रवींद्र लिंगायत
“हॅलो ताई, मी येतोय, थोडा उशीर होईल!” हे उद्गार कानावर पडले आणि मन सुन्न झाले. कारण हे बोलणाऱ्याच्या डोके, नाक, हातापायातून रक्तस्त्राव होत होता. खड्ड्याच्या बाजूला त्याची बाईक होती. कंबरेत वाकून दोन्ही हात बाईक वर ठेवून फोनवर बोलणारा हा चाळीशीतला व्यक्ती अर्ध्या ग्लानीत समोरच्या व्यक्तीला तो संकटात आहे याची कल्पना न व्हावी याची पुरेपूर काळजी घेत होता.
रायते गावाच्यापुढे गोवेलीच्या आधी रोडच्या कडेला माझी नजर एका रक्तबंबाळ व्यक्तीवर पडली आणि मी तातडीने प्रशांतला गाडी थांबव म्हणत गाडीतून खाली उतरून मी त्या माणसाकडे धावलो. जाताना गाडीच्या डोअरला लावलेली पाण्याची बाटली मात्र सोबत घेतली. तो रोडकडे पाठ फिरवून कोणाशी तरी बोलत होता.
दर वर्षी प्रमाणे आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्याचे प्रयत्न आम्ही आमच्या परीने करत असतो, त्याचा एक नित्य भाग म्हणजे टिटवाळ्याच्या “मॉ का आशिर्वाद स्विट”ची मदत. न चुकता दिवाळीच्या आधी हा माणूस फोन करतो. “रवी साहब मिठाई रेडी है, आप कब मेरे आदिवासी भाइयो को भेट देणे जाने वाले हो जरा बताना. मैं मिठाई पॅक करके रखता हूं।” नि:शुल्क! हो नि:शुल्क दर वर्षी स्वत: या कार्यात खारीचा वाटा उचलणारा हा दानी “कर्ण अंश” श्रीकांतभाई.
उद्या वाटपाचे नियोजन असल्याने मिठाई घेण्यासाठी करण्यासाठी आम्ही दुपारी १२ च्या दरम्यान निघालो आणि टिटवाळ्याच्या आधी हा प्रसंग घडला.
ऑक्टोबर हिट आणि कडकडीत उन्हाळ्यात उभ्या त्या जखमी व्यक्तीस मी जाताच हाक दिली, “दादा काय झाले?, तुम्हाला काय जास्त लागले नाही ना?” मान थोडी वर करत त्या व्यक्तीने नकारात्मक दर्शवली. “पाणी पिणार का? हे कसं झाले? कुठली गाडी होती?, कुठे कुठे लागले? असे बरेच प्रश्न एकाच दमात मी विचारले. उत्तर ” दादा, फोनवर माझी ताई आहे. तिला सांगा मी व्यवस्थित आहे. ती ऐकत नाही, मला विचारते तुला काय झाले ते सांग? तुम्हीच सांगा तिला मला काय नाही झाले, थोडे खरचटले आहे.” येवढे बोलून माझ्या हातात त्याने फोन ठेवला. 200 गॅमचा मोबाईल त्या मावलीच्या भावा बद्दल च्या काळजीने आज मला पेेलवणासा झाला होता. हातापासून कानापर्यंत रक्ताळलेल्या भावाला त्या बहिणीपासून लपवायचे होते.
“बोला ना ताई? काही नाही ताई, थोडे खरचटले आहे, आम्ही त्यांना गोवेलीच्या हॉस्पिटलमध्ये नेतोय.” समोरून प्रतिसाद आला “दादा आमचे हे निघालेत. तुम्ही प्लीज त्यांच्या बरोबर थांबा.” मी त्यांना शाश्वती देऊन फोन ठेवला अन लगेच त्यांना गाडीत बसण्यास सांगितले. त्यांच्या बाईकवरून मी हॉस्पिटल गाठले. पाठोपाठ प्रशांतही त्यांना घेऊन मध्ये पोहोचला. हॉस्पिटल तेही सरकारी असले म्हणजे तेथे डॉक्टरपेक्षा बाकीचे किटली गरम! त्यांना विनंती कलेली . “मॅडम कृपया बघा, रस्ता अपघात आहे” पेशंटला पाहत तिने मला “केस पेरlपर घ्या” असा आदेश दिला व त्याला अपघात विभागात घेऊन गेली. मी तात्काळ केसपेपर घेउन त्याच्या स्वाधीन केला.
सर्व मलम पट्टी झाल्यावर मला वॉडबॉयने “आपल्याला डॉक्टर आत बोलवत आहे असे सांगितले. मी आता जाताच डॉक्टरचे नेहमी प्रश्न हे तुमचे कोण? कसे झाले? वगैरे वगैरे… मी काही बोलायच्या आगोदर तीच व्यक्ती उत्तरली ” मॅडम ह्यांनी मला इथे आणले, बाकीचे मला पाहून थांबले पण हॉस्पिटल मध्ये आणायची हिंमत कोणाची झाली नाही. ज्याने मला ठोकले तो तर न थांबता पळून गेला.” मी त्यांना हात करत थांबा म्हटलो. त्यांना त्यांची प्रोसेस करू द्या, म्हणत मी त्यांना हवी असलेली माहिती (नाव, मोबाईल नंबर ईत्यादी) दिली. मी माहिती देता देता डॉक्टरांना विचारले काही गंभीर दुखापत आहे का? डॉक्टरने सध्या वाटत नाही पण डोक्याला मार लागला आहे. सीटी स्कॅन करून घ्या सांगितले.
तेवढ्यात परत त्यांच्या ताईचा फोन आला व पाच मिनिटात ते पोहचतील असे सांगितले. काही गोळ्या, औषध मला डॉक्टर lने आणायला सांगितले होते ते मी बाजूच्या दुकानामध्ये घेऊन त्यांच्या स्वाधीन केले.
खड्डा चुकवायच्या नादात समोरच्या इनोवा कारने मला ठोकले म्हटल्यावर. याला जबाबदार कोण? या प्रश्नांचे डोंगर उभे राहतात? भाऊबीजेसाठी चाललेला भाऊ, भाऊ येणार म्हणून वाट पाहणारी बहीण कि खड्डा चुकवायच्या नादात धडक देऊन पळून गेलेला कार चालक? की निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करणारी सरकारी यंत्रणा? की अशा कितीतरी निष्पाप जीव घेणारा व जखमी करणारा खड्डा?
मी त्या व्यक्तीला व रस्ता अपघातात रस्त्यावर पडलेल्या बहीणीसाठी आणलेल्या साड्या त्याच्या भावजीच्या स्वाधीन करून निघालो. पुन्हा त्याच खड्ड्याकडे येऊन उभा राहिलो, त्याचा आकार कुठल्या देश्याच्या नकाशासारखा दिसतो यापेक्षा किती भाऊ व भाऊबीज यामुळे भंगल्या याचा विचार करत बसलो.
मत विकले आणि मतदान केले,
विकत घेतलेल्या मतावर लोकसेवक बाटले!
सरकारी यंत्रणेच्या बाजारात सामान्य माणसाचा जीव कवडीमोल झाली,
सुन्न पडलेली चेतना जीवांची, आता फक्त लाजाळूच्या झाडात राहिली…
तिथेच आम्ही निर्धार केला, भाऊबीजेला बहीणीकडे जाईल पण जातांना हा खड्डा मिळेल त्या मातीने बुजवून जाईन!
असे खड्डे आपण बुजवलेच पाहिजे. या खड्ड्यापासून आपली सुरुवात. कारण आज त्या बहिणीचा भाऊ होता उद्या तुमच्या बहिणीचा भाऊ पण असू शकतो?
(ही सत्य घटना असून काल्पनिक नाही)