रमेश कुलकर्णी / व्हाअभिव्यक्त!
‘नेकी कर, दरिया डाल’ तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या शिवशंकरभाऊ पाटील यांच्या आयुष्यात मिळालेला हा पहिला उपदेश पुढील मार्गक्रमणाचं दिशानिर्देश देण्यास पुरेसा होता. वडिलांचे मित्र गफूरभाई मंदिरात फरशी बसविण्याचं काम करीत होते. त्यांचा मदतनीस म्हणून शिवशंकरभाऊंची वर्णी लागली व येथूनच सेवेची झालेली सुरुवात श्वासाच्या अखेरपर्यंत निरपेक्षपणे करण्यात हा तपस्वी जगला.
‘सेवा’ या शब्दालाही उंची प्रदान करून देणारा हा कर्मयोगी जेमतेम मॅट्रिक शिकलेला. संस्कारित तथा सुखवस्तू व संपन्न कुटुंबात स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी (१२ जानेवारी) या तेजोमय व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला. घरातील आध्यात्मिक संस्कारांचा प्रभाव भाऊंवर झाला. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणाचे दोन अयशस्वी प्रयोग केल्यानंतर अखेरीस घरची शेती सांभाळावी असं ठरलं. मनातील मानवता व जनसेवेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नंतर गफूरभाईंच्या निमित्तानं सुरू झालेला सेवाधर्माचा प्रवास आयुष्यभर सुरूच राहिला. आपले मंदिर केवळ धार्मिक संस्थान न राहता मानवतेचं मंदिर बनावं, या संकल्पाला सिद्धीस नेण्यासाठी हा सेवाधारी आयुष्यभर प्रयत्नरत राहिला. श्रीमंत भक्त-गरीब भक्त असा भेदाभेद टाळणारे शेगाव देवस्थान हे अद्वितीय उदाहरण असावं. सर्वांना समान वागणूक या न्यायावरच प्रसन्नचित्तानं कामकाज करण्याचं कौशल्यप्राप्त हे अनोखं संस्थान आहे.
‘अनुकरण’ शक्यतो मोठ्यांकडून लहानांनी शिकण्याचा अलिखित प्रघात आहे. या प्रघातालाही शिवशंकरभाऊ अपवाद ठरतात. शिवशंकरभाऊंनी सांगितलेला किस्सा मोठा बोधप्रद आहे. अन्नदानाची महती योगिराज श्री गजानन महाराजांनी स्वयं कथन केली आहे. त्यामुळे मंदिरात अन्नदान झालंच पाहिजे, असा शिवशंकरभाऊंचा संकल्प पूर्णत्वास नेण्यास मोठा अडथळा पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नसण्याचा होता. कधीतरी आपल्या शेतातील दहा-बारा कामकऱ्यांनी गावात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सेवा देता यावी म्हणून मागितलेली एकत्रित सुटी त्यांच्या लक्षात होती.
आपल्याच शेतातील कामकरी रामा याच्यासमोर व्यक्त केलेली अन्नदानाची भावना व लागणारी सेवा त्यांनी आनंदानं स्वीकारली. ऋषिपंचमीपासून अन्नदानाचा संकल्प करावा यासाठी विश्वस्तांची मंदिर परिसरात बैठक सुरू होती. पावसाळी वातावरण असल्यानं बैठकीतून गरम भजे खाण्याची आग्रही मागणी पुढे आली. या मागणीची पूर्तता करण्यासाठी सोबत आलेल्या रामा व त्याच्या सहकाऱ्यांना ‘भजे बनवा,’ असं सांगण्यासाठी शिवशंकरभाऊ त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा त्यांचं जेवण सुरू होतं. मिलो ज्वारीची भाकरी व त्यावर मीठ घेऊन ती सर्व कामकरी आनंदानं जेवत होती. भाऊंनी त्यांना म्हटलं, ‘‘अरे, तुम्हाला जेवण बनविण्यासाठी बोलाविलं आहे. त्यामुळे तुमचं सर्वांचं जेवण संस्थान करणार आहे.’’ त्यावर रामानं दिलेलं उत्तर त्यांच्या जीवनाचा दृष्टिकोन बदलवून गेलं. ‘‘आमची सेवा उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे उद्यापासून आम्ही संस्थानचं अन्न घेऊ. आज सेवा नसल्यामुळे त्यावर आमचा अधिकार नाही. आम्हाला आमचीच रुखीसुखी रोटी खाऊ द्या,’’ या उत्तरानं शिवशंकरभाऊ ओशाळून गेले. ‘आपण संस्थानाच्या पैशावर भजे खाण्याचा मोह आवरू शकलो नाही,’ या विचारानंच त्यांना पोखरून टाकलं. यापुढे संस्थानातील पाणीही प्यायचं नाही, असा निर्धार करून त्यांनी आयुष्यभर तो कसोशीनं जपला.
‘व्यवस्थापन’ हा त्यांच्याकडून शिकण्यासारखा महत्त्वाचा गुण. सुरुवातीला त्यांची इच्छा नसतानाही त्यांना मिळालेलं ‘व्यवस्थापकीय विश्वस्त’ हे पद. ही जबाबदारी घेण्याची मानसिकता शिवशंकरभाऊंची नव्हती. ‘तुम्ही म्हणाल ती सेवा करीन; पण हे पद मला नको,’ अशी भूमिका घेतलेल्या भाऊंना नकाराचं कारण डॉक्टर टी. के. पाटलांनी विचारलं, तेव्हा, ‘‘मी आजवर काम केलेल्या नगरपरिषदेसह आठ संस्था माझ्या प्रयत्नांनी भरभराटीस आल्यात; परंतु माझा कार्यकाळ संपल्यानंतर तेथील भांडण-तंटे वाढून डबघाईस गेल्याचं चित्र मी अनुभवलं. आपण सावरलेली संस्था आपण बाहेर पडताच मूळ पदाला जात असेल तर आपण करीत असलेल्या कामाचा काय उपयोग? जेथे आपल्या शरीराचा भरोसा नाही तेथे बाकीचं काय?’’ असा प्रतिप्रश्न करून डॉक्टर टी. के. पाटलांनी त्यांना द्विधा मन:स्थितीतून काढण्याचा प्रयत्न केला; परंतु शेवटी ‘तुम्ही ही जबाबदारी स्वीकारावी अशी ‘श्रीं’ची इच्छा आहे,’ अशी गळ त्यांना घालण्यात आली. त्यांच्या इच्छेखातर व्यवस्थापकीय विश्वस्तपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यानंतर सुरू झालेलं जनसेवेचं कार्य अधिक गतिमान झालं. मंदिरातील वाहतूक यंत्रणा, भक्तनिवास, भोजनव्यवस्था, स्वच्छता, नीटनेटकेपणा अव्याहतपणे सुरूच आहे. जनसेवेसाठी सुरू केलेलं शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक प्रकल्पाच्या महतीचा सुगंध दहादिशांनी दरवळतो आहे. दररोज लाखो सेवाधाºयांचे हात या प्रकल्पाच्या यशासाठी झटतात. हजारो प्रतीक्षेत असतात. जेथे भरघोस ‘पॅकेज’ देऊन चांगली लोकं कामासाठी यायला तयार नाहीत तिथं कुठल्याही अपेक्षा न ठेवता चांगल्या सेवेकऱ्यांची फौज उभी असते यापेक्षा व्यवस्थापनाचं मोठं उदाहरण कुठलं असू शकेल!
‘निर्मोही’ या शब्दाचा अर्थ शिवशंकरभाऊंच्या जीवनशैलीतून प्रकट होतो. सिटी बँकेचे अध्यक्ष विक्रम पंडित यांची ७०० कोटींची मदत नम्रपणे नाकारणारा, ‘आनंद सागर’सारखा भव्यदिव्य तथा देखणा व स्वप्नवत प्रकल्प कमी पैशात पूर्णत्वास नेऊन दाखविणारा, राजकीय व्यासपीठ कसोशीने टाळणारा, स्वतः प्रसिद्दीपासून अलिप्त राहून मंदिराच्या कार्य व नियोजनाची महती सर्वदूर घेऊन जाणारा हा अवलिया काही निराळाच आहे. आयुष्यभर ज्या सन्मानासाठी लोकं आयुष्य खर्ची घालतात तो ‘पद्मश्री’ सारखा राष्ट्रीय सन्मान तेवढ्याच नम्रतेनं नाकारणारा हा निर्मोही महात्मा म्हणूनच आदर्शवत आहे. ‘‘भाऊ, हे कसे करता तुम्ही?’’ या प्रश्नावर त्यांची ठरलेली सदाचारी चार शब्द म्हणजे… ही ‘श्री’ची कृपा!
ज्यांच्या पायावर मस्तक ठेवून आदराने झुकावं, असे पाय दुर्मीळ होत असल्याच्या या काळात आपल्या चिंतनशील, विनयशील, मार्गदर्शक भाऊंचं जाणं अतिशय वेदनादायक आहे. श्री संत गजानन महाराज आणि भक्तांमधील मजबूत दुवा निखळल्याची भावना आज आहे. विदर्भाचा मानबिंदू आज अस्तंगत झाला आहे. डोळस भक्तीचा उर्जावान प्रवाह आज थांबला. भाऊसाहेबांनी आयुष्यभर जपलेला आदर्शवाद, तत्त्वनिष्ठता, शिस्तशीरपणा ,साधेपणा, सच्चेपणा, विनम्रता आपण अंगीकारणं म्हणजे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सेवेच्या वाटेवरून चालत मानवतेची कास धरणाºया या ‘माउली’ला हीच आदरांजली ठरेल. जय गजानन …माउली..!!
(लेखक रमेश कुलकर्णी हे गेली तीन दशकं प्रिंट पत्रकारितेत कार्यरत आहे. लोकसंपर्क आणि आपल्या समाजोपयोगी पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे रमेशजी सध्या पुण्यनगरी समुहाच्या विदर्भ विभागाचे संपादकीय प्रमुख आहेत.
संपर्क ९९२२९०१२६२)