सरळस्पष्ट
प्रथमेश सावंत या अवघ्या २० वर्षांच्या तरुण गोविंदाने अखेर अखेरचा श्वास घेतला. या वर्षी दहिहंडी खेळताना वरच्या थरावरून कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दहीहंडी फोडण्यासाठी सरसर वर जाणाऱ्या प्रथमेशच्या जीवनाची हंडी कोसळलीच होती. पण तो मागील महिनाभर कसाबसा उपचारांच्या दोरीला लटकत मृत्यूशी झुंज देत होता. त्याला निमोनियाही झाला. त्यातच सकाळी त्याचा कार्डिएक अरेस्ट आल्याने मृत्यू झाला. प्रथमेशच्या आधीच विलेपार्ल्याच्या संदेश दळवीचाही असाच हंडीच्या खेळात मृत्यू झाला होता.
काही राजकीय पक्षांनी हिंदू सणांवरचं विघ्न टळलं म्हणून राजकीय श्रेयबाजी केली. कोट्यवधी उधळत दणक्यात उत्सव साजरे झाले. उंचच उंच हंडी चढल्या. मराठी तरुणांसाठी दहीहंडीचा सण म्हणजे एक उत्साहाचा संचार होणारी सांस्कृतिक परंपरा. ते आवर्जून भाग घेतात. त्यात गैर काहीच नाही. पण दहीहंडीत सेलिब्रिटी, डीजे, मीडिया प्रसिद्धी यावर कोट्यवधी उधळणारे राजकीय नेते आयोजक म्हणून या गोविंदांच्या सुरक्षेवर किती खर्च करतात, त्याचेच एकदा किरीट सोमय्या यांच्या स्टायलीत कुणीतरी पब्लिक ऑडिट केले पाहिजेत. हे गोविंदा सुरक्षित राहिले तर परंपरा टिकेल. नाहीतर आई-वडिल आपल्या लेकरांचे जीव जातात, म्हणून दूरच ठेवतील.
हिंदू सणांवरचं विघ्न कोरोना सारख्या साथीच्या रोगात काळजीस्तव उत्सवांवर येणारे निर्बंध नसून तरुण मुलांच्या जीवाला असणारा धोका हेच आहे. हिंदू धर्मात मुळात संयमानं शक्ती शोभते, वाढते, हे मानणारा. तिथं अतिरेकाला स्थान नाही. पण सध्या अनेकांना मग…त्यांचा पक्ष कोणताही असो, फक्त आक्रस्ताळेपणा म्हणजेच धर्माभिमान वाटतो. इव्हेंट मोठा झाला म्हणजे परंपरा जपली, असे वाटते. पण त्या इव्हेंटमध्ये सेलिब्रिटींच्या सुरक्षेसाठी बाऊंसर्सवर जेवढा खर्च होतो, तेवढा जरी या गोविंदांवर केला गेला, तरी खूप झाले असते. नसती प्रसिद्धी तेवढी मिळाली, पण किमान प्रथमेश, संदेश सारख्या तरुण गोविंदांचे जीव तरी वाचले असते.
प्रथमेश, संदेश अपवाद नव्हते!
मुंबई मनपाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या दातृत्वाला यावेळी उधाण आलं होतं. अर्थात त्यातही एक चलाखी होतीच. ती म्हणजे प्रत्यक्ष उत्सवमूर्ती असणाऱ्या गोविंदांवर केलेल्या खर्चापेक्षा सेलिब्रिटी, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंटवर केलेला खर्च खूप मोठा होता. तसं नेहमीच असतं. यावेळी जास्तच होतं. कारण निवडणुकांमध्ये लोकांना दाखवायला कामच नाही तर असे उत्सवही लागतात. आपलाही दोष आहेच. या दहीहंडीला मुंबई-ठाणे परिसरात किमान २५० तरी गोविंदा जखमी झाल्याच्या बातम्या आल्या. त्यापैकी १९७ गोविंदाना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते घरी परतले. पण उरलेल्या ५३ गोविंदांची अपवाद वगळता कोणत्या नेत्याने, कधी चौकशी केली? किशोरी पेडणेकरांसारखे काही अपवाद असतील, नाही असे नाही. पण इतर नेते काय फक्त फोटो आणि लाइव्हमध्ये चमकण्याची संधी म्हणूनच दहीहंडीकडे पाहतात की काय!
गोविंदांच्या कुटुंबांचे थरच कोसळले…
प्रथमेश सावंत याचं वय फक्त २०. उगाच ते काही जाण्याचं वय होते का…वगैरे भावनिक लिहिणार नाही. पण हे वय अशा पद्धतीने मरायचे नाही, हे राजकारण्यांना सुनवायचं तर नक्कीच आहे. कारण हा तरुण त्याच्या कुटुंबासाठी आधार होता. आई, वडिल, बहिणीच्या निधनानंतर त्याला सांभाळणाऱ्या चुलत्यांसाठी तोच आधार होता. आयटीआयचे शिक्षण घेतानाच डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे कामही तो करत होता. संदेश दळवीचेही तसेच.
प्रथमेशच्या उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांची मदत मिळाली. चांगलं आहे. पण मुळात राजकीय श्रेयबाजीत उत्सवांचे इव्हेंट करताना ते ज्यांच्या आधारावर उभे राहतात, त्या गोविंदांच्या जीवाचे मोल नसते काय, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. यापुढील काळात जर गोविंदांसाठी सक्षम सुरक्षा व्यवस्था नसेल तर आयोजनच करायला देऊ नये.
गोविंदांच्या सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष हे उत्सवांवरचे खरे विघ्न!
जाहिरातबाजीचा, सेलिब्रिटींचा खर्च थोडा कमी केला तर सहजच ते होऊन जाईल. संयमाने पाळलेले निर्बंध हे हिंदू सणांवरचं विघ्न नव्हतं, तर राजकीय श्रेयबाजीला हपापलेल्यांनी इव्हेंट मोठे करण्याच्या नादात गोविंदांच्या सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष हे उत्सवांवरचे खरे विघ्न आहे, याची जाण ठेवावी!