प्रा. हरी नरके / व्हा अभिव्यक्त!
आपल्या एखाद्या शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्काराने सन्मानित केले जाते ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. त्याचे कौतुक वाटण्याऐवजी वरिष्ठ अधिकारी व सहकारीवर्गाला हेवा,असूया, स्पर्धा भावना गंड त्रास देऊ शकतात.त्यामुळे प्रोटोकॉल, विहित कार्यपद्धती यांचे बाऊ करून त्याला छळले गेलेले असू शकते. त्याचा मानसन्मान, प्रसिद्धी इतरांना बोचू शकते. पण ही झाली एक बाजू.
या प्रकरणाला दुसरीही बाजू असू शकते.
तो शिक्षक सांगतो, तेच खरे, त्याला त्रासच दिला गेला हा निष्कर्षही आतातायीपणाचा असू शकतो. या ठिकाणी जे जि.प. प्रमुख आहेत त्यांच्यासोबत मी काम केलेले आहे. माझा अनुभव अतिशय उत्तम आहे. स्वच्छ,कार्यक्षम आणि नम्र अधिकारी आहेत ते. ते मुद्दाम कुणाला आकसबुद्धीने वागवतील असे मला तरी वाटत नाही.
या गुरुजींचे गैरहजर राहणे, वरिष्ठांशी अरेरावीने वागणे, विहित मार्ग टाळून माध्यमाद्वारे बोलणे, नियम डावलून चमकेशगिरी करणे हे खरे असेल तर तेही अनुचितच होय.
अमुकतमुक गैर वागतात मग हेच वागले तर काय बिघडले हे युक्तीवाद बालिश आहेत. बाकी लोक चोर आहेत, मग मी केली चोरी तर काय हरकत आहे? ह्या टाईपचे हे प्रश्न आहेत.
एक गृहस्थ भ्रष्टाचार विरोधात शंकराचार्य म्हणून मिरवतात, पण स्वत:च्या धर्मादायसंस्थेची कागदपत्रे मात्र माहिती अधिकारात देत नाहीत. हे जसे अयोग्यच. तसेच पुरस्कार मिळाला म्हणून कर्तव्यात सूट मिळावी, वाट्टेल तसे वागायचा परवाना मिळाला असे मानणे हे चुकीचेच आहे. इथे कुणीही कायद्याच्यावर नाही. पुरस्कार विजेते खोटे बोलत नसतात असा पूर्वानुभव नाही. स्वार्थासाठी तेही व्यवस्थेचा गैरवापर करू शकतात. तेव्हा कुणीतरी नियमांच्या वर असल्याचा कांगावा बास झाला.
उगीच अधिकाऱ्यांच्या नावाने एकतर्फी सुतक पाळणे फार झाले. नियम, कायदे, संविधान यांच्यावर कुणीही नाही. पुरस्कार मिळाला म्हणजे सगळ्या व्यवस्थेला फाट्यावर मारण्याचा परवाना मिळाला हा भ्रम योग्य नव्हे.
(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)