मुक्तपीठ टीम
मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राने आपल्या सायन्स ओडिसी या सुविधाकेंद्रात ‘जर्नी टू स्पेस’- अर्थात ‘अंतराळात प्रवास’ या विज्ञानपट आज प्रदर्शित केला. टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी- प्रा. एम.एन.वहीया यांनी या विज्ञानपटाच्या प्रदर्शनाचा प्रारंभ केला. यावेळी प्रा.वहीया यांनी विद्यार्थ्यांशी खगोलीय घडामोडी, कृष्णविवरे, ग्रह आणि ख-भौतिक आदी विषयांवर संवादही साधला.
NSC चे ‘सायन्स ओडिसी’ सुविधाकेंद्र- चित्रपट बघण्याचा चित्ताकर्षक अनुभव
नेहरू विज्ञान केंद्रातील ‘सायन्स ओडिसी’ सुविधाकेंद्रात १८ मीटर व्यासाच्या अर्धगोलाकार घुमटावर चित्रपटाचे प्रक्षेपण करणारी मोठी प्रणाली बसवण्यात आली आहे. गोलाकार प्रक्षेपण उपकरणाच्या मदतीने पूर्ण घुमटाकार पडद्यावर प्रक्षेपित होत असलेला विज्ञानपट बघण्याचा अनुभव म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. अशा प्रकारचा हा मुंबईतील विशेष अनुभव होय. ‘आफ्रिका- द सेरेंगेटी’, ‘एव्हरेस्ट’, ‘द लिव्हिंग सी’, ‘कोरल रीफ ऍडव्हेंचर’, ‘द ग्रेटीस्ट प्लेसेस’, ‘अमेझॉन’, ‘द जर्नी इंटू अमेझिंग केव्ज’, ‘ग्रँड कॅन्यन ऍडव्हेन्चर -रिव्हर ऍट रिस्क’, ‘ऍडव्हेंचर्स इन वाईल्ड कॅलिफोर्निया’, ‘अंटार्क्टिका- अन ऍडव्हेन्चर ऑफ डिफरन्ट नेचर’, ‘ टू फ्लाय’, ‘ऍड्रिनलिन रश – द सायन्स ऑफ रिस्क’, ‘अलास्का- स्पिरिट ऑफ द वाईल्ड’ आणि ‘डॉल्फिन’ असे विज्ञानपट यापूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते आणि त्यांना अभ्यागत प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.
अंतराळ क्षेत्रातील पूर्वीच्या यशस्वितेवर, सध्याच्या उपक्रमांवर आणि भविष्यातील योजनांवर, जर्नी टू स्पेस या विज्ञानपटात ओझरती नजर टाकण्यात आली आहे. क्रिस फर्गसन आणि सेरेना ऑनन या अंतराळवीरांच्या विस्तृत मुलाखतींच्या माध्यमातून हा वेगवान आढावा घेण्यात आला आहे.
‘स्पेस शटल’ कार्यक्रमाने दिलेल्या भव्य योगदानाची आणि त्यातील पहिल्यावहिल्या अंतराळवीरांच्या महनीयतेची नोंद ‘जर्नी टू स्पेस’ या विज्ञानपटाने घेतली आहे. अंतराळातील सर्वाधिक नयनरम्य दृश्ये यात वापरली आहेत. यामध्ये पृथ्वीची काही विशेष दृश्ये आणि अंतराळातील काही खास मोहिमा- जसे हबल अवकाश दुर्बीण बसवणे आणि दुरुस्त करणे- अशा काही विशेष गोष्टींचा समावेश आहे. पुढे, शटलने आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र (ISS) कसे नेऊन बसवले, त्याच्या जोडण्या कशा केल्या- हेही यात दाखवले आहे. या सर्व कार्यक्रमांनी आपल्याला एकत्रितपणे, ‘अंतराळात विज्ञान कसे जगावे, कसे रचावे आणि कसे वापरावे’- याचा वस्तुपाठच घालून दिला आहे. ISS वर्ष 2024 पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. भविष्यातील आणखी उत्तुंग भराऱ्यांसाठी ISS मुळे कसा पाया रचला जात आहे, याचेही दर्शन या चित्रपटातून आपल्याला घडते. चित्रपटाच्या शेवटी, अंतराळवीर मंगळावर कसे पोहोचतील, तेथे दीर्घकाळ कसे राहतील आणि अडीच वर्षांच्या मोहिमेनंतर पृथ्वीवर कसे परततील, याचे वास्तवदर्शी आणि चित्ताकर्षक दर्शन घडते.
या चित्रपटाचे दररोज पाच खेळ होणार असून, मोठ्या गटांसाठी विनंतीवरून विशेष खेळही केले जातील.
नेहरू विज्ञान केंद्र हे भारतातील सर्वात मोठ्या विज्ञान केंद्रांपैकी एक असून ते २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशसेवारत आहे. केंद्राच्या अभिनव कार्यक्रमांमुळे, तसेच प्रदर्शने व अन्य सुविधांमुळे अभ्यागतांना व विज्ञानप्रेमींना विज्ञानाचा अविस्मरणीय अनुभव घेता येत असून, त्यामुळे पश्चिम भारतात विज्ञानाची लोकप्रियता वाढविणारे केंद्र म्हणून ते नावारूपाला आले आहे. दरवर्षी साडेसात लाखांहून अधिक लोक या केंद्राला भेट देतात.
होळी आणि दिवाळीचे दिवस सोडता हे केंद्र वर्षभर दररोज सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० या वेळात विज्ञानप्रेमींसाठी सुरु असते. केंद्राला भेट देण्यासाठी २४९३ २६६८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा पुढील संकेतस्थळांवरही अधिक तपशील मिळू शकतील-
www.nehrusciencecentre.gov.in. & www.facebook.com/nehrusciencecentre.
पाहा व्हिडीओ: