मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य सहकारी बँके द्वारे राज्यातील १२ सहकारी साखर कारखाने भाडे तत्वावर देण्यासाठी निविदा मागविण्या बद्दल जाहीरात काढण्यात आलेल्या असुन शेतकऱ्यांच्या मालकीच्या कारखान्यांचे नव्या स्वरुपातील खासगीकरणाचा डाव शेतकरी हाणून पाडतील. वास्तविक संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे जर संस्था तोट्यात आलेली असल्यास सदर संचालकांवर कारवाई करण्याएवजी संस्थाच मोडीत काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही.
पहिल्यांदा सदर साखर कारखान्यांच्या तत्कालीन संचालकांची मालमत्ता जप्त करून बॅंकेने वसुली करावी. खासगी संस्थानी या निविदा प्रक्रीयेत सहभागी होऊ नये. या बाबत अधिक माहीती देतांना माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजू शेट्टी यांनी सांगितले की १) गंगापुर, २) जिजामाता , विनायक , ३) शिवाजीराव पाटील निलंगेकर लातुर , ४) ५) डॉ पद्मश्री वि.वि.पा लातुर , ६) गजानन , बीड , ७) पांझराखान धुळे ८) जयजवान लातुर ९) सांगोला सोलापुर १०)यशवंत पुणे ११) बापुराव देशमुख वर्धा १२) जय किसान यवतमाळ हे सहकारी साखर कारखाने दिर्घ मुदतीच्या कराराने भाडे तत्वावर देण्यासाठी राज्य सहकारी बँकेने निविदा काढल्या आहेत.
राजू शेट्टी यांनी सांगितले की, पुण्या जवळील यशवंत सहकारी साखर कारखाना अवसायनात काढताना राज्य सहकारी बँकेचे केवळ १८ कोटी रुपये थकीत कर्ज होते, संस्थेची २४८ एकर जमीनीचे मुल्यांकन केवळ अडीच कोटी रुपये पकडुन संस्था बोगस रित्या दिवाळखोरीत काढण्यात आली. यशवंत कारखान्याच्या सभासदांनी एक रक्कमी कर्ज परत फेड योजनेतून भागभांडवल वाढवून कारखाना ताब्यात घेण्यासाठी तयारी दर्शविली त्यासाठी बॅंकेत खाते उघडण्याची परवानगी मागितली पण त्यांना परवानगी न देता त्या विरुद्ध सभासद शेतकर्यांनी उच्च न्यायलयातून मनाई हुकुम घेतलेला असतांना देखील राज्य सहकारी बँक कारखाना भाडे तत्वावर देण्यासाठी अतिउतावळी का? या सर्व घटनेमागील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल उपस्थित होतो. वरील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या फेर निवडणुका घेत सभासदांना संस्थेचा कारभार करणेसंदर्भांत निर्णय घेऊ दिला पाहीजे असे मत त्यांनी मांडले.