नीरज महामुरे / व्हाअभिव्यक्त!
पाऊस पडतो. कोसळल्यासारखा बदाबदा पडतो. पूर परिस्थिती निर्माण होते. होतं नव्हतं ते वाहून जातं. पाऊस पडतच नाही. सारं काही कोरडंठाण पडतं. प्यायलाही पाणी नसतं. पाणी असतं ते फक्त आकाशात ढग शोधणाऱ्या डोळ्यांमध्ये. इतर कुठेही नाही.
पावसाच्या या दोन तऱ्हा. आपणच ओढवून आणलेल्या. आता हे जर बदलायचं असेल तर आपल्याला एक लक्षात ठेवलंच पाहिजे. झाडे असतील तरच पाऊस पडेल आणि पाऊस असेल तरच झाडे राहतील…
आजची परिस्थिती पाहता पावसाची आणि झाडांची नितांत गरज आहे!
रस्त्यावरून जाताना जेंव्हा कंटाळा येतो, तेंव्हा प्रत्येकाला वाटते. थोडे थांबून पाणी प्यावे आणि क्षणभर विश्रांती घ्यावी. पण सध्या रस्त्याच्या दुतर्फा तर सोडा पण काही ठिकाणी तर नजर जाईल तिथंपर्यंत झाडे दिसत नाहीत.
शेतीची कामे करताना, शेतीची कामे करणाऱ्या मशिनला अडथळे होवू नये, शेतात सावली पडू नये म्हणून शेतातली झाडे तोडली. जेंव्हा ऊन पडू लागले, मग जो-तो सावलीसाठी इकडे तिकडे बघू लागला. पण एकही झाड दिसत नाही.
काही दिवसांनी थोडा पाऊस झाला, पुढील पावसाचा अंदाज बांधत शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण जसे काळ आणि वेळ पुढे सरकत होते, तशी पाण्याची गरज पिकांना भासू लागली. मग पावसाची पुन्हा प्रतिक्षा सुरु झाली. पण पाऊस काही पाहिजे तसा पडत नाही.
जो तो प्रत्येकजन आपापल्या परीने वरुण देवांना विनवु लागला. वरुण देवांना प्रसन्न करण्यासाठी पाहिजे ते सर्व काही देऊ लागला. पण एक मात्र विसरून तो सर्व काही प्रयत्न करू लागला. वरुण देवांना गरज असते ती पळणाऱ्या ढगांना थांबवणाऱ्या वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच अशा देशी झाडांची. त्यावर बागडणाऱ्या, किलबिल करणाऱ्या पक्षांची. पण आजूबाजूला वड, पिंपळ यासारखी झाडे तर नव्हतीच, जी कडुनिंबाची झाडे होती ती पण तोडली होते. सांगा मग पाऊस कसा पडणार?
आपण सर्वांनी जेवढे आठवते तेवढे भूतकाळात डोकावून पाहिले तर वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब यासारखी भरपुर झाडे शेताच्या बांधावर, रस्त्याच्या दुतर्फा होती. म्हणूनच पाऊस पडायचा आणि सर्वांना आनंद देऊन जायचा.
मग आतासुद्धा नियमित, भरवशाच्या आणि चांगल्या पावसासाठी फक्त साकडे घालून चालणार नाही. तर अगदी सहज उपलब्ध असणारी देशी झाडांची रोपे प्रत्येकाने लावून झाड होईपर्यंत वाढवणे आणि सतत काळजी घेणं, हीच काळाची गरज आणि जगण्याची गुरूकिल्ली आहे!