तुलनेत सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळली. याउलट अन्य भाषांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली. संस्कृत भाषेतील वाक्याच्या प्रिंटमध्ये सर्वाधिक सकारात्मकता आढळली. त्या खालोखाल सकारात्मकता मराठी भाषेत होती. दुसर्या चाचणीत संगणकामध्ये असलेली सामान्य अक्षरांच्या (फॉन्टच्या) तुलनेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने बनवलेल्या सात्त्विक अक्षरांमध्ये (फॉन्टमध्ये) १४६ टक्के अधिक सकारात्मक ऊर्जा आढळली.
तिसर्या चाचणीत वरील वाक्याचे इंग्रजी, मंडारिन (चीनी भाषा) आणि संस्कृत या भाषेत ध्वनिमुद्रण करण्यात आले. मंडारिन आणि इंग्रजी भाषेतील ध्वनीमुद्रण ऐकणार्यांवर याचा नकारात्मक परिणाम झाला. त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा वाढली आणि सकारात्मकता नष्ट झाली. याउलट त्यांनी संस्कृत वाक्याचे ध्वनिमुद्रण ऐकल्यावर ऐकणार्या व्यक्तीतील नकारात्मकता पुष्कळ कमी झाली आणि सकारात्मक प्रभावळ निर्माण झाली.