मुक्तपीठ टीम
राज्यातील नदी-तलावांची प्रदूषणमुक्ती राज्याच्या पर्यावरण विभागाच्या अजेंड्यावर राज्यातील नद्या आणि तलावांसारख्या नैसर्गिक जलस्त्रोतांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी पर्यावरण विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याचाच एक भाग म्हणून नुकत्याच काही बैठका घेतल्या. विदर्भातील वैनगंगा नदी आणि तलावाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी या बैठकांमध्ये चर्चा झाली. पर्यावरण मंत्र्यांनी प्रशासनाला पुढील सात दिवसांमध्ये प्रदूषणमुक्ती योजनेचे आराखडा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
वैनगंगा कशी होणार प्रदूषणमुक्त?
• वैनगंगा नदीला प्रदूषित करणाऱ्या नागपूर, भंडारा, कामठी, कन्हान, मौदा, पवनी येथून निघणाऱ्या प्रत्येक नाला, नदी यांचे मॅपींग केले जाईल.
• छोटे नाले व ते मिळणाऱ्या नद्या असे वर्गीकरण करुन प्रत्येक ठिकाणाहून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणार
निधी नियोजनासह सविस्तर कृती आराखडा तयार करण्याबाबत यावेळी ठाकरे यांनी सूचना केल्या.
चंद्रपुर येथील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबतही चर्चा झाली. तलावात मिसळणाऱ्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करणे व तलाव स्वच्छ करणे याबाबत लघु, मध्यम व दीर्घ स्वरुपाचा कृती आराखडा तयार करण्याचा मार्ग पुढे आला. त्यासाठी ७ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिले. तलाव स्वच्छ करणे या बाबीला प्राथमिकता देऊन हे काम लवकरात लवकर होईल याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देशही ठाकरे यांनी दिले.
रामाळा का झाला प्रदूषित?
• रामाळा तलाव चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असून सुमारे ६०० वर्षे जुना आहे.
• तलावात आजुबाजुच्या वस्तीतून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी तसेच लगतच्या रेल्वे डेपोमधून येणारे सांडपाणी मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे.
• संपूर्ण तलाव जलपर्णीने भरला आहे.
• तलावातील पाणी स्वच्छ करण्याचा
तसेच तलावातील गाळ काढण्याचा मागील १०-१२ वर्षापासून प्रयत्न होत असून तलाव पूर्णत: स्वच्छ करणे व गाळ काढण्याचे काम अद्यापपावेतो पूर्ण झालेले नाही. रामाळा तलाव स्वच्छतेसंदर्भात काम हाती घेतल्याने उपोषणास न बसण्याबाबतच्या पर्यावरणमंत्री ठाकरे यांच्या विनंतीनुसार इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी उपोषणास न बसण्याबाबत मान्य केले.
पाहा व्हिडीओ: