तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोमवारी ट्वीट केले की “विरोधकांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्हाला लेखी कळवले आहे. त्यांची अपेक्षा अशी आहे की, याचा पुढाकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा.” त्यावर आम्ही इतर नेत्यांशी बोलून अंतिम निर्णय घेऊ, असेही पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं. भाजपा विरोधकांच्या देशव्यापी आघाडीचे सुतोवाच करणारे त्यांचे हे ट्वीट आले त्याच दिवशी बातमी गाजली ती भाजपा विरोधातील १३ पक्षांच्या पत्रावर सही करण्यापासून शिवसेना दूर राहिल्याची. त्यामुळे नेमकं काय चाललं आहे? शिवसेना जर विरोधकांच्या आघाडीसाठी पुढाकार घेण्यात पवारांसोबत असणार तर मग त्याच विरोधकांच्या पत्रापासून का दूर? यावर चर्चा सुरु होणं स्वाभाविकच होतं.
शरद पवारांचे ट्वीट
विरोधकांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्हाला लेखी कळवले आहे. त्यांची अपेक्षा अशी आहे की, याचा पुढाकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा.आम्ही इतर नेत्यांशी बोलून अंतिम निर्णय घेऊ. मात्र याची कोणतीही तारीख ठरलेली नाही.
तसेच विरोधकांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्हाला लेखी कळवले आहे. त्यांची अपेक्षा अशी आहे की, याचा पुढाकार मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 18, 2022
भाजपाविरोधी १३ पक्षांचे हिंसाचाराविरोधात पत्र!
- देशभरात गेले काही दिवस घडणाऱ्या हिंसक घटनांविरोधात भाजपाविरोधातील पक्षांनी एक पत्र लिहिले आहे.
- हे पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन लिहिलं आहे.
- मागील काही दिवसांपासून द्वेषपूर्ण भाषणांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला जात असल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमांदरम्यान होत असणारा हिंसाचार हा चिंतेची बाब असल्याचंही म्हटले आहे.
- पंतप्रधानांचं मौन पाहून आम्हाला धक्का बसला आहे.
- आपल्या वक्तव्यांनी आणि वागण्याने समाजातील काही घटकांना चिथावण्याचं काम करणाऱ्यांविरोधात पंतप्रधान काही बोलत नाही किंवा कारवाई करत नाही हे धक्कादायक आहे.
- हे मौन म्हणजे अशा खासगी झुंडींना एकप्रकारे देण्यात आलेलं समर्थन आहे.
- देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये एक विशिष्ट पद्धत दिसून येत असल्याचं निदर्शनास आल्याने आम्हाला चिंता वाटते आहे.
- द्वेषपूर्ण भाषणांमुळे सशस्त्र धार्मिक मिरवणूका निघतात आणि त्यामधून हिंसा होत आहे.
शिवसेना पत्रापासून दूर
- देशातील हिंदू – मुस्लिम हिंसाचाराच्या घटनांबद्दलच्या या पत्रावर भाजपाविरोधातील १३ पक्षांच्या सह्या आहेत.
- या तेरा पक्षांमध्ये भाजपाविरोधात जात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सत्तेत आलेल्या शिवसेनेचा समावेश नाही.
- त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शिवसेनेचं नेमकं काय चाललंय?
- हिंदू – मुस्लिम हिंसाचाराच्याविरोधातील पत्रापासून शिवसेना दूर राहिल्याने शिवसेनेची भूमिका नेमकी काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
- पण शिवसेनेच्या नेत्यांच्या मते शिवसेनेची भूमिका ही योग्यच आहे.
- शिवसेना धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आहे याचा अर्थ शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले आहे, असा नाही.
- शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेशी कायम असल्याचे गेल्या वर्षभरात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा सांगितले आहे.
- भाजपाने शिवसेनेच्या हिंदुत्वावर आक्षेप घेतल्यापासून उद्धव ठाकरे सातत्याने हिंदुत्वाच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत असतात.
- आजवर कधी नाही ती माहिती त्यांनी काही महिन्यांपूर्वीच्या भाषणा उघड केली होती.
- १९९२-९३ दंगलीच्या वेळी ते कुर्ल्याच्या दंगलग्रस्त भागात गेले असताना त्यांना दंगलखोरांपासून एका वृद्ध महिलेचे संरक्षण करणारे शिवसैनिक भेटले.
- त्यांनी केवळ विटांचा वापर करत दंगलखोरांना पळवले, याचा ठाकरे यांनी भाषणात खास उल्लेख केला.
- त्यानंतरही ते सातत्याने हिंदुत्वाची भूमिका मांडत भाजपाच्या भूमिकेला फिकं मांडत आले आहेत.
- मनसेने हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतरच्या परिस्थितीत तर शिवसेनेला केवळ बोलून नाही तर कृतीतूनही हिंदुत्ववादी भूमिका मांडणं आवश्यक आहे.
- शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी महाआरती करणे, आदित्य ठाकरेंनी पुजेत भाग घेणे वगैरे कार्यक्रमांमधूनही शिवसेना हिंदुत्ववादी भूमिकेत कायम असल्याचं दाखवत असते.
शिवसेनेला भाजपा विरोधकांच्या पत्राचे का वावडे?
- शिवसेनेकडून त्या पत्रावर कोणाची सही नसल्याचं कारण सांगितलं गेलं नसलं तरी शिवसेनेचे नेते त्या पत्रावर सही करणाऱ्या अन्य पक्षांकडे लक्ष वेधतात.
- त्यात असणारे नॅशनल कॉन्फरन्ससारखे पक्ष अनेकदा खूप टोकाची भूमिका घेतात.
- त्याचबरोबर पत्रात थेट म्हटलं नसलं तरी धार्मिक मिरवणुका आणि झुंड हे शब्द हिंदुंकडेच बोट दाखवणारे मानले जाण्याची शक्यता आहे.
- भाजपासह मनसेही त्या पत्राचा वापर करत शिवसेनेवर हिंदूविरोधी भूमिकेचा आरोप करू शकले असते.
- बहुधा त्यामुळेच शिवसेनेने हिंदुत्वाच्या भूमिकेला अडचणीत आणणारं पाऊल उचलणं टाळलं असावं.
- त्याचा अर्थ असा नाही की शिवसेना लगेच काही वेगळा विचार करत असावी.
- पण एक नक्की की भविष्यात नवाब मलिकांच्या मंत्रीपदाबद्दल मात्र शिवसेना वेगळी भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- मुंबई बॉम्बस्फोट आरोपी, डी कंपनी कनेक्शन वगैरे आरोप असलेल्या नेत्याला मंत्रीपदी ठेवणं शिवसेनेच्या मतदारांना रुचणार नाही, अशा भूमिकेतून शिवसेना त्याबद्दल वेगळे विचार मांडण्याची शक्यता असू शकते.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)