प्रफुल्ल वानखेडे
प्रफुल्ल वानखेडे हे स्वबळावर शून्यातून शिखर गाठणारे उद्योजक. नाविन्यपूर्ण कल्पनांनी सळसळणारे, सतत सक्रिय राहणारे आणि त्याच बरोबर वाचन प्रचार-प्रसाराचं व्रत घेतलेले वाचनप्रेमी. मराठी माणसांना उद्यमशील बनवण्यासाठी त्यांचे सल्ले मोलाचे. असेच त्यांच्या अनुभवातून मांडलेला जीवन मंत्र:
२००९ हा आयुष्यातील तोपर्यंतचा अत्यंत कठीण आणि भावनिकदृष्ट्या कधीही न विसरता येणारा काळ होता.
बाबांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आणि पुढे मेंदूचे ऑपरेशन,त्याचवेळी भावाचा मोटारसायकलवरून पडून अपघात आणि पाय फ्रॅक्चर,माझ्या एका पायात साईटवर दगड घुसल्याने पाय सुजलेला तर कंपनीत प्रचंड गोंधळ…
नवा व्यवसाय,प्रस्थापितांच्या समोर फक्त तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान एवढेच काय ते आमचे भांडवल. बरं त्यात आमची सर्व टिम १९/२२ वयोगटातली,प्रचंड मेहनती,कष्टाळू पण आम्हा सर्वांकडेच तशी बऱ्याच इतर गोष्टींची, अनुभवाची कमतरता होती. त्यात कौंटूबिक पातळीवर प्रचंड संकटाची मालिका.
कोणत्याही कंपनीत सेल्स जेवढे महत्वाचे तेवढेच परचेसही. मला तर सर्वच आघाड्यांवर पळावे लागायचे, आमच्याकडे त्याकाळी बरेचशे व्हेंडर नवे होते. (आज तेच आमचे ७०% हून जास्त व्हेंडर आहेत जे आता १४ वर्षापासून आम्हाला सेवा देताहेत) यातच एक चरणसिंह(नाव बदललेय) म्हणून माझ्या पुर्वीच्या कंपनीतील परिचितही होते. ते आमच्यासाठी साईटवरील काही विशिष्ट काम करायचे. हिंदीवर प्रचंड पकड आणि बोलण्यात एकदम पटाईत,इंडस्ट्रीतल्या तमाम बातम्या घेऊन स्वारी हजर झाली की तीन चार तास ऊठायचीच नाही.पुढे मग माझी आई,पत्नी,मुलगी
वडील आणि इतर सर्वांबद्दलही आस्थेने चौकशी व्हायची. चरणसिंग आले कि त्यांचे हास्यविनोद, कपाळाकडे पाहून भविष्य सांगण्याची पद्धत आणि व्यावसायीक खबरी असल्याने त्यांच्यासोबत बराच काळ जायचा. मी प्रेमाने बोलत असल्याने लोकांनाही ते आपलेच वाटायचे. मलाही रोजच्या तणावातून बदल वाटायचा.
व्यावसायिक दृष्ट्या तसे आम्ही बऱ्यापैकी मजबूत होतो, तुफान वेगात, अचूक काम करणे हा आमचा हातखंडा पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मी पुण्यात रूबी हॅालमधेच वडीलांसोबत रहायला लागलो आणि मुंबईतील माझ्या वास्तव्यावर मर्यादा आल्या. माझा बाबा म्हणजे माझे सर्वस्व. दिवसभर नगर,कोल्हापुर,पुणे
सातारा मुंबई कोकण करून मी रात्री बाबांसोबत झोपायचो.
कधीकधी तर दिल्ली,जयपूर,गोवा एका दिवसात विमानाने करून पुन्हा बाबांसोबत असायचो. खूप थकायचो, मनाने आणि शरीरानेही पण हे कोणालाच सांगू शकत नव्हतो. घरचे मोठे वडीलधारे दवाखान्यात आणि कंपनीत मीच वडीलधारा. कधीकधी पूर्ण मोडून जायचो
मी आणि पत्नी एकत्र असलो की दोघेही अस्वस्थ होऊन रडायचो. ॲाफिसला जावून बसलो की घरचे टेंशन आणि घरी आलो की ॲाफिसची आठवण. सांत्वन करणारे भेटले की रडू कोसळायचे. अशात चरणसिंगही यायचे, कधी वेगवेगळ्या खड्यांच्या अंगठ्या घेऊन, कधी एखादा अंगारा घेऊन कधी वेगवेगळे उपवास करायला लावायचे.
धड साधी तिशी पण पार न केलेला मी अंधारात चाचपडत होतो. ते काय सांगतील ते करायचो. वेगळाच खेळ झाला होता आयुष्याचा.
इकडे लोकांनाही ते माझे जवळचे स्नेही वाटायचे त्यामुळे साईटवर यांना भरपूर कामं मिळत होती. बरं मी दवाखाने आणि दौऱ्यात अडकल्याने फोनवरच बिल्स क्लियर करायचो. चरणसिंग एकामागे एक काम करत होते त्यासोबतच त्याच साईटवर डायरेक्ट कस्टमरकडून इतरही कामं मिळवायचे. आम्ही याला कधी आक्षेप घ्यायचो नाही कारण त्यात तसा आमचा काही तोटा नव्हता.
एक दिवस मी वेळ काढून मुंबई ॲाफीसला सहज येऊन बसलो आणि आमच्या फायनान्स टिमकडून मी नसताना काढलेल्या बिलांचे डिटेल्स मागवले. तसे सर्व काही सुरळीत होते,सहज म्हणून चरणसिंहाचीही बिल पाहिली आणि त्यांचे रेट्स पाहून मी अक्षरश: तीन ताड उडालो, पुन्हा पुन्हा सर्व तपासले आणि प्रचंड मोठा घोटाळ्याची जाणीव झाली. त्यांनी इकडे माझ्या भावनांना कुरवाळत दोनच्या समोर चार रूपये आणि १०० मीटरच्या जागी २०० मीटर करून लाखोंची मोठमोठी बील्स पास केली होती. मी ताबडतोब आमच्या खास माणसांना सर्व स्वत:हून चेक करायला लावले, आमचे काही लोक यात सामिल आहेत का ते ही पाहिले पण सुदैवाने तसे काही नव्हते. रागाने आणि विश्वासघाताने मी फुरफुरत होतो, चेहरा लालेलाल झाला होता. काय करावे काही कळत नव्हते. पण एवढ्यात घरून बाबा अस्वस्थ आहेत असा फोन आला आणि मी सर्व सोडून घरी आलो.
त्या रात्री बाबा ठिक झाले, माझीही झोप झाल्याने मी शांत झालो होतो. ॲाफीसमधे जावून सर्व पुन्हा पाहिले,काय करता येईल याचे नियोजन केले, चरणसिंहाकडून पैसे वसूलीचा पुर्ण प्लान बनवला, तो पुढच्या काही महिन्यात शांतपणे अंमलात आणला आणि त्याहूनही शांतपणे त्यांना कायमचा निरोपही दिला. पुढे भविष्यात कधीही त्यांना आमच्याकडून कामं किंवा इज्जत दोन्ही मिळाली नाहीत.
या काळाने खूप धडे दिले, व्यवहारातील सुसूत्रता आणि Standardization का महत्वाचे असते हे ठळकपणे जाणवले. लोकं कोणत्याही टप्यावर आपला घात करू शकतात हे कायम ध्यानात ठेवायचे. पैशांसाठी काही लोकं कोणत्याही थराला जातात, त्यांना तुमच्या कोणत्याच गोष्टींशी काहीच देणेघेणे नसते, माणसाच्या रूपातही लांडगे आणि कोल्हे असतात ते उगाच म्हणत नाहीत. ती हिंस्र श्वापदे वेळीच ओळखायची आणि त्यांचा बंदोबस्तही करायचा.
मित्रहो एक गोष्ट लक्षात ठेवायची- आपल्या अडचणीच्या काळात सर्वांनाच आपले प्रॅाब्लेम सांगत बसू नका,इमोशनल तर अजिबात व्हायचे नाही.काहीजण आपल्यावर हसतात तर बरेच लोकं त्यात संधी शोधतात. त्यातही जेंव्हा तुम्ही सर्वात मोठ्या आणीबाणीसदृष्य परिस्थितीतून जात असाल तेंव्हा कधीच रागात निर्णय घ्यायचे नाहीत. शांत झोप, सकस आहार, विचारपुर्वक पावले आणि ठराविक मित्र/सहकारी आपल्याला कोणत्याही संकटातून सहज बाहेर काढू शकतात. आर्थिक किंवा मानसिक परिस्थितीचा गैरफायदा उचलायला हे असले डोमकावळे तयारच असतात, त्यांना कधीच संधी द्यायची नाही.
भावना आणि आर्थिक व्यवहार नेहमी वेगळे ठेवायचे. या जगात जर तुम्ही भावनाविवश झालात तर कफल्लक व्हायला वेळ लागत नाही. यश मिळवायला खुप संघर्ष करावा लागतो पण कंगाल होण्यासाठी फक्त दुर्लक्ष झाले तरी पुरे.
काळजी घ्या;
धन्यवाद!
(सदर लेख हा @wankhedeprafull यांच्या ट्विटर हँडलवरील ट्विट मालिकेचे एकत्रिकरण आहे. त्यांच्या अशाच विचारांशी, कल्पना जाणून घेण्यासाठी त्यांच्या हँडलला फॉलो करा)
२००९ हा आयुष्यातील तोपर्यंतचा अत्यंत कठीण आणि भावनिकदृष्ट्या कधीही न विसरता येणारा काळ होता.
बाबांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आणि पुढे मेंदूचे ऑपरेशन,त्याचवेळी भावाचा मोटारसायकलवरून पडून अपघात आणि पाय फ्रॅक्चर,माझ्या एका पायात #SaturdayThread #BusinessDots #मराठी #सत्यकथा १/१८ pic.twitter.com/OfzKO89wnS
— Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) March 20, 2021