प्रा. हरी नरके
माझ्या माहितीप्रमाणे मराठी भाषेत प्रकाशित झालेली स्त्रियांची आत्मचरित्रे १३० पेक्षा जास्त आहेत. त्यातली सुमारे १०० शहरी, मध्यमवर्गीय, बुद्धिजीवी समाजातील स्त्रियांची आहेत. उरलेली ३० ही अनुसूचित जाती,जमाती, भटके,विमुक्त, अल्पसंख्यक, बहुजन समाजातील स्त्रियांनी लिहिलेली आहेत. दोन्ही प्रकारात श्रेष्ठ साहित्यमुल्यं असलेली काही आत्मकथनं – आत्मचरित्रे आहेत. काही गाजलेली आहेत,काही गाजवलेली आहेत.
उदगीरच्या ९५ व्या अ. भा. म. सा. संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते काल पुण्यात “मी अंजना शिंदे” या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. ग्रामीण भागातून येऊन फ्लॅट – बंगल्यात धुणीभांडी करणारी एक अल्पशिक्षित (जवळजवळ निरक्षर) बाई आपल्या कष्टाच्या जोरावर मोठी भरारी घेते. प्रामाणिक परिश्रम, लाघवीपणा व हरहुन्नरीपणा यांची झेप किती उंच असते त्याचा आलेख म्हणजे हे आत्मचरित्र. अंजनाबाई फुटपाथवर भाजी विकू लागतात. दररोज पहाटे ४ वाजता उठून मुलांचे डबे तयार करून देतात व मग सायकल चालवत मार्केट यार्डात जाऊन भाजी आणतात, फुटपाथवर दिवसभर भाजी विकतात. मुलांना उत्तम संस्कार नी शिक्षण देतात. नवरा व्यसनी असूनही बाई समाधानी संसार उभा करतात. त्यांचा धाकटा मुलगा स्वत:चा उद्योग उभा करतो, आईने जिथे धुणीभांडी केली, तिथेच उच्चभ्रू सोसायटीत महागडा फ्लॅट खरेदी करतो. लोक विचारतात,” काय भाजी विकायला आलात का शिंदेबाई, ” त्यावर त्या म्हणतात, “माझ्या मुलाचा फ्लॅट आहे या सोसायटीत!”
या पुस्तकातला जगण्याचा संघर्ष उद्धव शेळके यांच्या “धग” च्या तोलामोलाचा आहे. अंजनाबाई बोलक्या आहेत.हसतमुख आहेत.शेजारी पाजारी यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आहेत. पन्नासी ओलांडल्यावर बाई पोहणे शिकायला पुढे सरसावतात. अल्पशिक्षित असूनही वाचनाची गोडी असते. कोविडच्या लॉकडाऊमध्ये बाई आपली संघर्षाची कहाणी लिहून ठेवतात. मुलगा विशाल अंजना सर्जेराव शिंदे तिचे शब्दांकन करतो.
यातली चित्तरकथा विलक्षण आहे. अनुभव अस्सल आहेत. जगण्याची उमेद वाढवणारी श्रमसंस्कार व संस्कृतीची नायिका अंजनाबाई कोविडच्या आजाराशी लढत जगाचा निरोप घेतात. कपाळावर सावित्रीबाईंसारखी ठसठसीत चिरी (आडवे कुंकू) लावणाऱ्या अंजनाबाई यांची ही कथा मराठीतल्या स्त्री आत्मचरित्रात पहिल्या दहात गणना करावी लागेल इतकी दणकट आहे. एका दर्जेदार आत्मचरित्राचे वाचन आपण करायलाच हवे.
(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)