मुक्तपीठ टीम
संवेदनशीलतेविना माणूस असूच कसा शकतो? पनवेलमध्ये दोन चिमुरड्या मुलींच्या उपचारांसाठी सामान्य पनवेलकर एकवटलेले पाहून संवेदनशीलता जागी असल्याचं दिसून आलं. स्वराली आणि स्वरांजली अमित जाधव यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी गेले काही दिवस पनवेलमध्ये प्रयत्न सुरु होते. चौक येथील स्वराली आणि स्वरांजली जाधव यांच्यावर बोन मॅरोचे उपचार सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक निधी गोळा करण्यासाठी कांतीलाल कडू यांनी पुढाकार घेतला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात राजा अत्रे दिग्दर्शित आणि प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘छुमंतर’ धमाल विनोदी नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी कांतीलाल प्रतिष्ठानने पनवेलकरांना साद घातली होती. पनवेलकरांनीही भरभरून प्रतिसाद देत चक्क १ लाख ८० हजारांची ओंजळ रिती केली.
जमवलेल्या निधीतून १ लाख ५० हजाराची रोकड ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे यांच्या शुभ हस्ते रसिकांच्या उपस्थितीत स्वराली आणि स्वरांजलीच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली. नाटकातील सर्व कलाकारांनी मुख्य कलाकार देवेंद्र सरदार यांच्या नेतृत्वाखाली विनामोबदला कला सादर केली. मात्र, रंगमंचासाठी वाहतुक आणि इतर खर्चापोटी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. कराळे यांच्या हस्ते ३० हजाराची रोकड नाटकाचे दिग्दर्शक अत्रे यांच्याकडे प्रतिष्ठानने स्वाधीन केली.
यामध्ये तिकीट विक्रीतून आलेले १ लाख ५५ हजार आणि लोकनेते दि. बा. पाटील यांचे पुतणे अविनाशशेठ पाटील यांनी त्यांची दिवंगत पत्नी छाया पाटील यांच्या १६ व्या स्मृतीप्रित्यर्थ स्वराली, स्वरांजली यांच्या वैद्यकीय उपचारासाठी दिलेले २५ हजार अशी एकून १ लाख ८० हजारांची घसघशीत आर्थिक मदत देवून कांतीलाल प्रतिष्ठानने करून पनवेलकरांचा स्वाभीमान जपण्याचे काम केले आहे.
‘गतजन्माची खूण सापडे ओळखले का मला…‘ स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला… या गीतातील हा मथळा. गतजन्मात आजही रेंगाळायला, हरवून जायला आवडणार्यांची संख्या काही कमी नाही. तर हा संदर्भ देण्याचे कारण इतकंच की, प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘छुमंतर’ नाटकाचा गाभा मुळी गतजन्मीच्या काही आठवणींवर झोके घेणारा आहे. त्यात सर्वच कलाकारांनी अफाट उर्जेतून रंगमंचालाच बोलते करून साक्षात नटरंग अवतरल्याची साक्ष उपस्थित रसिकांना दिली. तेव्हा गेल्या दहा हजार वर्षात असे ‘छुमंतर’ झाले नाही, अशी आचार्य अत्रे स्टाईल प्रतिक्रिया रसिकांनी दिली.
या नाटकात दिग्दर्शक राजा अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कलाकार देवेंद्र सरदार, सचिन पोळेकर, ऋषिकेश पिंगळे, साहिल परब, प्रमोद कार्ले, ऋषिकेश घाग, दर्शना कुलकर्णी-सरदार, स्नेहल तटकरे, स्नेहा पाटील आदींनी तुफान विनोदी संवाद, देहबोली, टाईमिंग, चेहर्यावरील हावभाव आणि रंगमंचावर घातलेला धुडगूस पाहून रसिकांना पोटात दुखायला लागेपर्यंत हसावे लागले. गतजन्माच्या आठवणी आणि चिमाजी आप्पांची राजेशाही, द्विभार्या प्रतिबंधक कायद्यावर विवेचन, परआत्मा काया प्रवेश करून कलाकारांनी रंगविलेल्या विविध भुमिका, भटजींचा झालेला मांत्रिक आणि मंत्रोच्चारातून घडलेले भलतेच प्रकरण पाहून रसिकांनी नाट्यगृहच डोक्यावर घेतले होते. दिग्दर्शक राजा अत्रे यांनी विनोदी फोडणी देताना दाक्षिणात्य गाण्यासह नृत्याचा अविष्कार घडविला आहे. तो अनुभवताना रसिकांच्या हातांचे जणू काही ढोलताशेच वाजत होते. शिट्ट्यांचा पाऊस पडत असताना कलाकारांना अधिक चेव चढत होता… अशा रितीने गेल्या दहा वर्षात असे छुमंंतर झाले नसल्याची पनवेलकर रसिकांनी पोचपावती दिली. यासाठी कांतीलाल प्रतिष्ठान निमित्त मात्र ठरले.
कांतीलाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिलेल्या आर्थिक मदतीच्या सुखद धक्क्याने कलावंत आणि उपस्थित पनवेलकर भारावून गेले होते. स्वराली, स्वरांजली जाधव यांचे वडील अमित जाधव यांनी कडू यांचे आभार मानले.