मुक्तपीठ टीम
कोकणच्या विकासाचा अनुशेष आणि पूर परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्री मंडळाची विशेष बैठक चिपळूण मध्ये आयोजित करावी असा ठराव राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या आपत्ती निवारण परिषदेत आज मंजूर करण्यात आला.
राष्ट्र सेवा दलाने चिपळूण येथील डी.बी.जे.कॉलेज मध्ये आपत्ती निवारण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घघाटन आमदार शेखर निकम यांनी केले.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात यावे या मागणी साठी चिपळूण मधील नागरिकाच्या वतीने केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठविण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्धार या परिषदेत करण्यात आला.
चिपळूणचा पूर प्रश्न सोडविण्यासाठी लोकचळवळ अधिक ताकदीने निमार्ण करायला हवी आणि शासन स्तरावर हा प्रश्न ताकदीने मांडून पूर समस्या सोडविली पाहिजे त्या साठी लोकांनी सहभाग वाढवावा असे मत आमदार शेखर निकम यांनी उद्घघाटनाच्या भाषणात व्यक्त केले.या परिषदे आयोजन करून राष्ट्र सेवा दलाने महत्वाची जागृती केली असे ते म्हणाले.
वाशिष्ठी खोरे व ग्रामीण परिसर व्यवस्थापन ,चिपळूण शहर व्यवस्थापन, नुकसान भरपाई ,आपत्ती निवारण आणि माध्यम आदी विषयावर या परिषदेत चर्चा झाली. या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले.
चिपळूण मधील विविध संस्था, संघटना , व्यापारी , वैद्यक व इतर क्षेत्रातील व्यावसायीक , शिक्षक , कलाकार , पत्रकार , विद्यार्थी , महिला , सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते , अभ्यासक मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाकांत सकपाळ होते. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर, पत्रकार मंदार फणसे, युवराज मोहिते , डॉ.जि बी राजे , राष्ट्र सेवा दल, मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम,आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
या परिषदेत ‘जंगलतोड व पूर ‘ याविषयी मल्हार इंदुलकर, ‘भू स्खलन व दरडी कोसळणे’ या विषयावर कोळके वाडीचे सरपंच सचिन मोहिते, ‘सह्याद्रीतील उत्खनन व पूर’ या विषयावर प्रा.राम साळवी यांनी या विषयी मांडणी केली. तर या सत्राचे अध्यक्ष डॉ.जि बी राजे यांनी बंधारे गाळाने भरल्याने मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून अनेक ठिकाणी सह्याद्रीला तडे गेल्याचे सांगितले. यावर पुढील 100 वर्षांचा विचार करून अभ्यास व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली, दुसऱ्या सत्रात ” चिपळूण शहरातील पूर प्रश्न” या विषयावर चर्चा झाली.पराग वडके, शहनवाज शहा यांनी विचार मांडले. प्रा.राहुल पवार यांनी ग्रामीण जीवनावर पूर व अतिवृष्टीचा परिणाम या विषयी मांडणी केली.शहा यांनी कोयना प्रकल्पाचे मकिंग वाशिष्ठीत आल्याने नदी गाळाने भरली आहे. त्या साठी शासनाने जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली अध्यक्ष राम रेडीज यांनी शहर पूर मुक्ती साठी नगर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जबाबदारी घ्यायला हवी असे मत मांडले.
व्यापारी संघाचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी व्यापाऱ्याच्या प्रश्नाना वाचा फोडली तर ‘पूर आणि माध्यमांची भूमिका “या सत्रात जेष्ठ पत्रकार मंदार फणसे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे प्रा. महेश कांबळे पत्रकार समीर जाधव, पत्रकार स्वप्नील घाग, पत्रकार सतीश कदम ,पत्रकार समीर जाधव यांनी ‘आपत्तीत आणि माध्यम ‘या विषयावर माध्यमाच्या भूमिकेवर प्रकाश टाकून जनता व शासन यातील माध्यम दुवा आहे मात्र पूर प्रश्न सोडविण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले . कोकणच्या सामाजिक आणि राजकीय अजेंडावर फक्त पुर हाच विषय असला पाहिजे याची काळजी लोकांनी घ्यावी असे पत्रकार मंदार फणसे यांनी सांगितले.
या परिषदेत युवांचा सहभाग मोठा आहे त्यांनी पुढे जाताना स्वीडन मधील सोळा वर्षाच्या ग्रेटा थनबर्ग नावाच्या एका मुलीने अख्या जगाला पर्यावरण कडे बघण्याचा नवा दृष्टीकोन दिला. कोकणातून अशा ग्रेटा थन बर्ग तयार व्हायला हव्या अशी अपेक्षा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे प्रा.महेश कांबळे यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधीनी ‘करके देखो’ हा संदेश लोकांना दिला होता. कोकणातील लोकांनी यापुढे गांधीजींचा हा विचार अमलात आणावा तरच कोकणाचे प्रश्न सुटतील असे पत्रकार युवराज मोहिते यांनी सांगितले. या परिषदेला नदी तज्ञ परिणीता दांडेकर यांनी संदेश पाठविला. तर कोकणचे सुपुत्र डॉ. भालचंद्र मुणगेकर,हुसेन दलवाई,सागरच्या संपादिका शुभदा जोशी यांनी शुभेच्छा पाठविल्या. ही परिषद यशस्वी करण्यासाठी रमाकांत सकपाळ, शरयू इंदुलकर , सुनिल खेडेकर , प्रकाश स . शिल्पा रेडीज , जहीद खान , अरुण मोहिते, प्रमोद जाधव, प्रा. राम साळवी, प्रा.राहुल पवार, अभिजीत तटकरे, पल्लवी खंडजोडे, यांनी मेहनत घेतली.