मुक्तपीठ टीम
सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवासही आता आनंददायक आणि आरामदायक होणार आहे. कारण लवकरच भारतीय रेल्वेच्या स्लीपर कोचचा एसी अवतार येणार आहे. रेल्वेने नवा एसी-३ इकोनॉमी क्लास कोच तयार केला आहे. यासाठी लखनौमधील रेल्वे संशोधन डिझाईन आणि स्टँडर्ड्स संस्था म्हणजेच आरडीएसओने नवीन डबे तयार केले आहेत. त्यांची चाचणीही सुरू आहे आणि लवकरच ते प्रवाशांना उपलब्ध होतील.
स्वस्त आणि चांगला प्रवास हा रेल्वेचा हेतू आहे. रेल्वे नवीन कोच बनवत आहे. हे डबे तयार करण्याची परवानगी रेल्वे बोर्डाने गेल्या वर्षीच दिली होती.
त्यातून अधिक प्रवासी घेऊन जास्त उत्पन्न मिळवणे हे रेल्वेचे लक्ष्य आहे. त्याचा फायदा प्रवाशांनाही होणार आहे. एक प्रकारे, हे नवे ३ टियर एसी इकोनॉमी कोच स्लीपर क्लासची प्रगत आवृत्ती असतील, ज्यामध्ये एसी असेल. तेथे ७२ च्या ऐवजी ८३ प्रवासी प्रवास करू शकतील.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) अहमदाबादने देशातील लोकांच्या प्रवासाच्या सवयीवर संशोधन करून एक पुस्तक तयार केले आहे. यात प्रवासादरम्यान लोकांच्या गरजेचा उल्लेख आहे. त्यानुसार नवीन कोचची रचना केली गेली आहे. कोचची मांडणी पूर्वीपेक्षा अगदी वेगळी आहे. त्यांची फिनिशिंगही बर्यापैकी लक्झरी आहे.
आता एसी-३सह लक्झरी सुविधा देऊन रेल्वे भाडे कमी कसे करेल, हा प्रश्न सतावू शकतो. पण रेल्वेला कोणत्याही वर्गात किंवा ट्रेनमध्ये भाडे कमी करायचे असेल तर ते दोन मुद्द्यांवर ठरवले जाते. योग्य पद्धतीनं धोरण ठरवून राबवलं तर भाडेही कमी होते आणि रेल्वेचे नुकसानही होत नाही.
रेल्वेचे भाडे कसे कमी होऊ शकते?
• जर रेल्वे कोणत्याही कोच किंवा ट्रेनमधील प्रवाशांची क्षमता वाढवली तर प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे त्याच किंमतीवर अधिक उत्पन्न मिळण्यास सुरवात होते. अशा परिस्थितीत भाडे कमी केल्याने रेल्वेचे कोणतेही नवे नुकसान होणार नाही.
• रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला तर कमी वेळात आणि कमी इंधनात जास्त अंतर कापले जाईल. यामुळे रेल्वेचा खर्चही कमी होतो आणि यामुळे प्रवाशांच्या भाड्यात कपात होऊ शकते.
नवीन कोचमध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. ते वेगवान तर आहेतच आणि अधिक प्रवाशांसाठी डिझाइन केले गेले आहे. त्यामुळे एसी इकोनॉमी क्लास कोचचे भाडे ३ टियर एसीपेक्षा कमी असेल.
पाहा व्हिडीओ: