गौरव साळी
काळ्या मातीत बळीराजासोबत राबणाऱ्या बैलांचा मानपानाचा दिवस म्हणजे बैलपोळा. शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा असलेला असा हा पोळ्याचा सण. हा सण शेतकरी राजा अत्यंत अनंदात आणि उत्साहात साजरा करतो. सणासाठी खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांचे पाय आता बाजाराकडे वळू लागले आहेत. सर्जा राजाला सजवण्यासाठी विविध साहित्य बाजारात उपलब्ध झाले.
शेतकरी आणि बैल…एक जीवाभावाचं नातं. खरंतर शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी बैल हा त्यांच्या कुटुंबातीलच एक. तो शेतकऱ्यांसोबत शेतात राबतो आणि शेतकरीही त्याला तसाच जीव लावतो. अगदी घरातल्या माणसासारखाच त्याच्याशी वागतो. बैलपोळ्याचा सण हा त्यामुळेच धामधुमीत साजरा होतोच होतो.
दोन वर्षे कोरोनामुळे सणांवर निर्बंध होते पण आता कोरोनाचे सावट कमी झाले असल्याने सर्व निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा सर्जा राजाचा सण अर्थात पोळाही थाटामाटात साजरा होणार आहे. हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सणासाठी खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांचे पाय आता बाजाराकडे वळू लागले आहेत. सर्जा राजाला सजवण्यासाठी विविध साहित्य बाजारात उपलब्ध झाले असून त्यामध्ये वेसण, कासरा, सर, गोटे, झूल, बाशिंगे असे सजावटीचे साहित्या खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधव बाजार पेठेत येत आहेत मागील वर्षी पेक्षा यंदा सजावटीच्या भावामध्ये २०% वाढ झाल्याची व्यवसायिक सांगत आहेत.
शेतकरी राजा सोबतच प्रत्येक घरात बैलांची पूजा केली जाते. जालना शहरातील कुंभार गल्लीत मातीचे बैल बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कुंभार गल्लीतील कामगार गाय व बैलांच्या मुर्ती बनवण्यात तसेच वाळलेल्या मुर्त्यांना रंग देवून शेवटचा हात फिरवताना दिसून येत आहेत. सण अगदी तोंडावर येवून ठेपल्याने आता बाजारात मुर्ती विक्रीसाठी पाठवल्या जात आहेत. बाजारदेखील विविध आकाराच्या,रंगांच्या मातीच्या बैलानी सजून गेला आहे.जोडीला ४० ते ५० रुपये या भावाने सुरू होणाऱ्या मातीच्या साध्या बैलांपासून ते अगदी ३००/ ४०० रुपये जोडी पर्यंत मुर्तींनी भाव वधारला आहे.
शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय आपला बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात गुंतलेत…त्यामुळे अवघ्या बाजारातही तोच उत्साह दिसतोय.