मुक्तपीठ टीम
आता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणे हे बारावी परीक्षा उत्तीर्ण होण्यासारखेच मानले जाईल. तसेच जे विद्यार्थी दहावी परीक्षेत नापास झाले असतील, परंतु जर त्यांनी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, तर त्यांना दहावी उत्तीर्ण समजले जाईल.
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षापासून काळानुरुप बदल करणारी पावलं उचलली आहेत.व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयटीआयच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन भाषेच्या विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर समान दर्जा दिला जाईल.
शासकीय आयटीआयचे औरंगाबादमधील प्रमुख अभिजित आलते यांनी सांगितले की, “समता योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या संस्थांना एमएसबीएसएचएसई मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.”
“आम्ही पाच प्रशिक्षण संस्थेमध्ये समता योजना देण्यासाठी शैक्षणिक मंडळांकडे आवश्यक ती औपचारिकता पूर्ण केली आहे. पूर्वी, दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी मुख्य शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करीत होते. आता ते त्यांची दोन मौल्यवान वर्षे वाचवू शकतात. समता याजनेनुसार आयटीआयनंतर ते पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. यामुळे आथा आयटीआय कोर्स घेणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसेल,” असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आयटीआय ही एक नावाजलेली प्रशिक्षण संस्था आहे आणि दहावी आणि बारावीच्या बरोबरीमुळे भविष्यात येथे हे प्रशिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात सुमारे ३५५ तालुक्यांमध्ये आयटीआय प्रशिक्षण संस्था आहेत. याव्यतिरिक्त, राज्यात जवळजवळ ५३८ खासगी आयटीआय प्रशिक्षण संस्था आहेत. जिथे एकूण ५०,००० जागा आहेत.
पाहा व्हिडीओ: