मुक्तपीठ टीम
संतोष परब हल्लाप्रकरणात अडचणीत आलेले भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळला आहे . या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवार-बुधवार दोन दिवस सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत आणि नितेश राणेंचे वकील यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
मंगळवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून सुरु झालेली सुनावणी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत, बुधवारीही संध्याकाळपर्यंत सुनावणी चालू होती. त्यानंतर गुरुवारी अखेर न्यायालयाने निकाल जाहीर केला. त्यात जामीनाचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता उच्च, सर्वोच्च अशा आणखी न्यायालयात प्रयत्नांचे पर्याय असले तरीही नितेश राणेंच्या डोक्यावर आता अटकेची तलवार लटकू लागली आहे. पण मुळात त्यांचा जामीन अर्ज का फेटाळला गेला, हा मुद्दा आता चर्चेचा ठरला आहे.
दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज
सत्र न्यायालयात सरकारच्यावतीने ज्येष्ठ सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आमदार राणेंच्या अटकपूर्व जामीनाला कडाडून विरोध केला. तर आमदार नीतेश राणे यांच्यासाठी अॅड. राजेंद्र रावराणे आणि ॲड. संग्राम देसाई, ॲड. उमेश सावंत यांनी अटकपूर्व जामीन मंजुरीसाठी जोरदार युक्तिवाद केला.
पहिला दिवस: मंगळवार, २८ डिसेंबर
सरकारी वकील अॅड. प्रदीप घरतांचा युक्तिवाद
- पोलिसांविरोधात तक्रार नाही, पोलिसांवर दबाव आहे असं का बोलता
- पोलिसांबद्दल तुमच्या दोन वेगवेगळ्या भूमिका का?
- सुप्रीम कोर्टानुसार दखलपात्र गुन्हा असेल तर तक्रार ताबडतोब झाली पाहिजे
- सातपुते हा स्वाभिमानीचा कार्यकर्ता होता, नंतर त्याने भाजपात प्रवेश केला
- आरोपी सर्व लोकांसमोर चाकूने हल्ला करतात, मग नितेश राणे-गोट्या सावंत यांना फोनवरुन हल्ला केल्याचं का सांगू शकत नाही
- आपल्यामागे मोठे हात आहेत, असं आरोपींना सुचवायचं असावे.
आमदार नितेश राणे यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांचा युक्तिवाद
- सर्च वॉरंट नसताना नितेश राणेंची रुग्णालयात झडती का घेतली?
- नितेश राणे यांना दिलेली नोटीस चुकीची
- सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे
- या प्रकरणातील फिर्यादीचा सत्कार अजित पवारांकडून कसा केला गेला?
- हल्ल्यातील संशयितांची नावे गुप्त का ठेवली जात आहेत?
- संशयितांची नावे गुप्त तर मग नितेश राणे, गोट्या सावंतांना नोटीस बजावल्याचं का जाहीर केले?
- राग मनात ठेऊन नितेश राणेंना या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न
- नितेश राणे आणि आरोपी सचिन सातपुतेचा सीडीआर पोलिसांना मिळालाय
- सर्व गोष्टी पोलिसांना सापडलेल्या असताना आरोपींची समोरासमोर चौकशी कशाला?
- हल्ल्यानंतर आरोपीने फोनवरुन संपर्क साधल्याचं फिर्यादीचा दावा आहे.
- कोणता आरोपी भररस्त्यात फोन करेल? इथूनच या सर्व प्रकरणात संशय येत आहे.
- बँकेची निवडणूक आहे, त्यामुळे न्यायालयाने अंतरिम जामीन द्यावा
दुसरा दिवस: बुधवार, २९ डिसेंबर २०२१
नितेश राणे यांच्या अंतरिम जामीन अर्जावर बुधवारीही चार तास सुनावणी झाली. मंगळवारी संध्याकाळी साडेसातपर्यंत रंगलेला युक्तिवादाचा पुढचा भाग बुधवारी नव्या मुद्द्यांसह पार पडला. त्यानंतर न्यायालयाने गुरुवारी निकाल देणार असल्याचे जाहीर केले.
सरकारी वकील अॅड. प्रदीप घरतांचा युक्तिवाद
- नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. ते तरी कोर्टात काय करत आहेत?
- नितेश राणे यांची चौकशी करणे महत्त्वाचे आहे.
- युक्तिवाद करताना ते कालच केलेला युक्तिवाद परत परत करत होते.
- त्याला हरकत घेतली. परत परत तो युक्तिवाद करून न्यायालयाचा वेळ घेत असतील तर त्याला हरकत घेणं हे आमचं काम आहे.
- एखाद्या गुन्ह्याचा विचार केला. तर न्यायालयासमोर जी मांडणी करतो ती संयुक्तिक हवी.
- ज्या अधिकाऱ्यावर जबाबदारी आहे तो येऊन बसला तर बिघडले कुठे?
- मग केंद्रातील मंत्रीही इथेच बसले आहेत.
- कोणी कसं काम करावं या गोष्टी न्यायालयासमोर येऊ नये.
- नितेश राणे यांचे खासगी सहाय्यक राकेश परब यांच्या मोबाईलवरून आरोपी सचिन सातपुतेला ३३ वेळा कॉल केले गेले.
- आम्ही जबाबदारीने वागलं पाहिजे. जेवढा हवा तेवढाच संयुक्तिक भाग वापरला पाहिजे.
- तपासातील गोष्टीवर बोललं पाहिजे. तपासात जे जे निघतंय त्यामुळे आरोपीची कोठडी हवी.
- त्यांनी का नको यावर भर दिला पाहिजे. पण त्यांनी त्यावर लक्ष दिलं नाही, असंही घरत यांनी सांगितलं.
- अशा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. केस लॉ दाखवत असताना त्यात अडथळा आणणं चुकीचं आहे.
- आरोपीचे वकील बोलत असताना आम्ही अडथळा आणत नव्हतो.
आमदार नितेश राणे यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांचा युक्तिवाद
- महासंचालक दर्जाचे अधिकारी या ठिकाणी काय करत आहेत?
- काहीच कारण नसताना पोलीस महासंचालक सिंधुदुर्गात काय करत आहेत?
- राणे हे या जिल्ह्यातच राहतात. इथे त्यांचं घर आहे. त्यामुळे ते इथे आले आहेत.
- सरकारी वकील सर्वोच्च न्यायालयाचे निकाल वाचत होते. त्यामुळे वेळ जात होता.
- युक्तिवादासाठी वेळ अपुरा पडण्याची शक्यता असल्याने आम्ही त्यात हस्तक्षेप केला.
- केस लॉ कोर्टावर सोडून द्या असं सांगितलं.
- कॉल्सवरून काहीही ठरत नाही
- कॉल डिटेल्सवर सर्व गोष्टी ठरत नसतात.
- अनेक लोक अनेकांशी संपर्क साधत असतात.
- त्यामुळे प्रत्येक व्यक्ती गुन्हा करतो असं नाही.
- त्यामुळे अशा कॉल्सवरून निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.
- फोनवर कोण किती लोकांशी किती वेळा बोलत याच्याशी काहीही घेणं देणं नसतं.
- ३३ कॉलचा मुद्दा सरकारी वकिलांनी उपस्थित केला.
- पण हे कॉल कधी केले हे काही सांगितलं नाही.
- कालावधी सांगितला नाही. ते दोन वर्षातील आहे की दोन महिन्यातील माहित नाही.
- हा तपासाचा भाग आहे.
तिसरा दिवस: गुरुवार, ३० डिसेंबर २०२१
- नितेश राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला
नितेश राणेंना जामीन का नाही?
- आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज का फेटाळण्यात आला, हा आता चर्चेचा मुद्दा झाला आहे.
- नितेश राणेंच्या, त्यांच्या पीएच्या वापरातील मोबाईल ताब्यात घेण्यासाठी कोठडी मिळणे आवश्यक आहे.
- नितेश राणे, त्यांचे सचिव आणि सचिन सातपुते यांच्यात ३३ वेळा संभाषण झाले, असा पोलिसांचा आरोप आहे.
- त्या संभाषणाची माहिती पोलिसांना हवी आहे.
- नितेश राणेंचे सर्व फोन जप्त करून त्यातून सीडीआर रेकॉर्ड मिळवणं आवश्यक आहे.
- त्यासाठी पोलिसांना कोठडी आवश्यक आहे.